परिपूर्ण मानवता
विक्रमपूरच्या राजाचा आकस्मिक देहान्त झाला, त्यामुळे राजकुमार लहान असतानाच त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. लोकांशी संबंधित अनुभव आणि ज्ञान नसलेल्या या तरुण राजकुमाराला मार्गदर्शन करताना राजगुरू म्हणाले— "ज्याला आदर्श राजा व्हायचे असेल, त्याला कोणत्या माणसात किती मानवता (माणुसकी) आहे, हे कळले पाहिजे. जशी जशी आवश्यकता पडेल, तसतसे मी तुला ते समजावून सांगेन."
एके दिवशी एक योद्धा राजाकडे आला आणि त्याने एक अनुभव सांगितला— "महाराज, मी जंगलातून जात होतो तेव्हा माझ्या पायात काटा बोचला. मी लंगडत चाललो असताना एक माणूस धावत आला आणि म्हणाला, 'वाघ येतोय, पटकन कोठेतरी लप!' असे सांगून तो स्वतः एका झाडावर चढला. मी दुसऱ्या झाडावर चढलो. थोड्याच वेळात वाघ तिथून निघून गेला आणि आम्ही दोघेही खाली उतरून आपापल्या वाटेने गेलो."
हे ऐकून राजगुरू म्हणाले— "या योद्ध्याने ज्या माणसाची गोष्ट सांगितली, त्याच्यात एक चतुर्थांश (२५%) मानवता आहे. त्याने दुसऱ्याला सावधान केले खरे, पण त्याच्या संरक्षणाचा विचार केला नाही. स्वतः स्वार्थी बनून तो झाडावर चढून बसला!"
काही दिवसांनी दुसरा एक योद्धा आला. त्याने सांगितले की, एका श्रीमंत माणसाने एका अनाथ गरिबाला आश्रय आणि अन्न देऊन आपल्याकडे नोकरीला ठेवले होते. पण तो श्रीमंत माणूस त्या नोकराला अमानुष मारहाण करत असे. एका वाटसरूने हे पाहिले आणि मारण्याचे कारण विचारले. श्रीमंत म्हणाला, "याने जिवंत असेपर्यंत माझी सेवा करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. मी याला विकत घेतले आहे. मी याला मारले तर तुझे काय जाते?" त्या वाटसरूने ते प्रतिज्ञापत्र मागवून घेऊन फाडून टाकले आणि त्या गरिबाला सांगितले, "आजपासून तू स्वतंत्र आहेस."
राजगुरूने समजावले— "या रस्त्याने जाणाऱ्या माणसात पन्नास टक्के मानवता आहे. त्याने गरिबाला मुक्त केले, पण त्याला नोकरी देऊन त्याच्या उदरनिर्वाहाची सोय केली नाही. तर, त्या श्रीमंत माणसाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, त्याच्यात जरासुद्धा मानवता नाही. तो नररूपातील राक्षस आहे!"
नंतर एकदा राजसभेत दोन व्यापारी आले. त्यांना वाटेत चोरांनी लुटले होते. पण चोरांच्या सरदाराने त्यांना पाहिले तेव्हा त्यांना दया आली. त्याने त्यांना ठार न मारता उलट त्यांच्या वाटखर्चासाठी प्रत्येकी दोन-दोन रुपये दिले. राजगुरू म्हणाले— "या चोरांच्या सरदारात तीन चतुर्थांश (७५%) मानवता आहे. त्याचा धंदा माणुसकीच्या आड येत असला तरी, त्याच्यात दयाभाव शिल्लक आहे."
शेवटी, एक सरकारी अधिकारी दोन माणसांना घेऊन आला— एक श्रीमंत आणि एक गरीब. अधिकाऱ्याने सांगितले की, श्रीमंत माणसाने गरिबाला मुद्दाम नदीत ढकलले आणि स्वतःही पाण्यात पडला. जेव्हा राजाने विचारणा केली, तेव्हा श्रीमंत माणसाने कबूल केले की, त्याने या गरिबाचे घर हडपले होते, त्याचे घर जाळले होते आणि आता त्याला संपवण्यासाठी त्याला नदीत ढकलले.
पण तिथेच उभा असलेला गरीब माणूस म्हणाला— "महाराज, जेव्हा आम्ही दोघे नदीत पडलो आणि हा श्रीमंत माणूस गटांगळ्या खाऊ लागला, तेव्हा मीच याला वाचवून किनाऱ्यापर्यंत आणले. त्याच्या पोटातले पाणी काढून त्याचे प्राण वाचवले." हे ऐकून राजाने त्या श्रीमंताकडून गरिबाची नुकसानभरपाई करवून घेतली.
राजगुरू राजाला म्हणाले— "पाहिलेस? हा गरीब माणूस 'परिपूर्ण मानव' आहे. त्याने स्वतःचे सर्वस्व लुटणाऱ्या शत्रूचे प्राण वाचवले. म्हणूनच त्याने श्रीमंत माणसाच्या स्वभावात बदल घडवून आणला. जो स्वतः संपूर्ण माणूस असतो, तोच दुसऱ्याच्या स्वभावात बदल घडवून माणुसकी जागृत करू शकतो." अशा प्रकारे राजगुरूंच्या मार्गदर्शनामुळे राजाला आपल्या देशाचे शासन उत्तम रीतीने करता आले.