भृगू ऋषी
‘भृगु’ या शब्दाचा अर्थ ‘प्रकाशित करणे’ असा आहे. भृगु हे अग्नीचे एक नाव असावे असे काही विद्वानांचे मत आहे. भृगु वंश हा वेदकाळातील अत्यंत प्राचीन वंश आहे. ऋग्वेदात अग्नि संबंधाने ज्या सूक्ती आहेत त्यांवरून भृगूंनी मानवाला अग्नीची ओळख करून दिली हे कळते. म्हणजे त्यांनी अग्नी हा लाकडात गुप्तरूपाने असतो, हे लाकडाला लाकूड घासून दाखवून अग्नी निर्माण केला व त्याच्याशी मानवाची मैत्री करून दिली असे ऋचांवरून कळते.
वेदकालात भृगूचा अग्नीशी जवळचा संबंध असल्याचे दिसते तर पुराण काळात भृगू ऋषींचा राक्षसांशी जवळचा संबंध असल्याचे आढळते. ब्रह्मदेवाच्या हृदयातून जन्मलेले हे मुनिवर्य फार प्राचीन व जुने होते. तरी यांची पहिली पत्नी हिरण्यकशिपूची मुलगी दिती ही होती. (कश्यपाच्या पत्नीचे नांव सुद्धा दिती होते असे सांगतात; परंतु तिच्या पोटी राक्षस जन्मले, ती राक्षसाची मुलगी नव्हती. ती दक्षाची मुलगी होती.) भृगू व दितीच्या पोटी कवी नावाचा मुलगा झाला. याचा मुलगाच राक्षसांचा गुरु शुक्र होता!
राक्षस भृगूच्या आश्रमातच राहून देवांवर लपून छपून हल्ला करीत. भृगुपत्नी दितीने त्यांना आश्रय दिला होता. ते कळल्यावर विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने तिचा शिरच्छेद केला. ते कळल्यावर भृगूने विष्णूला शाप दिला की त्याला पत्नीविरहाचे दुःख सहन करावे लागेल. म्हणूनच रामावतारात रामाला सीतेचा विरह सहन करावा लागला होता, म्हणे.
भृगूचे ख्याती नावाच्या एका स्त्रीशी सुद्धा लग्न झाले होते, म्हणे. ती कर्दम प्रजापतीची मुलगी. तिच्या पोटी भृगूला धाता व विधाता नावाचे दोन मुलगे झाले.
भृगूची पुलोमा नावाची आणखी एक पत्नी होती. एकदा भृगूने तिला अग्नीकडे लक्ष ठेव म्हणून सांगितले व तो बाहेर निघून गेला. त्यावेळी पुलोम नावाचा एक राक्षस अग्निगृहात शिरला व त्याने “ती कोण?” असे अग्नीला विचारले. “ही भृगूची पत्नी आहे.” असे अग्नीने उत्तर दिले. तिला आपली बायको करून घेणार आहे असे सांगून पुलोम राक्षस तिला उचलून घेऊन गेला. त्यानंतर तिच्या पोटी च्यवन जन्मला व त्याने त्या राक्षसाला भस्म करून टाकले.
आपल्या पत्नीच्या अपहरणाला कारण अग्नी होता हे ओळखून भृगूने अग्नीला “तू सर्वभक्षक हो!” असा शाप दिला. “मला माहीत असलेली गोष्ट मी सांगितली त्यात माझी काय चूक?” असे सांगून अग्नी रागाने कोठे तरी जाऊन लपला आणि देवांना त्याने हव्य पोचविण्याचे बंद केले. देवांनी त्याला— “नाही रे बाबा, तू नित्य पवित्र आहेस” अशी त्याची स्तुती करून त्याला परत बोलाविले.
भृगूला ऋषिश्रेष्ठ असेही म्हणतात. हिमालय पर्वतालाही भृगूने शाप दिला होता म्हणे. भृगूत निग्रह शक्तीबरोबर अनुग्रह शक्ती सुद्धा होती. वसिष्ठांनी निमीला ‘तू मर!’ असा शाप दिला तेव्हा भृगूने निमीला “निमिष” (पापणी लवणे) रूपे जिवंत ठेवले म्हणे.
भृगूने एकदां खोटे बोलून वीतहव्य नावाच्या क्षत्रियाला ब्राह्मण केले म्हणे. वत्स देशाचा राजा वीतहव्य याच्या मुलांनी काशीराजाच्या कुटुंबाला ठार केले व देवोदास याचा पराभव केला. देवोदासाचा मुलगा प्रतर्थ वीतहव्याच्या मुलांचा वध करून वीतहव्याचा वध करण्यासाठी आला असता वीतहव्य भृगूच्या आश्रमात लपला. प्रतर्थ वीतहव्याच्या शोधार्थ आला तेव्हा भृगू ‘त्याच्या आश्रमात कोणी क्षत्रिय आला नाही, बुवा’ म्हणाला.