सगळीच लबाडी
हेलापुरीत राहणारा माधव हा सामान्य परिस्थितीतला होता, पण त्याच्या पत्नीला, नीरजाला मात्र नटून थटून राहण्याची व थाटमाट करण्याची दांडगी हौस होती.
नीरजाच्या नात्यांत एक लग्न ठरलं आणि त्या दोघांना त्या लग्नाचं निमंत्रण आलं. त्याप्रसंगी गळ्यांत घालण्यासाठी नीरजाजवळ चांगलासा सोन्याचा हार नव्हता.
तिची शेजारीण श्यामला हिच्या गळ्यांत चमचमणारा हार पाहून तिला तो हार घालून मिरवायची इच्छा झाली. श्यामलाने तिला लग्नांत घालायला हार दिला. पण घरी परत आल्याबरोबर तो हार परत देण्याच्या अटीवरच तिने दिला. मोठ्या आनंदाने नीरजाने तो हार गळ्यांत घातला आणि ती त्या नातेवाईकांकडे लग्नाला गेली. आठवडा होऊन गेला तरी नीरजाने तो हार श्यामलाला परत दिला नाही. श्यामलानेही तो मागितला नाही.
दहा दिवसांनंतर रागारागाने नीरजा श्यामलाकडे गेली आणि तिने तो हार तिच्या हातांत देऊन म्हटले, "जगात इतके लबाड लोक असतात याची मला कधी कल्पनाच नव्हती. सोन्याचा हार सांगून तू मला खोटा पितळेचा हार दिलास!" तिचा आवाजही कर्कश होता.
तरीही शांतपणे श्यामला म्हणाली, "मी कधी तुला म्हटलं की हा सोन्याचा हार आहे म्हणून? तुला घालायला हवा होता, तो मी दिला. पण तुला कसं कळलं की हार सोन्याचा नसून नकली आहे तो?"
त्यावर नीरजा संतापाने म्हणाली, "जरा पैशाची नड होती, म्हणून मी तो सावकाराकडे गहाण टाकायला नेला होता. त्याने दगडावर घासून पाहिले आणि हा हार खोटा, नकली आहे असे सांगितले!"
हे उत्तर ऐकून श्यामला थक्क झाली.