All Marathi Stories
वराची निवड
चंदन देशाचा राजा विक्रम याला मुलगा नव्हता. केवळ एक मुलगीच काय ती होती. तिचे नाव होते श्रीलेखा. एकुलती एक असल्यामुळे तिचे खूप लाड केले गेले. वयात आली तेव्हा ती अत्यंत सुंदर व असामान्य विदुषी म्हणून नावारूपास आली. आपल्या मुलीमुळे राजाचे मन नेहमी प्रसन्न असे. तिच्याबद्दलच्या अभिमानाने त्याची छाती नेहमीच फुगलेली असे.
आता राजाच्या मनात श्रीलेखेच्या विवाहाबद्दल चिंता उद्भवली! योग्य अशा मुलाची निवड केली पाहिजे. शेवटी आपला जावई बनून येणारा मुलगाच तर सिंहानाचाही वारस बनणार! अशा विचारांनी राजा विक्रम बेचैन झाला.
एक दिवस राजा विक्रमवर्माच्या दरबारात एक पंडित आला. आपला परिचय करून देताना तो म्हणाला- "राजा, माझं नाव आहे केशवभट्ट! मी मध्यदेशच्या काशी आणि तक्षशिला-विद्यापीठांमधल्या सर्वच्या सर्व पंडितांशी शास्त्रार्थ करून त्यांचा पराजय केला आहे. इथेही शास्त्रार्थ करायची माझी इच्छा आहे. मी तीन प्रश्न विचारीन. कोणी उत्तर देऊ शकलं तर मी त्याला वाकून नमस्कार करीन, आपल्या सर्व पदव्या त्याला बहाल करून, हा हातातला तोडाही देऊन टाकून इथून चालता होईन. पण याउलट तुझ्या कोणीही देशवासी उत्तर देऊ शकला नाही, तर मात्र माझी अट ऐकून ठेवा-तुझ्या सर्व दरबारी पंडितांनी मला पालखीत बसवून, स्वतःच्या खांद्यावरून मला मिरवून आणायचं, अन् मग तू माझा सन्मान करायचास!"
"पंडितमहाराज, आपल्या अटी आम्हाला कबूल आहेत! आता आपले तीन प्रश्न सांगा. माझे नागरिक तीन दिवसातच त्यांची उत्तरं सांगतील." राजा विक्रमवर्मा गंभीर स्वरात बोलला.
केशवभट्ट आपले प्रश्न उच्चारू लागला- "पहिला प्रश्न-एक असं सत्य सांगायचं की, ते सत्य खरं मानायला कोणी 'नाही' म्हणणार नाही, पण ते अगदी निखालस 'खोटं' असेल! दुसरा प्रश्न-ऐकू येत नाही असा आवाज आणि दिसू शकत नाही असं दृश्य कोणतं? आणि शेवटचा तिसरा प्रश्न-अगदी रंकापासून रावापर्यंत सर्वजण जिच्या आहारी जातात अशी गोष्ट कोणती?"
केशवभट्टचे प्रश्न ऐकून विक्रमवर्माच्या दरबारी पंडितांचे चेहरे पांढरे फटक पडले! त्यांचे पडलेले चेहरे पाहून केशवभट्ट मनातल्या मनात खूष झाला. त्याची खात्री झाली, की इथेही कोणी आपल्याला उत्तर देऊ शकणार नाही, आणि विजयश्री आपल्यालाच मिळणार! मोठ्या आनंदाने तो तेथून निघून गेला.
दरबारी पंडित केशवभट्टाच्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यासाठी डोकी लढवू लागले. आपापसात वादविवाद करू लागले. आपापल्या पद्धतीने ते त्या प्रश्नांची उत्तरे सांगू लागले. पण राजा विक्रमवर्माला कोणाचीच उत्तरे बरोबर वाटत नव्हती. तेव्हा तो म्हणाला- "केशवभट्ट अहंकारी असेल, पण तरीही तो मोठा बुद्धिमान नक्कीच वाटतो. त्याच्या प्रश्नांची उत्तरे शोधायचं काम चालू ठेवा."
नंतर सभा समाप्त करून राजा विक्रमवर्मा अंत:पुरात आपल्या कन्येला भेटायला गेला. अशा वेळी चिंतित मुद्रेने आलेल्या आपल्या पित्याला पाहून श्रीलेखा आश्चर्यचकित झाली. दरबारात घडलेल्या घटनेबद्दल तिला सांगून राजा म्हणाला- "मला तर पराजयाची चिन्हे दिसत आहेत बाळा! चांगल्या सुसंस्कृत माणसासमोर पराजय होणे प्रगतिकारक असतं, पण असल्या अहंकारी माणसाकडून होणाऱ्या पराजयाचं दुःख मरणासमान वाटतं, आत्महत्याच करावीशी वाटते अशा वेळी! एकच आशाकिरण या परिस्थितीत मला दिसतो आहे, अन् तो म्हणजे तूच बेटी!"
श्रीलेखाने जरासा विचार केला आणि ती म्हणाला- "बाबा, मलाही काही सुचत नाही पहा!"
हे उत्तर ऐकून राजा अगदी हताश झाला. सहजच त्याच्या तोंडून उद्गार निघाला- "आहे! आता काय होणार?"
पित्याच्या मनावरचा हा ताण पाहून जरासे हसून श्रीलेखा म्हणाला- "बाबा, तुम्ही काळजी करू नका. मला उत्तरं आली नाहीत म्हणून काय झालं! मी असं ऐकलं की आपल्या मंत्रीवरांचा पुत्र राजशेखर मोठा बुद्धिमान आहे! माझी खात्री आहे, की तो या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देऊ शकेल."
हे ऐकून राजा विक्रमवर्माला फारच आश्चर्य वाटले. "ठीक आहे, पाहू या." असे म्हणून तो तेथून उठला आणि निघून गेला. राजा तेथून सरळ महाराणी वैजयन्तीदेवीकडे गेला आणि या गोष्टीचा उल्लेख करून म्हणाला- "देवी, मी श्रीलेखाला चांगलं ओळखतो. तिला खरोखर उत्तरं माहित नसतील तर आपल्या देशावर आलेल्या आपत्तीमुळे तिला दुःख तर नक्कीच झालं असतं ना? पण तिच्या चेहऱ्यावर असा दृढविश्वास दिसून आला की राजशेखर मला नक्कीच योग्य उत्तर देऊ शकेल. मला तर काहीच कळत नाहीये!"
यावर हसत राणी म्हणाला- "आपण हा प्रश्न मला का बरं विचारत आहात? असंच ना, की एक स्त्री, दुसऱ्या स्त्रीचं मन बरोबर ओळखू शकते?" आता विक्रमवर्मालाही हसू आले. तो म्हणाला- "अं, असंच काही नाही! पण फक्त आणखी थोडं जाणून इच्छितो मी!"
"इतकंच असेल तर ऐका, श्रीलेखेच्या मैत्रिणीकडून मला असं कळलंय की तिला राजशेखर खूप आवडतो! अन् असंही कळलंय की राजशेखरची तिच्यावर खूप प्रेम आहे, श्रीलेखा आपल्याजवळ असं काही बोलली असेल तर नक्कीच तिच्या मनात असावं की या उत्तराद्वारे आपण राजशेखरची योग्यता स्वतःच पारखावी आणि तो तिच्या योग्य वर आहे की नाही याचा निर्णय घ्यावा." राणी वैजयन्ती म्हणाला.
"मग आता वाट कसली पहायची? ताबडतोब बोलावून घेऊ या त्याला!" राजा म्हणाला. थोड्याच वेळात राजशेखर तिथे पोचला. त्याचे देखणे रूप व धारदार नासिका वगैरे पाहून राजा मनातला मनात खूप खूष झाला. तो म्हणाला- "बस बेटा!" राजशेखर अदबीने समोर बसला.
आता राजाने राजशेखरला केशवभट्टचे प्रश्न सांगितले आणि म्हटले- "श्रीलेखाला खात्री वाटते की तू या प्रश्नांची उत्तरं देऊ शकशील?"
जरासे हसून राजशेखर बोलला- "महाराज, हा केशवभट्ट मोठा बुद्धिमान असला पाहिजे. त्याने या तीन प्रश्नात शास्त्र, कल्पना आणि वास्तविकता या तिन्हींचाही समावेश केलेला आहे. पहिला प्रश्न तर्कशास्त्राशी संबंधित आहे. त्याच उत्तर आहे-'मला मरण येणार नाही.' लौकिक दृष्ट्या हे विधान पूर्णतः खोटं आहे, कारण ज्याला मृत्यू नाही, असा जगात कोणीच नाही. पण, तरीही तर्काच्या आधाराने हे एक असे सत्य आहे की कोणीही ते नाकारू शकणार नाही. कारण इथे 'मी' हा आत्म्याशी संबंधित आहे, पार्थिव नश्वर देहाशी नव्हे. 'मला मरण येणार नाही'-याचा अर्थ 'माझा आत्मा मरणार नाही.' अशा तऱ्हेने हे एक असे सत्य आहे की जे कोणीही कबूल करायला कचरणार नाही. पण त्याच वेळी हे विधान अगदी पूर्णतः खोटंही आहे!"
राजशेखरच्या या स्पष्टीकरणावर राजा खूप खूष झाला. तो म्हणाला- "होय, तुझं म्हणणं बरोबर आहे. आता बाकीच्या प्रश्नांची उत्तरं सांग बेटा!"
"महाराज, ऐकू न येणारा आवाज म्हणजे आपल्या आत्म्याची हाक होय. ती मेंदूपर्यंत ध्वनितरंगांच्या आधाराने नव्हे, तर मनाच्या आधाराने पोचते, आणि ती केवळ तो अनुभव घेणाऱ्यालाच ऐकू येते, इतरांना नाही. आता राहिलं दुसऱ्यांना न दिसणारं दृश्य म्हणजेच देखावा. तो देखावा म्हणजेच केवळ आपल्या विचारांच्या साह्याने प्रत्येकाच्या मनोपटलावर दिसणारं दृश्य! ते केवळ अंतश्चक्षूंनाच दिसू शकतं. हे झालं न ऐकू येणारा आवाज आणि न दिसणारं दृश्य! दुसऱ्या प्रश्नांचं हेच उत्तर होय." राजशेखर म्हणाला.
राजाने प्रसन्नतेने एक वार राणीकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला.
"वा, वा! छानच सांगितलंस बेटा. एकदम उत्तम स्पष्टीकरण केलंस बघ!" राजशेखरकडे प्रशंसनीय दृष्टीने पाहत राजा बोलला.
"महाराज, आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऐकावं. रंकापासून राजापर्यंत प्रत्येक जण कशाला शरण जात असेल तर प्रशंसेला! स्तुतीच्या अधीन होत नाही असा माणूस विरळाच!" मोठ्या आत्मविश्वासाने राजशेखर बोलला.
"महाराज, आपण जे दृश्य पाहत आहात, ते तर मलाही दिसतयं!"
आश्चर्याने राजाने विचारले- "म्हणतोस काय? बरं, सांग पाहू ते दृश्य कोणते?"
जरासे संकोचत राजशेखर म्हणाला- "बास, आपली कन्या माझ्या गळयात वरमाला घालत आहे-हेच ते दृश्य!"
त्याच्या या उत्तरावर राणीला मनातल्या मनात हसूच आले. पण खोटच राग दाखवत राजा म्हणाला. "केवळ तीन प्रश्नांची उत्तरं बरोबर देता आली म्हणून स्वतःबद्दल इतका आत्मविश्वास बाळगतोस? तुला असं कसं वाटलं, की इतक्याशा कारणावरून मी राजकन्येचा विवाह तुझ्याशी करून देईन?"
राजाचा हा राग पाहून जराही विचलित न होता राजशेखर फक्त हसला अन् त्याने राजाला उत्तर दिले- "महाराज, आपल्या मनात जर तसा विचार नसता, तर मी उत्तरं दिली, तेव्हा आपण माझी इतकी स्तुती केली नसती! आपण फक्त इतकंच म्हणाला असता की-हं, ठीक आहे! त्या पंडिताला विचारून उत्तर बरोबर आहेत की नाहीत हे विचारून घेईन. आपण आपलं राजकार्य सोडून देऊन माझ्या बुद्धीची आणखी एक परीक्षा घेऊ पाहिली, याचा दुसरा काय अर्थ होऊ शकतो?"
हे त्याचे उत्तर ऐकून तर आनंदाने एकदम उठून राजाने राजशेखरला मिठीतच घेतले, आणि तो म्हणाला- "बेटा, तुझा जराही विचलित न होणारा आत्मविश्वास खरोखरच फार प्रशंसनीय आहे. श्रीलेखासाठी खरोखर तूच योग्य वर आहेस. आपल्या दोघांना जे दृश्य दिसलं ते लवकरच आपण इतर सर्वांनाही दाखवू या!"
त्या दिवशी संध्याकाळच्या सभेत उत्तरे ऐकून केशवभट्टने आपला पराभव कबूल केला. इतकेच नव्हे, तर त्या पंडिताने राजशेखरला मस्तक वाकून नमस्कार केला आणि आपल्या सर्व पदव्या त्याला बहाल केल्या. आपल्या पायातला तोडा काढूनही त्याने राजशेखरच्या पायात चढवला!
तोच मोठा शुभ मुहूर्त होता. सर्व दरबारी लोकांसमक्ष राजकुमारी श्रीलेखाने राजशेखरच्या गळयात वरमाला घातली.