Bookstruck

समयसूचकता

मद्रदेशाचा राजा प्रचंड याच्याजवळ खूप मोठे सैन्य व त्याचबरोबर पुष्कळ संपत्तीही होती. राजा प्रचंड आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये सलोख्याचे संबंध जोडण्याकरिता आपल्या निवडक राजदूतांना पाठवित असे. काही वर्षांपूर्वी राजा प्रचंडने कौशांबी व विदेह या दोन्ही राज्यांसाठी वज्रसेन नावाचा राजदूत नेमला होता. त्यांनी पुष्कळ वर्षे आपली जबाबदारी ओळखून त्या पदाचा सांभाळ केला. परंतु अचानक त्यांचे निधन झाले. तेव्हा राजांनी दोन्ही राज्यांसाठी एक नवीन राजदूत नेमण्याचा विचार केला. त्याकरिता राजांनी काही योग्य व्यक्तींना बोलावून त्यांची परीक्षा घेतली. त्यात विकार आणि ललित नावाच्या दोन व्यक्ती यशस्वी झाल्या. त्या दोघांपैकी राजदूतपदासाठी कोण योग्य ठरेल हे समजण्याकरिता राजांनी विचारपूर्वक एक परीक्षा घेण्याचे ठरवले व त्या दोघांना बोलावून घेतले. राजांनी सांगितले— "मी तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवणार आहे." आणि विकारकडे वळून पाहत म्हणाला— "तू आज आपल्याबरोबर आवश्यक तेवढे सैन्य व नजराणा घेऊन कौशांबी राजाकडे जा व मैत्रीसंबंध जोडून त्यांना आपली भेट देऊन परत ये." तसेच ललितलाही विदेह राज्यात जाऊन तेथील राजाकडे सलोखा संपादन करून त्यांना नजराणा अर्पण करून परत यायला सांगितले. राजाचा संदेश मिळताच व राजांनी दिलेली वेळेची मुदत ऐकताच दोघेही निवडक सैन्य व उपयुक्त नजराणा घेऊन निघाले. बरोबर नेलेला नजराणा व सैन्य घेऊन ललित वेळेच्या आधीच राजधानीत परत आला व राजाला जाऊन भेटला. राजा प्रचंडने ललितला विचारले— "विदेह राजांनी आमच्या वस्तू स्वीकारण्याचे नाकारले काय? त्याचबरोबर मैत्री संबंध पण होऊ शकले नाहीत काय?" "महाराज, एका मांडलिक राजाबरोबर कसले संबंध जोडायचे, ही गोष्ट आपल्या मोठेपणाला लाजवणारी होईल ना? नजराणा बरोबर घेऊन जाताना ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. परंतु विदेह राजाला भेटताच ही गोष्ट माझ्या लक्षात आली म्हणून मी भेटवस्तू राजाला अर्पण न करता व आपल्याबरोबर मैत्रीसंबंध जोडण्याचे न सांगताच तेथून निघून आलो," ललितने उत्तर दिले. हे उत्तर ऐकताच दरबारातील लोकांना आश्चर्य वाटले, परंतु राजाला आश्चर्य वाटले नाही. ललितला विदेह देशाशी सलोख्याचे संबंध जोडण्याकरिता पाठवले होते परंतु ललितने राजाविरुद्ध व्यवहार केला तेव्हा राजा ललितला राजदूताचे पद देणार नाही, असे सर्व दरबारी लोकांना वाटले. विकार तर राजांनी दिलेल्या वेळेच्या नंतर दोन दिवसांनी कौशांबी राजांनी दिलेला नजराणा घेऊन राजधानीत परत आला. राजांनी विकारला पाहताच विचारले— "तू दिलेल्या वेळात न येता उशिरा का आलास? कौशांबी राजांनी आपल्याबरोबर सलोख्याचे संबंध जोडण्याचे कबूल केले आहे काय?" विजयगर्वाने विकार म्हणाला— "महाराज, मी कौशांबी राजाला आपल्याबरोबर सलोख्याचे संबंध जोडण्याकरिता खूप विनवले व त्यांनी आपला नजराणा स्वीकार करून, सोबत आपल्याकरिता अमूल्य अशा भेटवस्तू व तसेच दासदासी पाठवल्या आहेत. आजपर्यंतचा अतिथी सत्कार पाहूनच माझ्यावर एक प्रकारचे दडपण आले." ह्यावर सर्व दरबारी त्याची स्तुती व अभिनंदन करू लागले. तेव्हा राजांनी त्यांना थांबवून सांगितले— "मी राजदूत पदासाठी ललितची निवड केली आहे." ही गोष्ट आपल्या लोकांपैकी बऱ्याच जणांना आश्चर्यकारक वाटली. परंतु ललितने केलेला राजाबरोबरचा व्यवहारच योग्य आहे. विदेह राज्य आपल्यासाठी मांडलिक राज्य म्हणजे शेजारचेच राज्य आहे. तेव्हा त्याच्याबरोबर आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध जोडण्याची काहीच गरज नाही. परंतु त्याला (ललितला) प्रथम माहीत झाले नाही तिथे जाताच त्याच्या ते लक्षात आले, तेव्हा त्याने आपला नजराणा अर्पण केला नाही व तो परत आला. कौशांबी सुद्धा आपले शेजारचेच राज्य आहे. परंतु विकारने ही गोष्ट जाणून घेतली नाही व राजाला आपला नजराणा अर्पण केला आणि उपयोगी नसलेल्या गोष्टी घेऊन मैत्रीसंबंध जोडून परत आला. त्यामुळे असे स्पष्ट झाले की, राजदूताच्या ठिकाणी लागणारी समयसूचकता त्याच्यापाशी नाही. त्यामुळे विश्वास ठेवणे कठीण आहे की, मद्र देशाची अब्रू अशा व्यक्तीकडून राखली जाईल," असे राजा प्रचंडने सांगितले. राजाच्या सांगण्यावरून सर्व दरबारी लोकांना व जनतेला समजले की, ललित एक हुशार व विवेकशील व्यक्ती आहे आणि विकारमुळे कशी चूक झाली.