Bookstruck

शिक्षेतून सुटका नव्हती

जेव्हा हेमचंद्र हेलापुरीचा राज्यकर्ता होता, तेव्हा देवाच्या मूर्तीपुढे नतमस्तक असलेला भक्त किंवा पूजेत मग्न असलेल्या अर्चकाला कैद करायचे नाही असा दंडक राज्यात प्राचीन शिलालेखावरून रूढ होता. पूजा, प्रार्थना संपवून भाविक मंदिराबाहेर आला की सैनिक त्याला नंतर पकडून नेत असत. या कायद्याची पळवाट शोधून गुन्हेगार शिक्षेतून वाचण्यासाठी निरनिराळे उपाय शोधून काढीत असत. सैनिक येत आहेत असं समजलं की अपराधी मंदिरात शिरत, आणि मूर्तीसमोर हात जोडून, डोळे मिटून बसून राहात. त्यांची प्रार्थना संपतच नसे. मग कधीकधी सैनिक कंटाळून निघून जात. सैनिक निघून गेले की अपराधी बाहेर येत व चटकन निसटून जात. मग त्यांचा शोध घेणे हे जास्तच अवघड काम होऊन बसे. हेमचंद्र राजाकडे चंद्रहास हा सल्लागार नुकताच नोकरीवर रुजू झाला होता. त्याने या कायद्यांतली त्रुटी राजाच्या निदर्शनास आणली व म्हटले, "महाराज, देवाचे मंदिर हे परम पवित्र स्थळ असते. मानवाचे जीवन चढउतारांनी भरलेले असते, त्यामुळे त्याच्या मनांत पापाविषयी भीती व परमेश्वराविषयी श्रद्धा आवश्यक व उपयुक्त आहे. पण मूर्तीसमोर बसणाऱ्या अपराध्याला पकडू नये असा जो शिलालेख आहे, त्याचा फार दुरुपयोग केला जातो आहे. त्याच्याआड गुन्हेगार लपतो व सैनिकांना चुकवून पळून जाऊ शकतो. दिवसेंदिवस अपराध्यांची संख्या वाढत चालली आहे. आपण या रूढीबद्दल खोल विचार करावा. न्यायाधीशांशी विचार विनिमय करावा, आणि योग्य तो निर्णय घ्यावा." चंद्रहासचे बोलणे राजाने लक्षपूर्वक ऐकले, व त्यावर राजा म्हणाला, "हा शिलालेख आमच्या पूर्वजांनी अमलात आणलेला असून ही रूढी अशी एकदम बदलणे योग्य होणार नाही." चंद्रहास लगेच गप्प बसला खरा, पण त्याविषयी तो जास्त खोल विचार करू लागला. एके दिवशी सैनिक एका चोराचा पाठलाग करीत आले. सुगंधीपुरांतल्या एका स्त्रीच्या दागिन्यांची चोरी करून तो चोर इकडे पळून आला होता. पळता पळता मागोमाग सैनिकांना येताना पाहून तो एका झोपडीकडे वळाला. तिथे त्याला हळद व कुंकू माखलेला एक मोठासा दगड दिसला. झालं, त्या दगडापुढे उभा राहून चोराने हात जोडले व त्याची प्रार्थना सुरु झाली. त्याचा पाठलाग करणारे सैनिक थांबले व आपापसांत बोलू लागले, "आता हा देवीच्या मूर्तीसमोर उभा आहे. आता कांही त्याला पकडता येणार नाही. आपण इथेच थांबून त्याची वाट पाहायला हवी." चोराने डोळे मिटले होते आणि मूर्तीसमोर त्याने आसनमांडी घातली. तो प्रार्थनेत मग्न आहे असे वाटत होते. पण त्याचे हे ढोंग आहे हे सैनिकांना माहिती होते. थोड्या वेळानंतर सैनिकांनी त्याला वेढा घातला. आता आपण कांही सुटत नाही, हे चोराला कळून चुकले. त्याने आवाज चढवून विचारले, "दिसत नाही का तुम्हाला? माझी पूजा चाललीय. देवासमोर मला अटक करताय?" तो पुढे कांही बोलणार तेवढ्यांत तो गप्प झाला. कारण सैनिकांनी तो हळदीकुंकवाने माखलेला तो दगड तिथून उचलून बाहेर नेला. चोराला पकडण्यांत आले. दुसऱ्या दिवशी न्यायाधीशाकडून राजाला ही हकीकत समजली. चंद्रहासच्या सल्ल्यानुसार त्यांतली उणीव राजाच्या लक्षात आली. त्याने ताबडतोब त्या शिलालेखांतली "पूजेत गर्क असणाऱ्यांना कैद करूं नये" ही आज्ञा रद्द केली. तेव्हापासून अपराध्यांची संख्याही कमी झाली, व गुन्हेगारांना शिक्षेतून सहज सुटका होणे बंद झाले.