रंगनाथाचे लग्न
रंगनाथाला पंचविसावे वर्ष लागले, तरी तो कोणतेही काम जबाबदारी घेऊन करण्यालायक नव्हता. बापाने त्याला लाडात वाढविले होते. विद्याभ्यासातही तो बेताचाच होता. उडाणटप्पूणाच त्याच्या अंगात शिरला होता. घरची स्थितीपण बेताचीच होती.
परंतु तो दिसायला गोरागोमटा होता. म्हणून काहीजण त्याला आपली मुलगी द्यायला तयार होते.
रंगनाथाच्या ओळखीचे लोक त्याला म्हणत— "हे बघ रे, तू एखादी चांगली नोकरी करू लागलास तर अप्सरेसारख्या मुली तुझ्यावर तुटून पडतील."
रंगनाथ त्यांना म्हणे— "माझे बाबा माझ्याबरोबर आणखी एकाला जेवायला घालू शकणार नाहीत का?"
एकदा त्याचा एक मित्र शेजारच्या गावी एका मुलीला पाहून आला व त्या मुलीचे वर्णन करून सांगू लागला. म्हणाला— "अरे काय सांगू, फक्कड मुलगी आहे बघ! शिवाय तिच्या आईजवळ खूप पैसेसुद्धा आहेत. ती मुलगीच आईच्या इस्टेटीला वारस आहे. ती म्हातारी दुर्गाबाई थोडी फटकळ आहे. मला म्हणाली— 'माझी मुलगी मी मदनाचा पुतळा असेल त्यालाच देईन.' तू जाऊन तर पहा एकदा मुलीला! त्या मुलीशी तुझे लग्न झाले तर तुला नोकरी बिकरीची गरजच काय? घरजावई होऊन राहतां येईल!"
रंगनाथाला ते फार आवडले. दुसऱ्याच दिवशी तो आपल्या वडिलांना सांगितल्याशिवाय शेजारच्या गावी निघाला. रंगनाथाला दुर्गाबाईचे घर सहजी मिळाले. दाराची कडी वाजविताच दुर्गाबाईने स्वतःच येऊन दार उघडले आणि विचारले— "कोण रे बाबा, तू? तू माझ्या राणी बेटीला पाहायला आला आहेस वाटतं?"
दुर्गाबाई थोडी लठ्ठ अशी, एक विधवा बाई होती.
रंगनाथाने होकारार्थी मान हलविली.
"बेटा राणी! अग इकडे ये, तुला पाहायला पहा, कोण आलं आहे ते!" दुर्गाबाईने मुलीला बोलाविले. राणी वाचीत होती, हातातलं पुस्तक घेऊन आली आणि चिडक्या स्वरात म्हणाला— "पुन्हा लग्नाच्याच गोष्टी!" रंगनाथ त्या मुलीला पाहून थक्क झाला.
"तुमचं नाव? कोठे राहतां? शिक्षण कोठवर झालं आहे?" वगैरे प्रश्न धडाधड राणीने विचारले. रंगनाथने त्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे दिली. ती ऐकून राणी घरात निघून गेली.
त्यानंतर दुर्गाबाई रंगनाथाला म्हणाली— "बेटा, आता तू ये बरं! आम्ही लवकरच काय ते कळवू!"
त्या घरातला थाटमाट, राणीचे सौंदर्य व प्रश्न इत्यादी गोष्टी पाहून रंगनाथाला आपल्या नशिबात ही मुलगी नाही असेच वाटले. परंतु दुर्गाबाईने बरोबर एका आठवड्यानंतर रंगनाथाच्या घरी निरोप पाठविला— "आम्हाला तुमच्या मुलाचे स्थळ पसंत आहे, मुहूर्त वगैरे ठरविण्यासाठी यावे."
रंगनाथाच्या वडिलांना काही माहीतच नव्हते. चौकशी करता त्यांना कळले की मुलीच्या घरची आर्थिक स्थिती चांगली आहे. मुलीला वडील नाहीत व भाऊ ही नाही. लोक त्याला म्हणाले— "हे स्थळ घालवून बसू नका! चालून आलेली लक्ष्मी परतवू नका!"
लवकरच रंगनाथाचे लग्न थाटामाटाने झाले. चार-पाच दिवस लग्न घरी राहून रंगनाथाचे वडील इतर नातेवाईकांबरोबर घरी परतले.
रंगनाथाला वाटले की त्याची सासू त्याला घरजावई करून घेणार. म्हणून तो बायकोला घेऊन परतला नाही. परंतु एकदा बोलताना दुर्गाबाई त्याला म्हणाली— "तुम्हाला कळलंच असेल जावईबापू! पाटलांचा दुसरा जावई महिन्यातले पंधरा दिवस सासुरवाडीच राहतो आणि मेजवान्या उडवितो. पाटलाच्या जागी मी असते तर लाथ मारून त्याला घराबाहेर काढले असते!"
ते ऐकून रंगनाथाच्या डोक्यात प्रकाश पडला. आपली सासू आपल्याला घरजावई करून घ्यायला तयार नाही.
दोन-तीन दिवसांनी रंगनाथ मनाचा थोरपणा दर्शवीत म्हणाला— "मामी, आतां तुम्ही या वयात एकट्या किती काळ राहणार हो? आमच्याबरोबर चला ना, आमच्याच घरी रहा!"
परंतु उसकी सासू म्हणाली— "बेटा, ज्याला जेथे राहणे योग्य तेथेच त्याने रहावे तरच त्याचा मान राहतो. मला आतां कोठे पन्नासावे वर्ष लागलं आहे. उद्यांचा दिवस चांगला आहे प्रयाणाला, तुम्ही निघायला हरकत नाही." दुर्गाबाई म्हणाली.
नाईलाजाने रंगनाथ राणीला घेऊन आपल्या गावी परतला. आजपर्यंत तो एकटा होता, म्हणून बेफिकीरपणे राही. आतां राणीचं ओझं त्याच्या डोक्यावर होतं. आपल्या बायकोचा खर्च वडिलांवर टाकणे त्याला लज्जास्पद वाटू लागले. म्हणून तो एकदा बायकोला म्हणाला— "मी काहीतरी व्यापारधंदा करावा म्हणतो. तू भांडवलासाठी आईकडून पाच हजार रुपये मागून आण."
राणी हसली व म्हणाली— "वाळूतून तेल काढता येईल, परंतु माझ्या आईच्या हातातून एक पैसा काढणे शक्य नाही."
तरी रंगनाथाने कोणाबरोबर तरी सासूकडे निरोप पाठविला की त्याला व्यापार करण्यासाठी पाच हजार रुपयांची गरज आहे.
दुर्गाबाईने लगेच उत्तर पाठविले— "ज्याच्याजवळ व्यापार करण्यापुरेसे पैसे नाहीत त्याने व्यापारात उतरायच कशाला? त्याला सांगा, कोठे तरी नोकरी कर. सोन्याच्या बाहुलीसारखी मुलगी दिली आहे मी! त्याने एका पैशाची ही अपेक्षा ठेवणे इष्ट नाही!"
तो निरोप ऐकून रंगनाथ निराश झाला. त्याने विचार केला की आळशासारखे बसून भागणार नाही. जो पुरुष चार पैसे मिळवीत नाही, त्याची फिकीर बायकोसुद्धा करीत नाही. आयुष्यभर दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहत राहून स्वतःची मान खाली करून घेणे मूर्खपणा आहे.
असा विचार करून रंगनाथने धावपळ सुरू केली व एका महिन्याच्या आत त्याला आयुष्यातल्या खऱ्या आनंदाचा अनुभव कळला. त्यापूर्वी त्याला आयुष्य एक ओझे वाटत होते. कधीकधी त्याला स्वतःचाच राग येई. परंतु आतां त्याचा उत्साह वाढला. एक वर्ष लोटले असेल आणि रंगनाथाला पितृत्व आले.
आपल्या नातीला पाहायला दुर्गाबाई धावत आल्या. नातीच्या गळ्यात सोन्याची माळ घालीत त्या रंगनाथाला म्हणाल्या— "बेटा, किती बदल झाला रे तुझ्यांत, मला फार बरं वाटलं. तू दिसायला किती सुंदर आहेस, तुझं कुटुंबपण प्रतिष्ठित आहे. परंतु चौकशी केल्यावर मला कळले की तू आळशासारखा घरी बसून पुक्क्या झोडतोस आणि आपली जबाबदारी तुला कळत नाही. तरी मी आपल्या मुलीचं लग्न तुझ्याशी या विश्वासावर करून दिलं की अंगावर जबाबदारी येऊन पडल्यावर तू आपोआप सुधारशील. तुझा आळशीपणा दूर करण्यासाठीच मी इतका निष्ठूरपणा केला होता. माझ्याजवळ जे आहे, ते मी बरोबर नेणार आहे का? हे सर्व तुमचंच आहे!"
ते ऐकून रंगनाथ आत्मविश्वासपूर्वक म्हणाला— "मला जी प्राप्ती होते आहे, ती माझ्या कुटुंबाला सुखाने संसार चालवायला पुरेशी आहे. तुम्हांला काही द्यावयाचेच असेल तर आपल्या नातीला द्या!"