स्वावलंबन
एका गावात रामशर्मा आणि सोमगुप्त नावाचे दोन मित्र रहात होते. दोघेही गरीब होते. एक दिवस दोघांनी ठरवले की पैसा मिळवण्यासाठी आपण गांव सोडून कुठेतरी जाऊं. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघे निघाले. बराच प्रवास करून दमल्यानंतर ते एका ऋषींच्या आश्रमाजवळ विश्रांतीसाठी थांबले. ऋषींनी त्या दोघांची संपूर्ण विचारपूस केल्यावर त्यांना नीट समजावले, "मुलांनो, मी खूप कष्ट करून अनेक विद्या शिकलो आहे. तुमच्यापैकी एकजण ब्राम्हण आहे. ब्राम्हणाने पैशाचा लोभ धरणे चांगले नाही. त्यांच्या जन्माचे सार्थक तेव्हाच होईल जेव्हां तो ज्ञान मिळवून इतरांनाही ते देईल! दुसरा वैश्य आहे. तो माझ्याकडून व्यापारातील रहस्ये जाणून घेऊन पैसा मिळवू शकेल. खरा वैश्य फक्त पैसा न मिळवता जनसेवा ही करतो."
ऋषींच्या सल्ल्यानुसार दोघा मित्रांनी तीन वर्षे विद्याभ्यास केला. रामशर्माने अनेक शाखांत प्राविण्य मिळवले. सोमगुप्ताने व्यापारातील रहस्ये समजून घेतली. आपल्या ज्ञानसामर्थ्यावर रामशर्माने एका राजाच्या दरबारी पंडिताची जागा मिळवली. सोमगुप्तने व्यापारांत खूप प्रगती केली. चार-पाच वर्षांत दोघेही सुसंपन्न झाले.
कांही वर्षे अशीच गेली. रामशर्माला एक मुलगा झाला. त्याचं नाव 'कृष्णशर्मा' ठेवलं. पण रामशर्माला आपल्या मुलाची खूप काळजी वाटू लागली. तो अतिशय व्रात्य होता. शिक्षणाची त्याला अजिबात आवड नव्हती. तो नुसत्या उनाडक्या करण्यात सारा वेळ वांया घालवत असे. रामशर्माने मुलाला आपल्या योग्य बनवण्याचा खूप प्रयत्न केला. पण सारे प्रयत्न फोल ठरले.
त्याचवेळी एक विचित्र घटना घडली. रामशर्मा विद्यार्थ्यांना कांही श्लोक शिकवत होता. ते श्लोक खूप अवघड असल्याने खूप वेळा सांगूनही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नव्हते. शेवटी कंटाळून रामशर्मा विश्रांतीसाठी आंतल्या खोलीत निघून गेला.
आपल्या वडिलांना विद्यार्थ्यांना शिकवून दमलेले कृष्णशर्माने पाहिले. वडील आंत जाताच कृष्णशर्मा त्यांच्याच आसनावर बसून स्वतः विद्यार्थ्यांना शिकवू लागला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामशर्माने शिकवल्यावर जे श्लोक मुलांना कळत नव्हते, तेच श्लोक कृष्णशर्माने शिकवल्यावर त्यांना लगेच समजले.
आंतून हे दृश्य पाहून रामशर्मा अगदी चकित झाला. त्याच्या लक्षांत आलं की आपला मुलगा मूर्ख नाही. त्याची स्मरणशक्तीही चांगली आहे. विद्याभ्यास केला तर तो कठीण शाखांतील ज्ञानही सहज मिळवू शकेल. रामशर्माने ही गोष्ट कृष्णशर्माला सांगितल्यावर त्याने विचारले, "विद्याभ्यास कशासाठी करायचा?"
तेव्हा रामशर्माने सांगितले, "लोकांचा आदर प्राप्त करण्यासाठी, तसेच पैसा मिळवण्यासाठीही, ज्ञानार्जन अत्यंत आवश्यक आहे."
त्यावेळी कृष्णशर्माने उलटा प्रश्न विचारला, "लोक माझा आत्ताही आदर करतात, कारण मी एका महापंडिताचा मुलगा आहे. मी ब्राम्हण असल्याने ते माझी पूजा ही करतात. तसेच मी एका धनिकाचा मुलगा आहे. त्यामुळे मला पैसा कमविण्याची तरी काय आवश्यकता आहे?"
आपल्या मुलाला कसे समजावावे या विचारांत रामशर्मा असतानाच सोमगुप्त त्याच्याकडे आला. त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले की सोमगुप्तचा मुलगा वसुगुप्त ही असाच बेजबाबदार आहे. सोमगुप्तनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केल्यावर तोही असंच म्हणायचा की "मी धनिकाचा मुलगा असल्याने मला पैसा कमावण्याची काय आवश्यकता आहे?"
तेव्हां दोन्ही मित्रांनी विचार करून एक योजना आखली. त्या योजनेप्रमाणे सोमगुप्त आपला मुलगा वसुगुप्त याला रामशर्माच्या घरी सोडून आपल्या पत्नीबरोबर व्यापारासाठी बाहेरगांवी गेला. जाताना आपल्या मुलाच्या सेवेसाठी दोन नोकरांनाही ठेवून गेला.
कृष्णशर्मा आणि वसुगुप्त लवकरच एकमेकांचे चांगले मित्र बनले. दोन महिने निघून गेले. एके दिवशी रामशर्माने वसुगुप्तला बोलावून सांगितले की, "तुझ्या वडिलांनी पैसे पाठवायला सांगितले आहे. तू तुझं घर विकून त्यांना पैसे पाठवून दे." पण वसुगुप्तने कांही लक्ष दिले नाही.
आणखी एक महिना गेला. एक दिवस रामशर्माकडे एक व्यक्ती येऊन सांगू लागली, "सोमगुप्तचे जहाज बुडाले. त्याबरोबरच सोमगुप्त, त्याची पत्नी आणि सगळी संपत्तीही बुडाली. मी कसाबसा त्यांना कांठावर घेऊन आलो आणि त्यांच्या घरी त्यांना पोहोचविले, पण दुर्दैवाने त्यांचा जीव वाचला नाही."
हे ऐकून वसुगुप्त रडूं लागला. रामशर्माने त्याचे सांत्वन केले. पण त्याने एक गोष्ट स्पष्ट केली की, "मी तुझ्या वडिलांसारखा मोठा व्यापारी नाही. तुझा भार उचलणे मला शक्य नाही. तेव्हां तुझी व्यवस्था तूच पहा."
वसुगुप्त रागांतच रामशर्माच्या घरांतून बाहेर पडला, पण त्याला कुठेही आसरा मिळाला नाही. कोणी त्याला खायला सुद्धा दिलं नाही. म्हणून शेवटी आपला स्वाभिमान सोडून तो रामशर्माकडे परत आला आणि कांही खायला मागूं लागला. रामशर्माने वसुगुप्तला जेवण दिलं, पण त्याबरोबर हेही सांगितलं की फार दिवस हे शक्य नाही.
हे ऐकून कृष्णशर्माला खूप राग आला. त्याने आपल्या वडिलांना विचारलं, "आपण आपल्या मित्राच्या मुलाला एवढीही मदत करणार नाही?" त्यावेळी रामशर्माने उत्तर दिले, "सोमगुप्त माझा मित्र आहे. तो अडचणीत असता तर मी नक्कीच त्याला मदत केली असती. परंतु वसुगुप्तशी माझा कांहीही संबंध नाही."
तेव्हां कृष्णशर्मा म्हणाला, "वसुगुप्त तुमचा कोणीही नसला तरी माझा चांगला मित्र आहे. तेव्हां माझ्या मित्राला या घरी कांहीच मान नाही कां?"
रामशर्मा बेपर्वाईने म्हणाला, "तुझी काय पात्रता आहे?" तेव्हां कृष्णशर्मा म्हणाला, "देवाची नुसती पूजा करणाऱ्या पुजाऱ्यालाही लोक देवाइतका मान देतात. तसा मी महापंडित रामशर्माचा मुलगा आहे; ही माझी पात्रता होऊं शकत नाही?"
रामशर्माने क्षणभर विचार करून सांगितले की, "मी तुझ्या प्रश्नाचे जरूर उत्तर देईन, पण त्याआधी तुला एक काम करावं लागेल. तुझी आणि वसुगुप्तची सेवा करणाऱ्या त्या नोकरांना बोलाव आणि त्यांना दोन दिवस वसुगुप्तची सेवा करायला सांग. नंतर मला येऊन भेट."
कृष्णशर्मा अगदी उत्साहाने तिथून निघाला व नोकरांकडे झाला. यापूर्वी कांहीही पैसे न मागता नोकर सगळी सेवा करीत होते, पण आता तेच वसुगुप्तविषयी अपमानास्पद बोलले आणि त्यांनी सांगितलं की अशा गरीबाची सेवा यापुढे आम्ही करणार नाही.
त्यांचं उत्तर ऐकून कृष्णशर्मा चकित झाला आणि आपल्या वडिलाकडे येऊन त्याने हा सारा वृत्तांत सांगितला.
रामशर्मा अर्थपूर्ण हंसत म्हणाला, "नोकरांनी बरोबर उत्तर दिलं. वसुगुप्तचे स्वतःचे कांहीच व्यक्तिमत्व नाही. जोपर्यंत तो वडिलांच्या छत्राखाली होता, तोपर्यंत त्यांची संपत्ती त्याची संरक्षक होती. ती संपत्ती नष्ट झाल्यावर तोही एक सामान्य माणूस बनला. तसंच तुलासुद्धा माझ्या पांडित्यामुळे आदर मिळतो आहे. माझी संपत्ती म्हणजे पांडित्य आहे. ती संपत्ती जर तू मिळवली नाहीस, तर तुझीही अशीच अवस्था होईल. आपण स्वावलंबनाने जे मिळवतो तीच आपली खरी संपत्ती असते."
त्यावर कृष्णशर्मा म्हणाला, "खरंच! स्वावलंबन अत्यावश्यक आहे. म्हणून तुम्ही जशी तुमच्या मित्राची मदत करूं शकतां, तशी मी करूं शकत नाही."
तेव्हां रामशर्मा म्हणाला, "तू आणि तुझा मित्र मी सांगतो तिथे जाऊन कांही वर्षे विद्याभ्यास करा." आणि त्याने आपल्या विद्याभ्यासाविषयी सर्व सांगून त्या ऋषींच्या आश्रमाचा पत्ता कृष्णशर्माला दिला.
कृष्णशर्मा आणि वसुगुप्त दोन वर्षे ऋषींच्या आश्रमांत विद्याभ्यास करून आले. परत आल्यावर वसुगुप्तने पाहिले की आपले वडील जिवंत आहेतच आणि त्यांनी आपली संपत्तीही दुप्पट केली आहे. शेवटी त्या दोघांच्या लक्षांत आलं की रामशर्मा आणि सोमगुप्तने मिळून आपल्याला स्वावलंबी बनवण्यासाठी हे नाटक केले होते.