All Marathi Stories
भुतांनी दिली कमाई
श्री हनुमान प्रसन्न
एका लहानशा खेडगावात एक गरीब कुटुंब राहत असे. ते कातड्याच्या बाहुल्यांचा नाच पडद्यावर दाखवून त्यावर आपला उदरनिर्वाह चालवी. तोच त्यांचा धंदा होता. त्या कुटुंबात दोन जोडपी होती. दोघे म्हातारे आणि चार मुले होती. दहा-दहा दिवस एकेका जागी राहून ते खेळ करीत. त्यावर सर्वांची पोटे भरत.
एकदा ते कुटुंब आपले सर्व सामान पोत्यात भरून आणि कातड्याच्या बाहुल्या बांधून घेऊन निघाले आणि एका गावाच्या वेशीवर पोचले. तोपर्यंत छान काळोख पडला होता. म्हणून जवळच एका वडाच्या झाडाखाली आसऱ्याला सोयीची जागा पाहून त्यांनी तिथेच मुक्काम करण्याचे ठरविले. जवळच एक स्वच्छ पाण्याचे तळे पण होते. त्यांनी खाऊन पिऊन घेतले आणि पथारी टाकून झाडाखालीच सर्व झोपले.
मध्यरात्र उलटून गेल्यावर एकाएकी त्यांची झोप मोडली. बरीचशी गर्दी येत असलेली दिसली. दूर बरीच घरे दिसली आणि घरात दिव्यांचा उजेड पण दिसत होता. लोकांची गर्दी त्या बाजूनेच येत होती.
गर्दीतल्या लोकांनी पुढे येऊन खेळ दाखवायला आग्रह केला आणि मध्यरात्रीच्या वेळी खेळ दाखविणे किती कठीण आहे, असे सांगितले. परंतु गर्दीतले लोक हट्टाला पेटले. तेव्हा नाइलाज होऊन ते म्हणाले-
"अहो मांडव घालावा लागणार, दिवे लावावे लागणार, पडदे बांधावे लागणार, हे सर्व या मध्यरात्रीच्या वेळी कसे जमणार हो? शक्य नाही हो!"
"ते सर्व करून देण्याची जबाबदारी आमची. आज रात्री खेळ झालाच पाहिजे." जमलेले लोक म्हणाले.
झाले, जमलेल्या लोकांनी म्हटल्याप्रमाणे थोड्याच वेळात सर्व तयारी करून दिली. पेंडाल उभा राहिला आणि पुतळ्यांचा खेळ सुरू झाला. म्हातारीने प्रेक्षकांसमोर एक पंचा अंथरून ठेवला, म्हणजे ज्याला जेवढे पैसे देणे शक्य होईल तेवढे त्याला त्यात टाकता येतील.
पुतळ्यांचा नाच दाखविणाऱ्यांपैकी एक दोघे जण गाऊ लागले व डफ वाजवू लागले. एक दोघे मोठमोठ्याने ओरडत व निरनिराळे आवाज काढीत पडद्यावर पुतळ्यांचा नाच दाखवू लागले. लंकेत रावणाच्या दरबाराचे दृश्य होते. राक्षस ओरडत होते आणि राक्षसिणी नाचत होत्या. प्रेक्षक टाळ्या वाजवून खेळ दाखविणाऱ्यांचा उत्साह वाढवीत होते.
त्यानंतर पडद्यावर लंकिणी आली. तिचा वध करण्यासाठी मारुती प्रकटला. पडद्या पाठीमागे लंकिणी व हनुमानाचे युद्ध सुरू झाल्यामुळे आरडाओरडा ऐकू येऊ लागला तर समोर प्रेक्षकांची गर्दी एकाएकी नाहीशी झाली. मारुती पडद्याआडून सर्व मैदान मोकळे झालेले पाहिले. परंतु तिने अंथरलेल्या पंचावर खूप पैसे पडलेले होते. तिने खेळ बंद करविला.
तेव्हा खेळ खेळणारे पडद्यासमोर येऊन पाहतात तर दूरवर जी घरे व दिवे लावलेले दिसत होते आणि ज्या लोकांनी खेळ दाखवायला सांगितले होते, सर्वच अदृश्य झाले होते. तेव्हा त्यांना कळले की ते लोक म्हणजे भुते होती.
मारुती पडद्यावर येताच ती पळून गेली. काय वाटेल ते होवो, पडद्यावर मारुती दिसत राहिला पाहिजे असा विचार करून त्यांनी त्याच्या पुतळीची छाया पडद्यावर राहू दिली.
ते काही असो, त्यांची मेहनत फुकट गेली नाही. त्यांना खूप पैसे, बसायला आणलेल्या चटया आणि दिवे वगैरे वस्तू फुकटात मिळाल्या. भुतांपासून त्यांना मारुतीने प्रसन्न होऊन वाचविले आणि खूप मिळकत करून दिली.