All Marathi Stories

मनातले गुपित

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, तो झाडाजवळ गेला, प्रेत खांद्यांवर काढून घेतले आणि नेहमीप्रमाणे मौन होऊन स्मशानाच्या दिशेने निघाला. तेव्हा प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला— "राजा, तू एखादी अपूर्व शक्ती मिळावी यासाठी जर प्रयत्न करीत असशील तर मी तुझे अभिनंदनच करीन. कारण माणसाने सरळ मार्गावर चालावे यासाठी साम, दाम, दंड व भेद या चारही उपायांचा प्रयोग करावा लागतो. त्यापेक्षा अद्भुत शक्तींचाच जास्त उपयोग होतो. त्याचे एक उदाहरण म्हणून मी तुला भीमूची गोष्ट सांगणार आहे, लक्ष देऊन ऐक." असे सांगून वेताळ गोष्ट सांगू लागला. भीमू एक शेतकरी होता. त्याचा बाप वारल्यावर तो शेतावरची सर्व कामे करू लागला. एकदा तो एक पडीक जमीन नांगरीत असता त्याचा नांगर एका दगडाला लागला आणि 'खणण्' असा आवाज झाला. त्याने नांगर सोडला आणि फावड्याने जमीन खणून पाहिली. तेव्हा त्याला कळले की नांगराला लागली ती लहानशी दगडी डोण होती. त्या डोणीवर एक दगडी झाकण होते. त्याने ती शिळा काढून पाहिली तर त्याला आत एक उपडे मडके ठेवलेले दिसले. त्या मडक्याच्या खाली एक विचित्र हार व त्या हारासंबंधी माहितीचा एक ताडपत्री ग्रंथ होता. भीमूने खड्डा बुजविला आणि हार व तो ताडपत्री ग्रंथ घेऊन घरी गेला. तो ग्रंथ वाचून पाहिला त्यात त्या हारासंबंधी सविस्तर वर्णन होते. ते असे— "हा हार जो कोणी धारण करील त्याला त्याच्याशी बोलणाऱ्याच्या मनात चालू असलेले विचार कळतात. कित्येक शतकांपूर्वी दयानिधी नावाच्या एका माणसाला हा हार एका योग्याकडून मिळाला. त्या हाराचा महिमा कळल्यानंतर दयानिधीने त्याचा दुरुपयोग केला. तो काही कारण काढून श्रीमंतांकडे जाई व त्यांच्या मनातली एखाद्या दुष्ट कामाची माहिती कळताच ती इतरांना कळवून त्या कामात विघ्न आणण्याची धमकी देई व खूप पैसे उकळी. तोच त्याचा धंदा झाला. पुढे त्याला त्याच्या बायकोवरच संशय आला व तिचे प्रेम परपुरुषावर असल्याचे कळले. त्याने तिचा खून केला आणि ताडपत्रात त्याने ताडपत्राचा कोणकोणत्या तऱ्हेने दुरुपयोग केला होता ते सर्व लिहून त्याने दुसऱ्यांना कसा त्रास दिला हे देखील लिहून ठेवले. नंतर तो हार आणि ताड पत्रांचा तो ग्रंथ त्याने त्या मडक्याखाली ठेवून देऊन खड्डा बुजवून टाकला. भीमूला त्या हारात अशी काही अद्भुत शक्ती असेल याची कल्पना नव्हती. परंतु ते कळल्यावर त्याने विचार केला की त्या हारात अशी अद्भुत शक्ती असेल तर त्याचा सदुपयोग करून इतरांवर उपकार करणेही शक्य आहे. त्या हारातल्या शक्तीची परीक्षा करण्याचे ठरवून त्याने तो आपल्या गळ्यात घातला व कृष्णराव यांच्या घरी गेला. भीमूने कृष्णरावांकडून थोडे कर्ज घेतले होते. ते कर्जही फेडण्याचे त्याने त्यावेळी ठरविले होते. कृष्णराव हे त्या गावचे जमीनदार रामराव यांचे धाकटे भाऊ. भीमू कृष्णराव यांच्या घरी पोचला तेव्हा तो आपल्या मोठ्या भावाचा खून करण्याच्या विचारात होता. ती गोष्ट भीमूला त्या हाराच्या प्रभावाने कळली. त्याने कृष्णरावांना समजावून सांगितले— "हे पहा. तुमचे वडील बंधू खरोखरच एक थोर पुरुष आहेत. त्यांचा वध करण्याचा दुष्ट विचार तुम्ही मनातून काढून टाका." ते ऐकून कृष्णराव थक्क झाले. नंतर स्वतःला सावरून म्हणाले— "मी दादाचा खून करीन? कोणी सांगितले तुला हे?" "कोणी सांगो किंवा न सांगो, तुम्ही तो विचार मनातून काढून टाकावा एवढेच मी सांगू शकेन. हे घ्या तुमचे रुपये!" असे म्हणत त्याने कर्जाचे पैसे व त्याचे व्याज कृष्णरावांना दिले. त्यानंतर भीमूला कळले की कृष्णरावांनी दोन मारेकरी भावाचा खून करण्यासाठी नेमले आहेत. म्हणून त्या मारेकऱ्यांच्या वाटेवर भीमू एका झाडीत लपून बसला. त्या मारेकऱ्यांनी भीमूला झाडीत शिरताना पाहिले होते. म्हणून ते त्या बाजूला गेले. परंतु भीमूने एका झाडाआडून त्यांच्यावर लाठीचा हल्ला केला व त्यांना जमिनीवर पाडले. नंतर त्यांचे हातपाय बांधून ठेवून जमीनदाराला ती बातमी कळविली. जमीनदाराच्या शिपायांनी मारेकऱ्यांना खूप बडवून काढले, तेव्हा त्यांनी कृष्णरावांनीच जमीनदाराविरुद्ध नेमल्याचे सांगितले. कृष्णराव पळून गेला. त्यानंतर भीमूने केलेल्या उपकाराची फेड म्हणून जमीनदाराने भीमूला बोलवून त्याला अत्यंत प्रेमादराने मोठे इनाम दिले. त्यानंतर भीमूच्या त्या हाराने अनेक चांगली कामे केली. थोड्याच दिवसांनी भीमूला जयलक्ष्मी नावाच्या एका तरुण मुलीच्या मनात त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा असल्याचे कळले. तो तिच्या वडिलांना जाऊन भेटला व त्यांनी आनंदाने आपल्या मुलीचे लग्न भीमूशी करून दिले. हळूहळू गावकऱ्यांना इतरांच्या मनातले गुपित ओळखण्याची शक्ती भीमूत असल्याचे कळले. त्याला दरोडेखोरांच्या मनातले गुपित एकदा कळले व त्याने राजाला ती बातमी देऊन ज्या जागी चोरी होणार होती त्या जागी शिपाई नेमविले आणि चोर पकडले गेले. त्यानंतर भीमूचे नाव ऐकताच लोक भिऊ लागले. आपल्या मनात काही दुष्ट विचार आला तर भीमू ओळखील ही भीती प्रत्येकाला वाटू लागली. चोर, दरोडेखोर व इतर गुन्हेगार कोणी त्याच्या समोर जायला भिऊ लागले. त्याचा खून करून टाकण्याचा विचार करावा तर तो आधीच ओळखून त्यांना राजाकडून योग्य शिक्षा करवील ही भीती त्यांना वाटे. भीमूत ही अद्भुत शक्ती एका हारांमुळे आली आहे, ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. भीमूच्या या अद्भुत गुणाची माहिती मोठमोठ्या श्रीमंतांना व अधिकाऱ्यांना सुद्धा कळली. ते त्याला बोलवून त्यांचे शत्रू कोण व मित्र कोण हे विचारू लागले. त्याने विचार केला की आपण आपल्या शक्तीच्या साहाय्याने लोकांवर जसे उपकार करू शकतो तसेच या कामात कधी कधी भयंकर धोका येण्याचीही शक्यता आहे. उच्च पदावर राहणारे लोक आपसलात चढाओढ लावून राज्यव्यवस्थेत विघ्न आणतील. तेव्हा कोणाच्या मनातली गोष्ट कोणाला सांगणे चुकीचे होईल. तेव्हापासून भीमू कोणाच्या मनातले गुपित त्याला कळले तरी ते मनातच ठेवी व खोटे काहीतरी सांगून वेळ मारून नेई. मंत्री, सावंत, सेनापती, दरबारी विद्वान, पुरोहित व वैद्य सर्वांनी आग्रह करून राजाकडे शिफारस केली व भीमूला दरबारी करून घेतले. प्रत्येकजण त्यांच्या विषयी राजाच्या मनात काय आहे विचारू लागला. राजाला भीमूच्या अद्भुत शक्तीची ओळख झाली होती. एकदा राजाने भीमूला विचारले— "काय रे, सांग पाहू, या वेळी माझ्या मनात काय आहे?" तो म्हणाला— "महाराज, आपण या वेळी असा विचार करीत आहात की आपल्या मनात जे काही चालू आहे, ते मला कळणे शक्य नाही." त्यानंतर आणखी काही दिवसांनी राजाने भीमूला बोलवून विचारले— "मी तुला आता कशाला बोलाविले, हेच सांग पाहू!" "महाराज, आपल्या मनात, राणी सरकारांच्या विषयी काही विचारायचे आहे!" भीमू उत्तरला. "शाबास, तर मग, मी देतो ते पत्र राणीसरकारांना नेऊन दे आणि त्यांच्या मनात माझ्या पत्राचा काय परिणाम झाला तो ओळखून गुप्तपणे एकांतात मला येऊन सांग." राजाने त्याला आज्ञा केली. भीमूने ते पत्र राणीसरकारांना नेऊन दिले. राणी म्हणाली— "महाराजांना जाऊन सांग की आपकी सूचना मला मान्य आहे." त्या पत्रात महाराजांनी त्या दिवशी संध्याकाळी गायन वादनाची बैठक ठेवायची का विचारले होते. भीमूला राणीच्या मनातले आणखी एक गुपित कळले. तिचे राजावर खरे प्रेम नसून एका परपुरुषावर आहे. तरी भीमूने खोटे सांगितले. म्हणाला— "राणी सरकार पतिव्रता आहेत. त्यांच्या विषयी आपल्या मनात जो संशय आहे तो योग्य नाही." ते ऐकून राजाला परमानंद झाला. त्याने आपला कंठहार काढून भीमूला बक्षिस दिला. त्याच दिवशी रात्री भीमूने त्याचा अद्भुत शक्ती असलेला हार जाळून टाकला. तो हार विचित्र तऱ्हेने जळून धुराबरोबर नाहीसा झाला. त्याची राखसुद्धा राहिली नाही. त्याच दिवशी रात्री भीमू सकुटुंब परदेशात निघून गेला. त्याला थोरा मोठ्यांकडून जे धन मिळाले होते त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला पुरेसे होते. येथवर गोष्ट सांगून वेताळाने विचारले— "राजा, इतकी अद्भुत शक्ती असलेला हार भीमूने जाळून कां टाकला? त्याच्या साहाय्याने त्याला स्वतःला तर फायदा झालाच, इतरांना सुद्धा फायदा झाला होता! त्याचे गुपित त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नव्हते. अशा स्थितीत सर्वकाळ हार गळ्यात घालून तो राहिला असता तर त्यात काय बिघडणार होते? या शंकेचे समाधानकारक उत्तर माहीत असून तू दिले नाहीस, तर परिणाम तुला माहीतच आहे, तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील." तेव्हा विक्रमादित्य म्हणाला— "कोणत्याही अद्भुत शक्तीचा दुरुपयोग बलवान व्यक्तीलाच करता येतो, दुर्बळी व्यक्ती त्या शक्तीच्या भीतीने अपराध करणे सोडून देईल कदाचित्, परंतु मनातला दुष्टपणा मात्र सोडीत नाही. भीमूजवळच्या शक्तीमुळे दुर्बळ लोक भीत होते आणि असे वाटू लागले होते की तिच्यामुळे लोकांचा फायदाच होतो आहे. परंतु त्या शक्तीमुळे बलवानांच्या बाबतीत भीमूला त्रासच झाला. तो मनाचा दुर्बळ होता, म्हणून तो आपल्या अद्भुत शक्तीचा प्रयोग इतरांचे हित करून देण्यासाठी करू शकला नाही. तो स्वतः चांगला सत्शीलच होता. अशा व्यक्तीला वाईट मार्गाने जाणे कठीण असते. म्हणून त्याने हार नष्ट करून त्याच्यामुळे होणाऱ्या त्रासापासून स्वतःची सोडवणूक करून घेतली." अशातऱ्हेने मौनभंग होताच वेताळ प्रेतासह नाहीसा झाला आणि झाडाला जाऊन लोंबकळू लागला.