Bookstruck

स्त्रीला जे पाहिजे

शारदा एक विधवा बाई होती. ती कंजूष व लोभी होती. तिचा मुलगा सदाशिव. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. या लग्नात तिने वधूपक्षाकडून इतका हुंडा घेतला की व्याह्यांचे दिवाळंच निघाले. रीतीप्रमाणे सदाशिवाच्या सासऱ्याने मुलीला व जांवयाला दिवाळसणासाठी बोलाविले. आणखी दोन दिवसांनी सदाशिव सासुरवाडी निघणार होता, तेव्हा शारदाने सदाशिवला बाजूला बोलावून काही समजावून सांगितले. म्हणाली— "बाळा! तू पहिल्यानेच सासुरवाडी जातो आहेस. सासऱ्याला सोन्याची अंगठी करून द्यायला सांग, बरं का? तू नवा जावई आहेस ना? सासरा तू मागशील ते देईल!" सदाशिवला ते आवडले नाही. चिडून म्हणाला— "आई, लग्नात त्यांनी अंगाबाहेर खर्च केला आणि डोक्यावर कर्ज करून घेतलं असेल. तेव्हा आणखी अंगठी मागून त्यांना संकटात टाकू म्हणतेस?" "बाळा, तुझ्या हातात अंगठी असावी असे मला वाटते. आईची इच्छा मुलानेच पुरी करायची असते. बायकोची इच्छा अशीच पतीने पुरी करावी." आई म्हणाली. सदाशिवने भांडण वाढविले नाही. तो दिवाळसणासाठी बायकोला घेऊन सासुरवाडी गेला. दिवाळसण संपल्यावर दोन-तीन दिवस राहून बायकोबरोबर घरी परतला. आपल्या मुलाच्या बोटात सोन्याची एक मोठी अंगठी पाहून शारदाला परमानंद झाला. तिने ती अंगठी तिला फार आवडल्याचे पण सांगितले. आणखी काही दिवसांनी शारदा मुलाला हाक मारून म्हणाली— "बाळा, मी वर माळघ्यावर पेटीत हजार रुपये ठेवले होते. ते आता दिसत नाहीत! तू घेतले होतेस का? कसे गेले? कोणी नेले?" "होय आई, मी सासुरवाडी जाते वेळी ते रुपये घेऊन गेलो होतो. मी तुला नव्हते का सांगितले की माझ्या सासऱ्याच्या डोक्यावर कर्जाचे केवढे मोठे ओझे झाले आहे म्हणून? तुला माझ्या बोटात अंगठी पाहायला हवी होती. तुला हवं होतं तेच नाही का झाले? सासऱ्याला डोके वर काढायला जागा नव्हती. म्हणून तुझी इच्छा पुरी करण्यासाठीच तर मी तुझ्या पैशाने ही अंगठी करवून घेतली." सदाशिव शांतपणे म्हणाला. शारदाने चकित होऊन विचारले— "म्हणजे तू माझेच पैसे खर्च करून अंगठी करविली का? माझे पैसे घेऊन अंगठी करायची गोष्ट तुझ्या मनात आलीच कशी?" "आई, तूच नव्हतं का मला सांगितलंस की आईची इच्छा पुरी करणे मुलाचे आद्य कर्तव्य आहे म्हणून?" सदाशिवने निःसंकोचपणे विचारले. "ठीक, मी मानते की तू माझ्या इच्छेप्रमाणेच हे केलेस. आता ही अंगठी विकून माझे रुपये मला परत आणून दे!" शारदा म्हणाली. "आई, तुला असे वाटलं का की ती अंगठी अजून माझ्याजवळ आहे म्हणून? तुझ्या सुनेनं रेशमी शालू साठी हट्ट केला. म्हणून मी अंगठी विकली व एक चांगला जरीचा काठपदरी शालू बायकोसाठी विकत घेतला." सदाशिव म्हणाला. "अरे, तू हे काय रे केलेस? तुझ्या बायकोची हौस तू माझ्या पैशाने का पुरविलीस?" असे म्हणत ती दोन्ही हातांनी आपलं कपाळ बडवू लागली. "आई, तूच तर सांगितलं होतंस की बायकोची इच्छा पुरी करणे पतीचे कर्तव्य असते म्हणून?" सदाशिवने आईला उलट प्रश्न विचारला. त्याचे उत्तर काय द्यायचे बराच वेळ शारदाला विचार करूनही सुचले नाही.