All Marathi Stories

विश्वासपात्र नोकर

एका गावी रामू व सोमू नावाचे दोघे मित्र राहत असत. दोघे गरीब होते. लहान मोठी कामे करून ते आपला उदर निर्वाह चालवीत. एकदा दोघे शेजारच्या एका श्रीमंत शेतकऱ्याकडे गेले. शेतकऱ्याच्या नोकराने घरात जाऊन दोघे आल्याचे सांगितले. त्या शेतकऱ्याने त्याच नोकराकरवी दोघांना सोमवारी सकाळी यायला सांगितले. दोघे निराश होऊन आपल्या गावी निघून गेले. "काय रे, त्यांना विचारायचे होते तर आजच कां नाही बोलावून विचारले? सोमवारी कशाला बोलाविले आहे?" सोमू थोडा चिडल्यासारखा होऊन म्हणाला. सोमवारी पहाटे रामू सोमूला उठवून म्हणाला- "अरे चल! आपल्याला सोमवारी सकाळी बोलाविले आहे ना?" परंतु सोमू लोळत म्हणाला- "होय रे, तू हो पुढे, मी येतो मागाहून!" "बरं बुवा! तू काय वाटेल ते कर. मी आपला पुढे जातो." रामू निघून गेला. रामू निघून गेल्यावर तासा दीडतासाने सोमू उठला आणि सावकाश त्या शेतकऱ्याच्या गावी निघाला. त्याने विचार केला, तो शेतकरी घरात बसून राहील आणि काही तरी सांगून पाठवून देईल. उगाच जायचे आणि यायचे. रामू तरी उगाच इतका पछाटे उठून गेला आहे. रामूला आलेला पाहून त्या श्रीमंत शेतकऱ्याच्या नोकराने आत जाऊन मालकाला कळविले. मालकाने एकटाच मजूर आला आहे हे कळल्यावर दुसरा केव्हा येणार आहे हे विचारून यायला सांगितले. रामूने, थोड्या वेळाने येणार असल्याचे सांगितले. मालकाने ती गोष्ट कळल्यावर दुसरा येईपर्यंत थांबायला सांगून पाठविले. थोड्या वेळाने सोमू आला आणि म्हणाला- "रामू, मी तुला नव्हते का सांगितले, पण तू ऐकशील तर ना? आधी येऊन तू काय केलेस?" दोघे आल्याचे कळल्यावर शेतकरी स्वतः बाहेर येऊन म्हणाला- "असं! तुम्ही दोघे आला आहात का? बरं, आज जा, बुधवारी उजाडताच येऊन मला भेटा!" दोघे परत घरी निघाले. "हा शेतकरी उगाच आपल्याला पिडवतो आहे, काम नाही अन् पगार नाही. बुधवारी गेल्यावर शुक्रवारी यायला सांगेल. उगाच जायचे आहे." सोमू म्हणाला. रामू घरी परत जात असता वाटेत त्याला सोमू भेटला. त्याने त्याला शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यायला सांगितल्याचे आणि भेटल्यावर जेवायला वाढल्याचे सांगितले. "अरे, भिकाऱ्यासारखा तू रोज त्याच्याकडे गेलास म्हणून त्याने आज जेवायला वाढले. उद्या याचसाठी तू जाणार आहेस वाटते?" सोमूने त्या शेतकऱ्याकडे आता जायचेच नाही असे मनाशी ठरवून टाकल्यासारखे दिसले. "अरे आपले काय गेले? तुला सुद्धा बोलाविले आहे! आपल्या कामाची गरज आहे, तो बोलावील तेव्हा गेले पाहिजे." रामू म्हणाला. "उद्या संध्याकाळी अगदी शेवटचे म्हणून मी जाईन. पुन्हा त्याने बोलाविले तर जाणार नाही." सोमू म्हणाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघे शेतकऱ्याच्या घरी गेले. नोकराने घरात जाऊन दोघे आल्याची वर्दी दिली आणि परत येऊन, मालकाने कामाविषयी उद्या सकाळी काय ते बोलू. आज रात्रभर तुम्ही येथेच राहा, असा मालकाचा निरोप सांगितला. सोमूला राग आला. म्हणाला- "आपण नाही राहत, वाट पाहत रात्रभर येथे! ती असेल श्रीमंत तर आपल्या घरचा काम नाही, असे सरळ सरळ कां नाही सांगत? नुसता झुलवितो आहे आपल्याला. रामू! तू सुद्धा चल. आपण घरी जाऊया." पण सोमू एकटाच गेला. शेतकऱ्याचा नोकर घरात गेला आणि थोड्या वेळाने येऊन रामूला म्हणाला- "तू रात्री येथेच राहतो आहेस ना? मालकाने हे पाच रुपये दिले आहेत, बाजारात जाऊन चादर वगैरे घेऊन ये." असे सांगून नोकराने रामूला पाच रुपये दिले. त्याने एक चादर व एक सुताची सतरंजी खरेदी केली आणि उरलेले पैसे परत आणून दिले. त्या दिवशी त्याला तेथे जेवायला वाढले आणि रामू खाऊन पिऊन झोपला. दुसऱ्या दिवशी श्रीमंत शेतकऱ्याने रामूला बोलावून घेतले व म्हणाला- "मी तुझी परीक्षा घेत होतो. मला वक्तशीरपणाने काम करणारा व विश्वासपात्र नोकर हवा होता. तुला मी सोमवारी बोलाविले होते. म्हणून सोमवारपासूनच तुला पगार मिळेल. तुला मी तीस रुपये पगार देईन. तुझे काम वसुली करण्याचे आहे. काही लोक कर्ज घेऊन गेले आहेत. त्यांच्याकडून मारहाण केल्याशिवाय कर्जाचे किंवा व्याजाचे पैसे वसूल करून आणावे लागतील. हळूहळू मी तुला काम पाहून पगारवाढ देईन." रामूला चांगले काम मिळालेले ऐकून सोमू आपल्या घाईबद्दल पश्चात्ताप करू लागला.