पितृभक्ती
चीन देशात टाँग नावाचा एक गरीब तरुण युवक राहात असे. त्याची आई त्याच्या लहानपणीच वारली. त्याला एकोणिसावे वर्ष लागले तेव्हा त्या मुलाचा बाप वारला. त्याच्या बापाजवळ एक फुटकी कवडीसुद्धा नव्हती, म्हणून टाँग अगदी निराधार झाला.
टाँगला आपल्या बापाची अन्त्येष्टी करून एक समाधी बांधावी लागणार हे कळले. पण त्याच्याजवळ पैसेच नव्हते. मग हे काम कसे पुरे होणार? पैसे मिळवायला त्याला काही उपाय सुचेना. पैसे मिळवायला एक उपाय अवश्य होता, त्याने स्वतःला विकून टाकून कोणाच्या तरी गुलाम होऊन राहणे. पण त्याच्या मित्रमंडळींनी त्याला तसे न करण्याबद्दल सल्ला दिला. परंतु पैसे मिळवायला दुसरा काही उपाय कोणी सुचविला नाही.
टाँगने एका पुठ्ठ्यावर आपली किंमत लिहून आणि स्वतःला विकून घ्यायला तयार असल्याचे व खरेदीच्या अटी वगैरे लिहून आपल्या गळ्यात तो पुठ्ठा अडकविला आणि गुलामांच्या बाजारात जाऊन बसला. गुलामांची खरेदी करणारे पुठ्ठ्यावर लिहिलेल्या अटी वगैरे वाचून पुढे निघून गेले. काही लोक त्याला लोभी म्हणत तेथून निघून गेले.
कारण टाँगने जी रक्कम पुठ्ठ्यावर स्वतःची किंमत म्हणून लिहून ठेवली होती ती फार जास्त होती. परंतु टाँग त्या किंमतीहून कमी किंमतीत स्वतःला विकायला तयार नव्हता. तेवढी किंमत वडिलांचे श्राद्ध करायला व त्यांची समाधी बांधण्याकरिता आवश्यक होती. त्याला वाटले की कदाचित आपल्याला कोणी विकत घ्यायला तयार होणार नाही. परंतु सुदैवाने त्याच वेळी एक कोणी मोठा अधिकारी पुढे आला व त्याने सर्व अटी वाचल्या. त्याने विचार करून टाँगने जी रक्कम मागितली होती ती दिली. त्याने टाँगकडून कबूलीपत्र लिहून घेतले.
टाँगची इच्छा पुरी झाली. त्याने आपल्या वडिलांचे श्राद्ध केले आणि एका चांगल्या कारागिराला बोलावून चांगली समाधी बांधवून घेतली. नंतर तो आपल्या मालकाच्या घरी जाऊन काम करू लागला. त्याच्या मालकाने त्याला एक चांगलीशी झोपडी बांधून दिली.
टाँग आपल्या धन्याकडे तो सांगेल ते काम करी. कित्येक दिवस लोटले. टाँगला कधी सुख नाही की विश्रांती नाही. दिवसभर खपायचे आणि रात्री घरी येऊन जे मिळेल ते खाऊन झोपायचे. अंगात घालायला धड कपडेदेखील त्याच्याकडे नसत. तरी तो आपल्या बापाचे श्राद्ध नित्य नियमितपणे करीत राहिला.
एकदा पिकाची कापणी सुरू झाली. टाँगचे काम वाढले. एक दिवशी रात्री त्याला ताप आला. त्याला स्वतःची शुद्ध नव्हती. उद्या सकाळी कामावर कसे जायचे याची काळजी पण लागली होती. अशा वेळी तो डोळे मिटून पडला असता कोणीतरी येऊन त्याच्या डोक्यावर थंड हात ठेवला. टाँगला आश्चर्य वाटले, पण त्याने उशिरा डोळे उघडून पाहिले. त्याला ताप कमी होत आल्यासारखा वाटला. अंगात शक्ती येऊ लागल्यासारखे वाटले.
त्याच्या समोर एक अपूर्व सुंदर स्त्री बसली होती. "तू कोण?" हे विचारण्याचे साहससुद्धा त्याला झाले नाही.
ती स्त्री म्हणाली— "मी तुझा आजार बरा करून तुझ्याशी लग्न करून तुझ्याबरोबर राहण्यासाठी आले आहे." टाँग उठून बसला आणि चकित होऊन उभा राहिला. त्या स्त्रीशी लग्न केले तर तिला पोटभर जेवायला घालण्याची सुद्धा त्याची स्थिती नाही हे सांगण्याचे मनात असूनही त्याला साहस झाले नाही. परंतु त्याच्या मनातली गोष्ट तिला कळली. ती म्हणाली— "आपल्या दोघांचे पोट भरण्याची जबाबदारी मी घेते!"
टाँगला लाज वाटली. त्याने आपले फाटके मळके कपडे पाहिले. तिच्या अंगावर पण तसेच कपडे होते. तिच्या अंगावर एक देखील दागिना नव्हता. दोघे देवासमोर जाऊन वंदन करून पितरांचे स्मरण करून पती-पत्नी झाले.
त्यांचे लग्न विचित्रच होते. ती स्त्री कोणाची मुलगी, कोठून आली हे देखील टाँगने तिला विचारले नाही. तिनेच आपले नाव 'ची' आहे असे सांगितले. त्याहून जास्त काही बोलली नाही. तिलाच तो मालकीण मानू लागला आणि तिचाच गुलाम म्हणून तिचा फार आदर करू लागला. त्याच्या मित्रांनी ती कोण रे, कोठून आली वगैरे अनेक प्रश्न करून तिची ओळख विचारली, पण टाँग त्यांच्या एका देखील प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही.
ती आली त्या दिवसापासून, आपण एक गुलाम आहोत ही गोष्ट तो विसरू लागला. कारण ती आली त्या दिवसापासून त्याच्या जीवनात फार मोठा बदल झाला. त्याचे घर स्वच्छ राहू लागले. त्याचे कपडे स्वच्छ राहू लागले. घरात चहूकडे टापटीप दिसू लागली. कामावर जाण्यापूर्वी आणि कामावरून परत आल्यावर पोटभर खायला मिळू लागले.
टाँगची बायको हातमागावर काम करी. ती फार सुंदर चित्रविचित्र रंगाची वस्त्रे विणू लागली. ती वस्त्रे इतकी सुंदर येऊ लागल्या की व्यापारी येऊन तिला त्या रेशमी कापडाची किंमत देऊन कापड विकत घेऊन जात. लोक तिला म्हणत— "आम्हाला तुझ्या हाताची ही कला शिकवून दे. तू मागशील ते देऊ." पण ती त्यांना शिकवीत नसे. ती त्यांना सांगे की मी शिकवायचे ठरविले तरी तुम्हांला ती कला येणार नाही. कारण ती विणू लागली म्हणजे तिची बोटे दिसतच नसत.
दोघांची पोटे भरण्याची जबाबदारी तिने स्वतःवर घेतली होती. ती जबाबदारी तिने पार पाडली. आता टाँगच्या जीवनात कसलीच उणीव म्हणून उरली नाही. घरातली पैशांची पेटी भरत गेली. एक दिवशी चीने ती पेटी उघडून टाँगला चांदीची नाणी दाखविली व एक कागद काढून दाखविला. त्यात टाँगची किंमत परत मिळाल्याचे व याला दास्यमुक्ती मिळाल्याचे लिहिले होते. पत्नीचे ते उपकार पाहून टाँगच्या डोळ्यातून आनंदाची टिपें गळू लागली.
"दक्षिणेकडचे शेत मी तुझ्यासाठी विकत घेतले आहे आणि रेशमी किड्यांची एक बाग सुद्धा घेऊन ठेवली आहे. यापुढे तुला दुसऱ्याची चाकरी करण्याची गरज उरली नाही. तू स्वतःच्या शेतात व मळ्यात काम कर."
हे ऐकून व तिच्या उपकाराबद्दल तिचे आभार म्हणून टाँग चीचे पाय धरून नमस्कार करायला खाली वाकला. पण तिने तसे करू दिले नाही.
टाँगचे नशीब उघडले होते. त्याच्या शेतात चांगले पीक निघू लागले. त्याला प्रत्येक कामात चांगले यश येऊ लागले. त्याच्याकडे कामाला येणारे लोक त्याचा आदर करीत व तो देखील त्यांना प्रेमाने वागवी. टाँगची बायको गरोदर झाली व तिला एक सुंदर गुटगुटीत मुलगा झाला. त्या मुलाला जो पाही तो म्हणे— "हा मुलगा मर्त्यलोकातला सामान्य मुलगा नसून देवलोकातून आलेला मुलगा दिसतो आहे."
थंडीचे दिवस होते. टाँग आपल्या बायकोबरोबर बोलत बसला होता. एकाएकी त्याला त्याची बायको एकदम जास्त सुंदर झाल्यासारखी वाटली.
उजाडण्याच्या सुमारास ची जागी झाली व टाँगचा हात धरून ती त्याला पाळण्याजवळ घेऊन गेली. त्या वेळी कां कोणास ठाऊक टाँगला ते सर्व विचित्र वाटू लागले. तो घाबरला. त्याने डोळे मिटून घेतले आणि तिच्या समोर गुडघे टेकून बसला. मान वर करून डोळे उघडून त्याने पाहिले तर चीचे रूप पालटून गेले होते. आता तिच्या नेहमीच्या उंचीपेक्षा ती फारच जास्त उंच दिसू लागला होती. तिच्या चेहऱ्यावर एक अपूर्व तेज दिसत होते.
"आता तुला सोडून मला जावे लागत आहे. मी या मर्त्यलोकातली स्त्री नसून तुझ्यासाठी हे मानव रूप घेऊन काही दिवसांसाठी आले होते. माझी स्मृती म्हणून तुझ्याकडे आपला हा मुलगा आहेच. तुझी पितृभक्ती पाहून स्वर्गाच्या प्रमुखाने मला पाठविले होते. मला आता त्यांच्याकडे परत जावे लागणार. माझे नाव 'ची-नीयू' असे आहे. मी एक अप्सरा आहे."
हळूहळू तिच्या शरीराची कांती कमी होऊ लागली आणि ती अदृश्य झाली.