श्रमाचे वजन
गणू या जगात एकटा होता. तो गावातल्या लोकांकडे जे मिळेल ते काम करून ते देत त्यावर आपला उदरनिर्वाह चालवी. त्याचे लग्नाचे वय झाले. आपण लग्न करून एक गृहस्थ व्हावे असे त्याला वाटू लागले. त्याच्या गंगाराम मामाला एक मुलगी होती. तिच्याशी आपले लग्न झाले तर बरं होईल, असा विचार करून तो आपल्या मामाकडे गेला म्हणाला— "मामा! मला जावई करून घेता का?"
"घर नाही की दार नाही चार पैसे मिळवायची लायकी नाही आणि म्हणे लग्न करून देता का? तू शंभर रुपये आणून दाखव, मी तुझे लग्न करून देतो." त्याचा मामा म्हणाला.
"शंभर रुपयेच ना? डोंगरापलीकडच्या गावी पुष्कळ कामे मिळतात. मी तिकडे जाऊन एका वर्षाच्या आत शंभर रुपये घेऊन येतो. परंतु तोपर्यंत तुम्ही थांबलं पाहिजे आणि मेरेशी आपल्या मुलीचे लग्न करून दिले पाहिजे." गणू म्हणाला.
"कबूल, एका वर्षभरात शंभर रुपये मिळवून आणून दाखव!" मामा म्हणाला.
गणू त्याच दिवशी निघाला आणि डोंगरापलीकडच्या गावी आला. त्या गावात खरोखरच पुष्कळ कामे मिळत. शंभर रुपये एका वर्षात मिळविणे तेवढे कठीण नव्हते. गणू एका श्रीमंत माणसाच्या घरी जाऊन म्हणाला— "काय हो, मी शेजारच्या गावचा एक मजूर आहे, काम करून चार पैसे मिळवायला आलो आहे. तुमच्या आवारात झोपडे बांधून राहावे म्हणतो." त्या श्रीमंताने त्याला होकार दिला.
गणू त्याच दिवसापासून त्या श्रीमंताच्या आवारात झोपडे बांधून राहू लागला. तो दररोज जे पैसे मिळत ते एका मडक्यात साठवू लागला. एक चांदीचा रुपया मिळण्याइतके पैसे जमा झाले की लगेच एक रुपया घेऊन तो त्या मडक्यात टाकी. दररोज रात्री तो एकदा मडक्यात किती रुपये जमले हे उचलून पाही. आणखी किती रुपये जमवावे लागतील हिशोब करी. त्याला तोच एक विरंगुळा झाला होता.
एक वर्ष पुरे व्हायला झाले आणि मडक्यात शंभर रुपये जमले. तो सावकाराला जाऊन भेटला आणि म्हणाला— "काका! मी आपल्या गावी परत जायचा विचार करतो आहे. निरोप घ्यायला आलो आहे."
सावकाराने विचारले— "किती रुपये जमविलेस रे तू? आमच्या गावी येणारे लोक कधी रिकाम्या हाताने गेलेले मी पाहिले नाहीत!"
गणू आपल्या गाठोड्यातले मडके बाहेर काढून दाखवीत म्हणाला— "जास्त नाहीत, बरोबर शंभर रुपये आहेत."
मडक्यात शंभर रुपये असल्याचे ऐकून त्या श्रीमंताच्या मनात एक दुष्ट विचार आला. तो गणूला म्हणाला— "काय रे, गावात नवखा म्हणून राहायला जागा दिली तर आमच्या घरातले हे मडके उचलून घेऊन पळण्याचा विचार करतो आहेस का? चल राजाकडे, तुला तुरुंगात पाठवितो."
त्या श्रीमंताने केलेली फिर्याद ऐकून राजाने गणूला विचारले— "काय रे तू हे पैसे स्वतः मिळविलेस की चोरलेस?"
गणू म्हणाला— "महाराज! डोंगरापलीकडच्या गावचा राहणारा आहे मी. मजुरी करून मी शंभर रुपये मिळविले आहेत हे. काम करून पैसे मिळवायला आलो होतो चोरी करायला नव्हतो आलो. मी स्वतःचा घाम गाळून मिळविले आहेत हे पैसे. बरोबर शंभर रुपये आहेत हे."
"खोटे! हे सर्व खोटे आहे. मी बायकोचे दागिने करण्यासाठी या मडक्यात शंभर रुपये जमा केले होते. मी बोलताना केव्हा तरी या लबाडाजवळ ती गोष्ट सांगितली होती. परंतु हा चोरी करील, याची स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती मी!"
राजाला काय करावे कळेना. दोघांचे म्हणणे खरे वाटत होते त्याला. ते ओळखून मंत्री म्हणाला— "महाराज! ते मडके येथेच ठेवून घ्यावे उद्याच्या सभेत आपण काय तो निर्णय द्यावा."
त्या दिवशी रात्री मंत्र्याने अगदी तशीच दोन मडकी मागवून एकात शंभर रुपयांहून दोन तीन रुपये कमी आणि एकात दोन तीन रुपये जास्त ठेवले आणि गणूने आणलेल्या मडक्या शेजारी ती दोन्ही मडकी ठेवविली.
दुसऱ्या दिवशी ठरल्या वेळी सभेत मंत्र्याने एका टेबलावर तिन्ही मडकी आणून ठेवली आणि त्या श्रीमंताला आल्याबरोबर विचारले— "काय हो यातले तुमचे मडके कोणते हे सांगाल का जरा!"
"सर्व मडकी एकाच सारखी आहेत. कशी ओळखता येतील?" तो श्रीमंत म्हणाला.
परंतु गणूने पुढे येऊन तिन्ही मडकी एकेक करून उचलून पाहिली आणि आपले मडके हातात घेऊन म्हणाला— "महाराज! हे आहे माझे मडके. या मडक्यात बरोबर शंभर रुपये आहेत. इतर मडक्यात दोन कमी तरी आहेत किंवा जास्त तरी आहेत."
त्याने दाखविलेल्या मडक्यातले रुपये काढून मोजून पाहिले तर बरोबर शंभर निघाले. गणू निर्दोष असल्याचे राजाला कळले. श्रमाचे वजन श्रम करणाऱ्यालाच कळते. बसल्या जागी पैसे मिळविणास कसे कळणार? राजाने त्या श्रीमंताला दोनशे रुपये दंड करून ते रुपये गणूला देवविले.
गणू ते रुपये आणि स्वतःच्या मेहनतीचे शंभर रुपये असे तीनशे रुपये घेऊन आपल्या गावी गेला. त्याने ते आपल्या मामाला दिले. त्याचा मामा चकितच झाला. वचन दिल्याप्रमाणे त्याला त्याच्या मुलीशी गणूचे लग्न करून द्यावे लागले.
गणूचा संसार सुखाचा झाला.