Bookstruck

हुंड्यासाठी आसवे

सोनूशेट नामक व्यापाऱ्याला चार मुले होते. म्हणून सर्व त्याला भाग्यवान मानत. सोनूशेटला पण तसेच वाटत असे. एक श्रीमंत माणूस सोनूशेटकडे येऊन म्हणाला— "मी तुमच्या थोरल्या मुलाच्या स्थळासाठी आलो आहे. माझी मुलगी एकुलती एक आहे. म्हणून मी तुमच्या चिरंजीवांना घरजावई करणार आहे." सोनूशेटला पैशाचा फार लोभ म्हणून त्याने आपल्या व्याह्यांकडून हुंड्यासाठी म्हणून पंचवीस हजार रुपये घेतले. मुलाचे लग्न करून देऊन त्याला सासरच्या घरी पाठवून दिले. अशाच तऱ्हेने वीस हजार रुपये हुंडा घेऊन दुसऱ्या मुलाच्या इच्छेविरुद्ध त्याचे लग्न करून दिले. तिसऱ्या मुलाचे लग्न एका श्रीमंत घराण्यातल्या मुलीशी झाले. व्याह्यांकडून सोनूशेटने हुंड्याचे वीस हजार रुपये वसूल केले. परंतु तिसऱ्या मुलाच्या बायकोने पतीला सांगून निराळाच संसार थाटला. अशा तन्हेने एकेक करून त्याचे तिघे मुले त्याच्या हातातून निसटले. परंतु सोनूशेटला त्याची फिकीर नव्हती. कारण त्याला हुंड्याचे पैसे खूप मिळाले होते. परंतु चौथ्याने आपल्या पित्याच्या इच्छेविरुद्ध हुंडा घ्यायचे अमान्य केले. बापाने त्याला पैशाचे महत्त्व अनेक प्रकारे समजावून सांगितले, परंतु त्याने तिकडे दुर्लक्ष केले. म्हणून सोनूशेटने दुसऱ्या तऱ्हेने थोडे फार पैसे उकळण्याचा विचार केला. तो मुलाला म्हणाला— "तर मग बाळा, आपण हुंडा घ्यायचाच नाही. ते लोक भेटअहेर म्हणून जे देतील ते घ्यायचे!" मुलाने हट्ट धरला व म्हणाला— "तुम्ही हुंडा किंवा अहेर, मानपान इत्यादी सांगून पैसे उकळणार नाही, हे तुम्हांला मान्य असेल तरच मी लग्न करीन!" असे सांगून चौथ्या मुलाने स्वतःच मुलीची निवड करून परस्परांना हार घातले आणि खर्चा शिवायचे लग्न केले. मुलाने आपल्या बोलण्याकडे केलेले दुर्लक्ष सोनूशेटला मुळीच आवडले नाही. त्याने रागाने आपल्या चौथ्या मुलाला व सुनेला घराबाहेर काढले. कित्येक वर्षे लोटली. सोनूशेट म्हातारा झाला. त्याची बायको फार पूर्वीच मरण पावली होती. मुले तर दूर राहत होती. एकटेपणा डाचू लागला. सोनूशेटने अंथरुण धरले. कोणाला पगारी नोकर म्हणून ठेवावे तर सोनूशेटला भीती वाटे की नोकराने गळा दाबला तर त्याचे हाल कुत्रासुद्धा पाहणार नाही. त्याला काळजी वाटू लागली की तो आता अनाथ अपंग झाला आहे आणि मरण आले तर त्याचा देह उचलायला सुद्धा कोणी येणार नाही. चौथ्या मुलाला बाप आजारी असल्याचे कळले तेव्हा तो बायकोबरोबर वडिलांकडे चौकशीला आला. मुलाला पाहून सोनूशेटचे डोळे पाणावले. मुलाने पित्याचे सांत्वन केले आणि सुनेने सासऱ्याची सेवाशुश्रूषा केली. सोनूशेटला पुनर्जन्म मिळाल्यासारखे वाटले. हळूहळू त्याची तब्येत सुधारू लागली. सोनूशेटने आपल्या तिघां थोरल्या मुलांची चौकशी केली तेव्हा चौथा मुलगा म्हणाला— "बाबा! दादा आता कधी या घरी परत येणार नाही. तुम्ही त्याला हुंडा घेऊन त्याच्या सासरच्या हातात विकलेत. दुसरा भाऊ, तो तर त्याला न आवडणाऱ्या बायकोबरोबर मोठ्या कष्टाने दिवस काढतो आहे. तिसरा अण्णा, तो तर भांडूनच घराबाहेर गेला आहे." ते ऐकून सोनूशेटला अनावर दुःख झाले आणि तो लहान मुलासारखा रडू लागला. आता मुलांना परत विकत घेणे त्याला अशक्य होते. जो विकला गेला नव्हता तोच शेवटी विचारपूस करायला आला.