Bookstruck

समोरच्या रखमाबाई

चंपक देशाच्या हद्दीला लागून शिवपूर नावाच्या गावी रामजी नावाचा एक शेतकरी रहात असे. त्याला लखूजी नावाचा धाकटा भाऊ व शांता नावाची एक बहीण होती. रामजीच्या बायकोचे नाव होते लक्ष्मी. ती दिराला व नणंदेला अत्यंत प्रेमाने वागवी. चंपक देशाचे शेजारच्या देशाशी युद्ध झाले. शत्रूसैन्य चंपकदेशावर चालून जात असतां शिवपूरच्या गावावर मोठे संकट आले. सैन्याचा धुमाकूळ चालू झाल्याने गावात राहणे अशक्य झाले. लोक गाव सोडून पळून गेले. रामजीचे कुटुंबसुद्धा गाव सोडून पळून गेले व दुसऱ्या गावात जाऊन राहू लागले. शिवपूर गावावर शत्रूचा अधिकार झाला. रामजीने परत जाण्याचा विचार सोडला व नवीन गावीच कायम राहण्याचे ठरविले. लखूजीचे विद्याभ्यासाकडे मुळीच लक्ष नव्हते. परंतु रामजी चांगला शिकला सवरलेला होता. लक्ष्मीने संगीताचा चांगला अभ्यास केला होता. दोघांनी मिळून एक लहान शाळा आपल्या घरीच काढली. शांता घरातील सर्व कामे पाहू लागली. लखूजी शेजारच्या जंगलातून लाकडे तोडून आणी. जंगलातल्या इतर उपयोगी वस्तूही तो आणून देत असे. एका वर्षाच्या आत रामजीने काही पैसे वाचवून दोन एकर जमीन विकत घेतली. लखूजी शेतीभातीची कामे करू लागला. आतां कुटुंबाची स्थिती वरीच स्थिरावली. रामजीने स्वतःसाठी एक घर घ्यायचे ठरविले. त्या गावात ते लोक आले त्या दिवसापासून ते घर विकायला घरमालक तयार असल्याचेही कळले. किंमत सुद्धा तशी जास्त नव्हती. तरी कोणी विकत घ्यायला पुढे येत नव्हता. ते घर विकत घ्यायचे रामजीने ठरविल्याचे ऐकून एक गृहस्थ म्हणाले— "असला वेडेपणा करू नका, कारण त्या घरासमोर राहणाऱ्या रखमाबाई म्हणजे एक म्हाळसाच आहे!" एका बाईला भिऊन स्वस्तात मिळणारे घर सोडून द्यायला रामजीचे मन तयार होईना. पुरेसा पैसा जमल्याबरोबर त्याने ते घर विकत घेतले आणि चांगला मुहूर्त पाहून गृहप्रवेश केला. गृहप्रवेशाला समोरच्या रखमाबाईसुद्धा आल्या होत्या. कित्येक दिवसानंतर शेजारी एक कुटुंब आल्याचा त्यांना फार आनंद झाला. रखमाबाईंच्या घरी त्या व त्यांचा नवरा दोघंच माणसं होती. त्यांना मुलंबाळं नव्हती. नातेवाईक होते, परंतु रखमाबाईंशी कोणाचे पटत नव्हते. रखमाबाईने लक्ष्मीशी मैत्री जोडली. काही काळ आनंदातच गेला. लक्ष्मी तिच्या घरी येणाऱ्या मुलांना गाणे शिकवी. रामजी घरासमोरच्या झाडाखाली बसून येणाऱ्या मुलांना शिकवी. शांता घरातले स्वयंपाकपाणी सर्व करी. लखूजी सकाळी न्याहारी करून शेतावर निघून जाई व संध्याकाळी घरी परत येई. रखमाबाई शांताला आपल्या घरी बोलावून तिच्याशी गप्पा मारीत बसत. इतक्या लहान वयात तिला घरातली सर्व कामे करावी लागतात म्हणून त्यांना तिची कीव येई. त्या म्हणत— "तू किती कामे करतेस ग? तुझ्या बहिणीला (वहिनीला) गात बसण्याशिवाय दुसरी कामे येत नाहीत वाटते?" "तसं नका म्हणू हो! आमच्या वहिनी म्हणजे एक देवी आहे! येत्या वर्षी माझं लग्न करून देणार आहेत! घरातली सर्व कामे यावी म्हणून माझ्यावरच सर्व जबाबदारी टाकली आहे. मी मागेन ते वहिनी मला आणून देतात." असे शांता सांगे. "अग तुझ्यासारखी नणंद मिळावी म्हणून देवाला किती नवस करावे लागतात! किती पगार दिला तरी तुझ्यासारखी कामं कोणी करील का? तुझी वहिनी मोठी भाग्यशाली आहे बाई! आणि तू, अगदीच भोळी आहेस बाई! मुकाट्यानं किती कष्ट करतेस ग?" या शब्दात रखमाबाई शांताला आपली सहानुभूती दर्शवीत. सुरवातीला या बोलण्याकडे शांताने लक्ष दिले नाही. परंतु हळूहळू संशयाच्या किड्याने तिच्या मनात घर केलेच. आपण भोळेपणाने सर्व कामे करतो, म्हणून वहिनी चाकरी करून घेत आहेत आणि स्वतः मजा करताहेत! तो विचार मनात आला त्या घटकेपासून शांताला तिची वहिनी दुष्टपणा करीत असल्यासारखं वाटू लागले. रखमाबाईला लखूजीची अशीच कीव वाटे व त्या आपली सहानुभूती दर्शवीत. "तू रामजीचा भाऊ आहेस हे कोणी मानणारच नाही. तू त्यांचा घरगडी आहेस असेच सर्वांना वाटते आहे." रखमाबाई लखूजीला म्हणाल्या. "मी तरी घरात स्वस्थ बसून काय करू? मला लिहितावाचता येत नाही. आमचा दादा मला किती प्रेमाने वागवतो. कोणी काही म्हटलं म्हणून काय झालं?" लखूजी उत्तर देई. "काय रे, सर्व गावाला शिकविणारा तुझा दादा, तुला का नाही रे शिकवीत? तुला शिकविलं तर शेतात कोण राबणार? म्हणून तर तो शिकवीत नाही!" रखमाबाईने या शब्दात विष कालवले. म्हणून लखूजीच्या मनातही संशयाच्या किड्याने प्रवेश केला. त्याला रखमाबाई म्हणत ते खरं वाटू लागलं. आता ही गोष्ट कोणाशी बोलावी हे त्याला कळेना. शेवटी तो धाकट्या बहिणीशीच बोलला. शांता सुद्धा तिच्या मनातलं विष ओकली. आपण दोघांवर भाऊ-भावजय अन्याय करीत असल्याचं दोघांना वाटू लागलं. शांताला थोडं गाता येत होतं. ती एके दिवशी आपल्या वहिनीला म्हणाली— "वहिनी, घरातली कामं करायला मला कंटाळा येतो बाई! तुम्ही काही दिवस घरातली कामे करा, मी मुलांना गाणं शिकविते!" त्या गोष्टीस भावजय लगेच तयार झाली. लखूजीसुद्धा भावाला म्हणाला— "दादा, माझी तब्येत हल्ली वरी नसते. मी काही दिवस घरातच राहून लिहायला वाचायला शिकून घ्यावे म्हणतो. शेताची कामे करायला आपण एखादा गडी ठेवू या का?" त्या गोष्टीस रामजीने होकार दिला. लक्ष्मी घरातलं स्वयंपाकपाणी वगैरे सर्व कामे करू लागली, परंतु शांताला गाणे शिकविणे काही जमले नाही. ती शिकवी ते मुलींना येत नाही म्हणून ती मुलींवर राग काढी. ते मुलामुलींना आवडेना. हळूहळू मुलं गाणं शिकायला यायची कमी होत गेली. प्राप्ती कमी होऊ लागली. वर्षभर घरात राहूनही लखूजीला लिहिता वाचता आलं नाही. त्याच्या डोक्यातच काही शिरत नव्हतं. गडी शेतातली कामं नीट लक्ष देऊन करीत नसे. म्हणून शेतातली प्राप्तीसुद्धा कमी झाली. त्यातला काही भाग गड्याच्या पगारासाठी खर्च झाला. अशा स्थितीत लक्ष्मीने त्या वर्षभरात शांताच्या लग्नासाठी चार पैसे मागे टाकायचा विचार केला होता तसे काही जमलं नाही. रामजी आणखी एक-दोन एकर जमीन विकत घेण्याच्या विचारात होता, तेही जमले नाही. एके दिवशी लक्ष्मीने शांताला जवळ बोलावून म्हटले— "आतां तू गाणं शिकवायचं बंद कर. तुला घरातली कामं जड वाटत आहेत ना, तर ती मी करीत राहीन व मुलांना गाणेसुद्धा शिकवीन." रामजीनेसुद्धा लखूजीला बोलावून समजावून सांगितले. "तुला बरं वाटेपर्यंत शेतातली कामं मी सर्व करतो व मुलांनासुद्धा शिकवितो." शांता व लखूजी दोघांनी ते आनंदाने मान्य केले. त्या दिवसापासून लक्ष्मीला व रामजीला कामाचा ताप जास्त पडू लागला. रखमाबाईंशी गप्पा मारायला शांता व लखूजीला वेळसुद्धा पुष्कळ मिळू लागला. रखमाबाईने त्या दोघांना सुटका मिळाल्याबद्दल दोघांचे अभिनंदन केले. रखमाबाईच्या मुळेच शांता व लखूजी दोघांमध्ये बदल झाला हे लक्ष्मीबाई व रामजी दोघांना उमगले. आपल्या सव्व्यवहाराने दोघांत बदल होईल असे दोघा नवरा-बायकोला वाटले होते. परंतु त्यांचा तो प्रयत्न निष्फळ ठरला. म्हणून रामजीने एक युक्ती योजली. एके दिवशी लक्ष्मी व रामजी दोघांनी परस्परांशी काहीतरी गुप्त बोलत असल्याचे सोंग केले. शांता व लखूजी त्यांचे संभाषण आड उभे राहून ऐकत होती. रामजी व लक्ष्मीला ते माहीत होते, म्हणून त्यांना चांगले ऐकू जाईल अशा बेतानेच नवरा-बायको बोलत होती. "शांताला काम करायला आवडते, पण मला मदत करायला आवडत नाही, म्हणे! आम्हा दोघांचे परस्परांवर स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त प्रेम आहे हे त्या रखमाबाईला माहीत नाही, म्हणून शांताच्या विरुद्ध नाही नाही ते ती बोलली. मला ती म्हणाली ते सर्व खरे वाटेल, असे वाटलं वाटतं तिला!" लक्ष्मी म्हणाली. "लखूजीच्या विषयी मला ती असंच काहीतरी म्हणाली. मला ते खरं वाटलं नाही!" रामजी म्हणाला. "शांताला म्हणे माझ्या बोलण्यापेक्षा तिचे बोलणंच जास्त खरं वाटतं! रखमाबाईने सांगितलं तर म्हणे शांता मला केरसुणीने मारायला मागेपुढे पाहणार नाही. उलट रखमाबाई असं माझ्या जवळ म्हणाल्याचं शांताला कळलं तर ती त्या रखमाबाईलाच केरसुणीने झोडपून काढील." लक्ष्मी म्हणाली. "ती मला म्हणाली की तिने लखूजीला सांगितले तर तो म्हणे माझी शेंडी धरून मला रस्त्यावर ओढून न्यायला मागेपुढे पाहणार नाही. ही गोष्ट रखमाबाई म्हणाल्याचे त्याच्या कानावर पडलं तर तो त्या रखमाबाईच्याच झिंझ्या धरून तिला रस्त्यावर ओढून नेईल." रामजी म्हणाला. नवरा बायको अशी बराच वेळ बोलत बसली होती. काही वेळाने दोघांनी पलीकडे जाऊन पाहिले तर तेथे शांता किंवा लखूजी दोघांपैकी कोणीच नव्हता. गल्लीत कसला तरी आरडाओरडा ऐकू आला. दोघे बाहेर जाऊन पाहतात तर गर्दी जमलेली होती व लोक गंमत पाहत होती. लखूजी रखमाबाईच्या झिंझ्या धरून गल्लीत ओढून घेऊन आला होता आणि शांता केरसुणीने रखमाबाईला बडवीत होती. रामजी धावतच गेला आणि दोघांना एकेका हाताने धरून घरात ओढून घेऊन आला. दुसऱ्याच दिवशी रखमाबाई व तिचा नवरा गाव सोडून निघून गेले. कारण प्रेमाने राहणाऱ्या कुटुंबाच्या घरासमोर रखमाबाईसारख्यांना राहणं शक्यच नव्हतं.