मुलाचा निर्णय
आफ्रिका देशाच्या एका जंगलाजवळ डोटुन नावाचा एक गरीब माणूस राहायचा. जंगलातली लाकडे तोडून तो आपला उदरनिर्वाह करायचा. त्याला तुंडी नावाचा एक मुलगा होता. तुंडी दिवसेंदिवस मोठा होत होता. ते पाहताना त्याचे मन आनंदाने भरून यायचे. तुंडी बारा वर्षांचा झाला. त्याला आशा होती की आता तुंडी आपल्याला हातभार लावू लागेल व आपले आयुष्य आरामशीर जाईल. आता तुंडीसुद्धा आपल्या वडिलांबरोबर जंगलात जाऊ लागला व लाकडे तोडण्यात वडिलांना मदत करू लागला.
एके दिवशी डोटुन आजारी पडला. तो खाटेवरून उठू शकत नव्हता, म्हणून त्याने आपल्या मुलाला जंगलात जाऊन लाकडे तोडायला सांगितली. तुंडी आपल्या वडिलांच्या आदेशाप्रमाणे जंगलाकडे निघाला. रस्त्यात त्याला त्याचा एक मित्र दिसला. बराच वेळ त्याने तिथेच आपल्या मित्राबरोबर खेळण्यात घालवला. दुपारी परत जायच्या आधी त्याने थोडी लाकडे तोडली व तो घरी परतला.
ते पाहताच डोटुन अतिशय संतापला. त्याने रागीट स्वरांत म्हटले, "तू अगदी कुचकामाचा आहेस, तू कोणत्याही कामाला लायक नाहीस. इतकी कमी लाकडे आणलीस, यांनी काय होणार? आज जर लाकडे नाही विकली, तर उद्या काय खाणार? खरेदी कशी करणार?" तो तुंडीला रागवला व त्याला चांगला मार दिला. बिचारा तुंडी रडत रडत घराबाहेर निघून गेला. "जा, चालता हो, घरात पाय ठेवलास तर तंगडच मोडून टाकीन. अरे, स्वतःला समजतोस काय?" ओरडून ओरडून डोटुन दमला व पांघरूण घेऊन झोपून गेला.
तुंडीला कळत नव्हते काय करावे ते! तो जंगलाच्या दिशेने चालू लागला. दूर गेल्यावर तो थकला. त्याला भूक लागली. भुकेने तो व्याकूळ झाला. तो एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकत नव्हता. तो बिचारा एका झाडाखाली झोपून गेला.
संध्याकाळ झाली. एक व्यापारी आपल्या नोकरांसह शहरातून आपल्या गावी परतत होता. त्यांनी झाडाखाली झोपलेल्या त्या मुलाला पाहिले. त्यांनी त्याला उठवले व विचारले, "तू कोण आहेस? या भर जंगलात असा का झोपला आहेस? तेही अशा भलत्या वेळी?"
"मला घरदार नाही, मला फारच भूक लागली आहे." तुंडीने दुःखी आवाजात उत्तर दिले. व्यापाऱ्याने त्याला काही पोळ्या दिल्या. पोळ्या खाऊन त्यावर तो पाणी प्यायला. व्यापाऱ्याच्या मनात त्या अनाथाबद्दल कणव निर्माण झाली. त्यालाही मूलबाळ नव्हते. तो तुंडीला आपल्याबरोबर घरी घेऊन गेला.
दुपार झाली तरीही मुलगा घरी परतला नाही. आता डोटुनला काळजी वाटायला लागली. त्याला वाटले उगाच त्याला मी फार बोललो. त्याची काळजी वाढत होती. दिवसामागून दिवस गेले, परंतु मुलाचा काही पत्ता लागला नाही. मोठ्या बेचैनीत तो आपल्या मुलाची वाट पाहत दिवस काढू लागला.
इकडे व्यापारी तुंडीला आपल्या मुलाप्रमाणे वाढवायला लागला. त्याने आता व्यापारातले बारकावे शिकून घेतले. त्याचे दिवस आरामात जात होते. त्याला कशाचीही काळजी नव्हती. तरीही जेव्हा त्याला त्याच्या आई-वडिलांची आठवण यायची, तेव्हा तो फारच दुःखी व्हायचा. त्यांची आठवण काढत तो दूर कुठे तरी एकटा बसायचा. तो आपले आई-वडील व घर यांना विसरू शकत नव्हता.
व्यापाऱ्याच्या बायकोला सुद्धा तुंडी फार आवडायचा, कारण तो इमानी व विश्वासू मुलगा होता. तीही आपल्या सख्ख्या मुलाप्रमाणे त्याचे सर्व करायची व सख्ख्या आईसारखे त्यावर प्रेम करायला लागली. अशीच काही वर्षे गेली.
एके दिवशी डोटुन जंगलात सापडलेला हत्तीचा दात शहरात विकून परत चालला होता, तेव्हा आपल्या मुलासारखा दिसणाऱ्या एका तरुणाला पाहून तो ओरडला, "बेटा, थांब." घोडेस्वार थांबला. जवळ जाऊन त्याने त्या तरुणाला निरखून पाहिले आणि म्हणाला, "तू तुंडीच आहेस ना, माझा हरवलेला मुलगाच ना?"
तुंडी घोड्यावरून उतरला आणि म्हणाला, "हो मी तुंडीच आहे." असे म्हणून त्याने आपल्या वडिलांना नमस्कार केला. आपल्या वृद्ध वडिलांची दशा पाहून तुंडीला फार दुःख झाले. तो म्हणाला, "बाबा, आता मी ज्या घरात राहतो तिथे माझ्याबरोबर चला. काही दिवस विश्रांती घेऊन परत जा." डोटुनने मुलाचे म्हणणे ऐकले.
दोघे व्यापाऱ्याच्या घरी पोहोचले. तुंडीने व्यापाऱ्याशी आपल्या वडिलांची ओळख करून दिली. व्यापाऱ्याने त्याला फार चांगली वागणूक दिली. सकाळी घरी परत जाताना डोटुन व्यापाऱ्याला म्हणाला, "मी माझ्या मुलाला माझ्याबरोबरच घरी घेऊन जाणार आहे."
"हे कसे बरे शक्य आहे मित्रा, आता तो तुझा नाही, माझा मुलगा आहे. तू तर त्याला घराबाहेर काढले होतेस. जेव्हा मी त्याला आसरा दिला, घरी आणले, त्याचे पालनपोषण केले, तेव्हा त्याला घर नव्हते. आता हेच त्याचे घर आहे." व्यापारी त्याला नम्रपणे म्हणाला. "देवाच्या दयेने मला माझा मुलगा परत मिळाला. हे खरे आहे की मी त्याच्यावर रागावलो आणि तो घर सोडून गेला, परंतु बापलेकांमध्ये अशी भांडणे तर होतच असतात. हे तर अगदी साहजिकच आहे."
अशा प्रकारे त्या दोघांमध्ये या विषयावर बरीच चर्चा झाली. शेवटी व्यापारी म्हणाला, "या समस्येवर तोडगा आहे, तुंडीला येथे रहायचे किंवा तुझ्याबरोबर यायचे याचा निर्णय तुंडीलाच घेऊ दे. हाच या समस्येवर उपाय आहे."
"हो, हो, मला सुद्धा ही अट मान्य आहे, तुंडीच हे ठरवेल." डोटुन आनंदाने म्हणाला. "ठीक आहे, उद्या सकाळी याचा निकाल लावू या." व्यापारी म्हणाला.
दुसऱ्या दिवशी बापलेकाला घेऊन व्यापारी पुढेपुढे चालू लागला, त्याच्या हातात एक लखलखीत आणि लांबलचक तलवार होती. बापलेकांना काही समजत नव्हते की व्यापारी काय करतो आहे, त्यांना कुठे घेऊन जातो आहे! ते आश्चर्याने पाहत होते.
नदी आणि जंगलामध्ये एक निर्जन प्रदेश होता, तिथे व्यापारी थांबला. त्याने तलवार तुंडीच्या हातात दिली व म्हणाला, "बेटा, तू आता तुझे कर्तव्य पालन कर."
तुंडी विनयाने म्हणाला, "पण सांगा तरी मला, आता काय करायचे आहे?"
"जर तू आपल्या वडिलांबरोबर जायचे ठरविले असशील तर माझे शिर कापून टाक. पण जर तुला आपल्या दुसऱ्या वडिलांजवळ रहायचे असेल तर त्यांचे शिर कापून टाक."
तुंडी थोडा वेळ तसाच निमूट उभा राहिला. तो काहीच ठरवू शकत नव्हता. त्याने दोघांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, "आता मला माहीत आहे की माझे कर्तव्य काय आहे! मी स्वतःच माझे शिर कापून टाकतो." असे म्हणून त्याने तलवार उचलली.
दोघांनी मोठ्या स्वरात त्याला विनवीत म्हटले, "बेटा थांब, असे करू नकोस."
तिघांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्यांनी आता या समस्येवर एक दुसरा उपाय शोधला. डोटुन व त्याची बायको ही दोघे व्यापाऱ्याच्या घरी राहायला आली. अशा प्रकारे तुंडीने आपल्या जन्मदात्या व पालनपोषण करून त्याला मोठे करणाऱ्या आई-वडिलांबरोबर न्याय केला. दोघांना सुखी केले. आता दोघांचीही काहीच तक्रार नाही. आता त्याच्या दोन आया व दोन वडील आहेत. ते त्याच्यावर खूप प्रेम करतात.