Bookstruck

राक्षसी माळरान

मणिपूरच्या राज्यावर फार मोठा प्रदेश ओसाड किंवा पडित भूमीचा होता. त्याला 'राक्षसी माळरान' म्हणत. त्या माळरानात एक मोठे विवर होते. त्या विवरात एक राक्षसीण राहते व त्या माळरानात पाऊल टाकणाऱ्यांस खाऊन टाकते, असे त्या प्रदेशातील लोक सांगत. मणिपूरचा राजा निवर्तल्यावर त्याचा मुलगा सुदर्शन गादीवर बसला. त्या माळरानातल्या राक्षसिणीला ठार करून सर्व माळरान शेतीभातीच्या कामाला उपयोगी पडेल, या विचाराने नव्या राजाने लोकांच्या मनातले त्या राक्षसिणीचे भय काढून टाकावे असे ठरविले. सुदर्शनला सुमंत नावाचा एक हुशार मित्र होता. म्हणून त्याने आपला विचार सुमंतसमोर मांडला. "अरे, तुझ्या वाडवडिलांच्या काळापासून तुझ्या प्रजेच्या मनात त्या माळरानाविषयी जो अंधविश्वास आहे तो दूर करणे तितके सोपे नाही. त्या विवरात राक्षसीण नाही, असे आपण सांगितले तरी कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून आपण प्रजेला खरे वाटण्यासारखी परिस्थिती डोळ्यांनी पाहिली पाहिजे." असा विचार करून दोघे त्या माळरानात गेले. कोणाला काही कळू दिले नाही. ते माळरान कित्येक हजार एकरांवर पसरलेले होते. त्याच्या मध्यभागी ते विवर होते. दोघे त्या विवरात काही अंतर चालून गेले. परंतु ते आत जाऊ लागले तसतसे ते विवर चिंचोळे होत गेले. त्यात राक्षसीण असणेच शक्य नव्हते. परंतु ती गोष्ट प्रजेच्या लक्षात आणून देऊन त्या गोष्टीवर प्रजेचा विश्वास उत्पन्न करावयाचा होता. सुमंतने दोन हिरे त्या विवरात टाकले आणि दोघे राजवाड्यात परत आले. राजधानीत परतल्यावर सुदर्शनने दवंडी पिटविली— "राक्षसिणीच्या विवरात प्रवेश करून त्यात ज्या वस्तू आहेत त्या आणून देणाऱ्यास मोठे पारितोषिक देण्यात येईल." परंतु दवंडी ऐकून कोणी पुढे आला नाही. राजाने पोरकटपणाने असली दवंडी पिटविली असेल, असे प्रत्येकाला वाटत होते. म्हणून कोणी विवरात प्रवेश करण्याचे साहस करायला तयारच झाला नाही. मणिपूर राज्यातच रामदास व भीमसेन नावाचे दोन भाऊ राहत असत. भीमसेनने आपल्या कुटुंबाचा सर्व भार आपल्या मोठ्या भावावर टाकला होता व तो स्वतः पाळलेली कबुतरे उडवीत असे. एकदा रामदासला भीमसेनचा भयंकर राग आला. तो म्हणाला— "तू असला उडाणटप्पू पणा करीत बसण्यापेक्षा त्या राक्षसिणीच्या विवरात उडी टाकून जीव का नाही देत?" त्याच दिवशी भीमसेनने राजाची दवंडी ऐकली होती. भावाच्या रागावण्याचा त्याला फार मनस्ताप वाटला व त्याचे पौरुष जागे झाले. राक्षसिणीच्या बिळात उडी टाकायचे त्याने मनाशी ठरविले. भाग्याने साथ दिली तर राजाकडून पारितोषिक मिळेल आणि स्वतंत्रपणे पुढील आयुष्य घालवीन; नाहीतर राक्षसीण मोक्ष देईल, असे मनाशी ठरवून बरोबर थोडेसे काहीतरी खायला घेऊन आणि आपल्या पाळलेल्या कबूतराला खांद्यावर बसवून तो माळरानात राक्षसिणीच्या विवरापर्यंत येऊन पोहचला. राक्षसीण कोठून तरी येऊन आपल्याला खाईल अशी धाकधूक मनात होती, तरी त्याला विवरात पाऊल टाकायची हिम्मत होईना. भीमसेनने खाऊन पिऊन घेऊन पुढे काय करायचे ते करूया असे मनाशी ठरविले. त्याने भाकरीचा एक तुकडा त्या विवरात टाकला. आतून काही बाहेर येत आहे असे दिसले तर पळून जाण्याचे त्याने मनाशी ठरविले होते. पण अचानक त्याच्या खांद्यावरचे कबूतर उडून बिळात गेले. "हे कबूतर जिवंत परत आले तर आपण निश्चितपणे बिळात प्रवेश करायला हरकत नाही आणि राजाकडून जे पारितोषिक मिळेल ते घेऊन पुढील आयुष्य मजेत घालविता येईल," असा त्याने विचार केला. थोड्या वेळाने कबूतर परत आले. पण त्याच्या तोंडात भाकरीच्या तुकड्याऐवजी एक हिरा होता. भीमसेनला आश्चर्याबरोबर परमावधीचा आनंद झाला. तो हिरा आपल्या भावाला दाखवून म्हणाला— "दादा! पहा, हा हिरा मी राक्षसिणीच्या विवरातून घेऊन आलो आहे. मी हा विकून पुढे आरामात आयुष्य घालवावे म्हणतो." तो हिरा पाहून रामदासला दुर्बुद्धी झाली. तो भावाला म्हणाला— "अरे खुळ्या! तू हा विकणार? काही दिवसांनी आपण याच्याविषयी काहीतरी मार्ग काढू." दुसऱ्याच दिवशी रामदास तो हिरा घेऊन राजवाड्यात गेला आणि राजाला भेटून म्हणाला— "महाराज! राक्षसिणीच्या बिळातून हा हिरा आणला आहे. आपण जाहीर केलेले पारितोषिक देण्याची कृपा करावी." सुदर्शनने सुमंतला बोलविले. दोघांनी तो हिरा लक्षपूर्वक तपासून पाहिला. सुमंतने राक्षसिणीच्या बिळात टाकलेल्या दोन हिऱ्यांपैकीच तो एक होता. "आणखी एक हिरा या हिऱ्याबरोबर होता, तो तू गडप केलास वाटते? म्हणून तुला तुरुंगात पाठवितो," सुमंत म्हणाला. रामदास घाबरला. हात जोडून विनंती करीत म्हणाला— "मला पारितोषिक नको, तुरुंगात मात्र पाठवू नका." तो स्वतः हिरा घेऊन आला असता तर पारितोषिक इतक्या सहजी सोडायला तयार झाला नसता, असा विचार करून सुमंतने रामदासला विचारले— "खरे बोल, तुला हा हिरा कोठे मिळाला?" रामदासला वाटले की त्याचा भाऊ खोटे बोलला असेल. त्याने हा हिरा कोठून तरी चोरी करून आणला असेल. तो आरोप त्याच्यावरच आलेला बरा, असा विचार करून म्हणाला— "महाराज! हा हिरा माझा धाकटा भाऊ घेऊन आला. त्याला हा राक्षसिणीच्या विवरात मिळाला असे तो मला म्हणाला. मला यापलीकडे जास्त काहीच माहीत नाही." "तर मग तू जाऊन आपल्या धाकट्या भावाला बोलावून घेऊन ये," सुदर्शन म्हणाला. भीमसेनने येताच खरेखरे ते राजासमोर निवेदन केले. राजाला पण भीमसेनचे म्हणणे खरे वाटले. राजाने त्याला रात्रभर आपला अतिथी म्हणून राजवाड्यातच राहायला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात मोठ्या समारंभाने त्याचा सत्कार केला. राजा म्हणाला— "भीमसेन साहस करून राक्षसिणीच्या विवरातून हा हिरा घेऊन आला आहे. लोकांना हे कळावे म्हणून आम्ही स्वतः त्या विवरात प्रवेश करून आपला हा हिरा त्या विवरात टाकला होता. त्यात राक्षसीण नाही हे आता सिद्ध झाले आहे. भीमसेनच्या साहसाबद्दल आम्हांला आनंद होत आहे व हे माळरान त्याने दाखविलेल्या साहसाबद्दल त्याला बक्षीस देण्यात येत आहे. कोणाला या माळरानात शेती करावयाची असेल तर त्यांनी भीमसेनकडून जमीन खंडावर घ्यावी," राजाने सभेत जाहीर केले. लोकांच्या मनातून राक्षसिणीच्या माळराणाची भीती नाहीशी झाली. सर्वांनी भीमसेनकडून खंडाने जमीन घेतली. भीमसेन एक मोठा जमीनदार झाला.