Bookstruck

वसूल व्हायचे कर्ज

गणूशेट सावकारीचा धंदा करीत असे. त्याच्या एकुलत्या एका मुलाचे नाव होते हरिशेट. त्याला पंचविसावे वर्ष लागताच त्याच्यावर सावकारीचा धंदा टाकावा असा गणूशेटने विचार केला. एके दिवशी त्याने ज्या ज्या लोकांना कर्जे दिली होती त्यांची नावे व त्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमा मुलाला दाखविल्या व कोणी किती पैसे फेडले आणि आणखी किती येणे आहे, या सर्व गोष्टी सविस्तर सांगितल्या— "अरे, होय, हे बघ आपण लगेच चंद्रपूरला गेले पाहिजे." इतक्या घाईघाईने बाबा चंद्रपूरला का निघत आहेत, हे हरिशेटला कळेना. त्याने तसे वडिलांना विचारलेही. तेव्हा गणूशेट म्हणाले— "अरे, चंद्रपूरलाच नव्हे आपण रामपूरला सुद्धा गेलं पाहिजे. आपण परत गावी येईपर्यंत आपण का जात आहोत, तिथे मी काय बोललो याविषयी तू मध्ये काही विचारू नकोस. मला राग येईल." दोघे चंद्रपूरला पोहोचल्याबरोबर गणूशेट रामजी नावाच्या एका शेतकऱ्याच्या घरी गेले. रामजीने त्यांना विचारले— "कसं काय शेटजी! असे एकदम कसे काय येणं झालं?" "तसं काही विशेष नाही रामजी! मी रामपूरला जात होतो, वाटेत इकडे आलो. जातच होतो तर वाटेत तुम्हांला भेटून तुमची रक्कम केव्हा किती देता, हे विचारून जावं. आत्तापर्यंत तुम्ही दर महिन्याला हप्ते भरायचे कबूल केलेली रक्कम चार हजार रुपयांची रक्कम सोडून तुमच्यावर आणखी पाच हजारांचे कर्ज आहे. बाकीची रक्कम सुद्धा लवकर फेडणं बरं होईल!" गणूशेट म्हणाले ते ऐकून रामजी संतापून म्हणाले— "शेटजी, तुमचं वय वाढलेलं आहे त्या बरोबर तुमचं डोकं सुद्धा मंद पडत चालल्यासारखं दिसतं आहे! मी आजपर्यंत कबूल केल्याप्रमाणे दर महिन्याला हजार प्रमाणे चार हजार फेडले आहेत. आता माझ्यावर उरलेले कर्ज फक्त तीन हजारच आहे. आणखी कोणाचं कर्ज माझ्या डोक्यावर टाकायचा विचार आहे की काय?" "बरोबर म्हणालात!" असं म्हणत चुटकी वाजवून गणूशेट पुढे म्हणाले— "अरे हो, ते दगडूला दिलेले कर्ज! मी चुकून तुमच्यावरचे कर्ज म्हणालो!" त्यानंतर बाप व मुलगा रामपूरला गेले व भीमराव नावाच्या शेतकऱ्याला भेटून म्हणाले— "भीमराव, तुम्ही आत्तापर्यंत फेडलेली रक्कम फक्त दोन हजार रुपयेच. चार हजाराची रक्कम केव्हा देणार म्हणता?" भीमराव थोडासा भीतभीतच म्हणाला— "शेटजी, मी फेडलेली रक्कम दोन हजार नाही, तीन हजार! आता तुम्हांला मी व्याजासकट द्यायची रक्कम आहे तीन हजार पाचशे रुपये! या महिन्यात सर्व रक्कम एकदम द्यायची म्हणतो आहे मी!" लगेच गणूशेट म्हणाला— "भीमराव, मी चुकून गणोजीकडून यावयाची रक्कम तुम्हांला सांगितली. तुमचा हिशोब तर तुम्ही म्हणालात तसाच आहे हो!" असे सांगून गणूशेट मुलासह घरी परतले. हरिशेटने वडिलांना विचारले— "आपल्याला कोणाकडून किती रक्कम यायची आहे, हे हिशोबाच्या वहीत पाहिल्याशिवाय एकचुटकी मारून सांगणारे तुम्ही एकाकडून वसूल व्हायची रक्कम दुसऱ्यावर कशी काय घातलीत आणि हा गोंधळ का केलात?" गणूशेट हसत म्हणाला— "खरं सांगू का, त्या रामजीकडून आणि भीमरावाकडून आपल्याला मिळायची रक्कम किती आहे, याचे कर्जरोखे व हिशोब कोठे गेले कळेना. म्हणून त्यांच्या तोंडून त्यांनी फेडलेली रक्कम आणि त्यांच्याकडून आपल्याला परत यायची रक्कम मी वदवून घेतली. म्हणून तू लवकर एका नव्या वहीत त्या रकमा लिहून ठेव."