योग्याचा महिमा
प्राचीन काळी सिंहपुरी नगरीत एक योगी रहात असे. त्याच्याबरोबर अनेक शिष्यपण असत. तो योगी मधून मधून राजाकडे जाई आणि धर्म व नीति संबंधाने उपदेश करून राजाच्या मनाला शांति देत असे. म्हणून राजाच्या मनात योग्याविषयी फार श्रद्धा व भक्ति होती.
राजाने एकदा योगीराजांना राजवाड्यातच येऊन रहायला सांगितले आणि त्याच्यासाठी व त्याच्या सर्व शिष्य वृंदासाठी सर्व व्यवस्था राजवाड्यात करून देण्यात येईल, असे देखील सांगितले.
परंतु योग्याला ते पसंत पडले नाही. तो म्हणाला— "राजा, मी एक नियम केला आहे, दर रोज फक्त पांच घरी भिक्षा मिळेल तिच्यावर त्या दिवसाची भूक भागवायची. एकाच घरी राहून पोट भरतां येणार नाही, मला."
योगी म्हणाला ते ऐकल्यावर राजाने राज्यभर दवंडी पिटविली की योगी किंवा त्याचे शिष्य कधी भिक्षा मागायला आले तर त्यांना पोटभर भिक्षा घालावी. म्हणून त्या दिवसापासून योग्याला व त्याच्या शिष्याला पुष्कळ भिक्षा मिळू लागली. ते पाहून कित्येक गरीब लोक त्या योग्याच्या शिष्टमंडळीत सामील झाले.
एकदा योगी भिक्षेला निघाला आणि एका ताडीच्या दुकानासमोर उभा राहला. दुकानदार बाहेर येऊन म्हणाला— "योगिराज! आत यावे. परंतु माझ्याकडे आपल्याला देण्यालायक काही नाही, आहे ती ही ताडी आहे."
योगी आत गेला. दुकानदाराने एका मातीच्या भांड्यात ताडी ओतून दिली. "कृष्णार्पणम्" म्हणत योग्याने एकाच घोटात ती सर्व ताडी पिऊन टाकली.
आपल्या गुरूला ताडी पिताना पाहून सर्व शिष्यांना फार आश्चर्य वाटले व आनंदही वाटला. सर्वांनी एकेक मातीचा पेलाभर ताडी पिऊन टाकली.
त्याचा परिणाम असा झाला की योग्याच्या सर्व शिष्यांना ताडीची चव कळली आणि चटकपण लागली. ते अट्टल पिणारे झाले.
दुसरी गोष्ट अशी घडली की राजाला ती गोष्ट कळली. योग्याने व त्याच्या शिष्यांनी ताडी प्याल्याचे कळल्यावर राजाने आपल्या द्वारपालांना त्या योग्याला किंवा त्याच्या शिष्याला राजवाड्यात पाऊल टाकू देऊ नका अशी आज्ञा केली.
अशा तऱ्हेने योग्याविरुद्ध गावभर चर्चा होऊ लागली. त्यामुळे लोकांच्या मनात योग्याविषयी घृणा भाव उत्पन्न झाला. म्हणून त्याला पुरेशी भिक्षा मिळेनाशी झाली. प्रत्येक घरासमोर त्याला फार वेळ उभे रहावे लागे. त्याच्या शिष्यांची उपासमार होऊ लागली. योग्यासोबत राहण्यात काही अर्थ नाही असे पाहून सर्व शिष्यमंडळी एकेक करून त्याला सोडून निघून गेली.
आणखी काही दिवस गेल्यावर तो योगी एका सोनाराच्या दुकानासमोर भिक्षेसाठी जाऊन उभा राहला. योग्याला पाहून सोनार थट्टेने म्हणाला— "योगिराज, आपल्याला देण्यालायक माझ्याकडे काही नाही. हे वितळलेले सोने आहे. देऊ का?"
योगी म्हणाला— "हो दे की." सोनाराने एका बारीकशा मातीच्या वाटीत चिमट्याने धरून वितळलेल्या सोन्याचा कढत रस आणून दिला. योग्याने डोळे मिटून "कृष्णार्पणम्" म्हणत तो सर्व रस पिऊन टाकला आणि ढेकर देत निघून गेला.
योग्याचे ते दिव्य राजाच्या कानावर गेले. तो योग्याचा महिमा पाहून चकित झाला. तो स्वतः त्या योग्याच्या शोधार्थ आला आणि त्याने त्याचे पाय धरून क्षमा मागितली.