न्हाव्याचे नशीब उजळले!
सेवाराम हा एक गरीब न्हावी होता. गरीब म्हणण्याचे कारण की त्याला आपल्या कुटुंबाची साधी गुजराण करण्याइतकी देखील कमाई होत नव्हती. एखाद्या दिवशी डाळ, तांदूळ, भाजी आणण्याइतके पैसे मिळत, तर दुसऱ्या दिवशी फक्त तांदूळ विकत घेण्यापुरतेच पैसे असत. हल्ली तर त्याची बायको शिवानी त्याला रागाने बावळट, नालायक असेही म्हणायला कमी करत नव्हती. ती माहेरच्या चांगल्या परिस्थितीचे वर्णन करी. तिथे तिला चांगले-चुंगले खायला-प्यायला व सुंदर कपडे मिळत होते.
एका संध्याकाळी सेवाराम हात हलवीत घरी परत आला. झोपी जाईपर्यंत शिवानीने त्याच्यावर आगपाखड केली होती. त्याला बराच वेळ झोप येत नव्हती. त्याने मनाशी काहीतरी निर्णय घेतला आणि नंतरच त्याला जरा वेळ झोप लागली. तो पहाटे उठला, त्याने स्नान केले आणि वस्तरा, कात्री, केसाची तेले, फणी वगैरे रोजचे सामान त्याने आपल्या पिशवीत (धोपटीत) घातले आणि तो घरातून निघाला. "आता मी परत येईन, तो पुरेसे पैसे मिळवल्यानंतरच येईन!" दारात उभी राहून बघत राहणाऱ्या शिवानीला त्याने बजावले. ती पाहतच राहिली. तिने त्याला परत बोलावले नाही.
गावातून बाहेर पडल्यावर तो बराच वेळ चालत होता. त्याने एका डेरेदार वृक्षाखाली जरा आराम केला. कुणीतरी वाटसरू दिसला तर एखादी झटपट दाढी किंवा हजामत करून पुढचे मोठे गाव गाठता येईल, अशी भाबडी आशा त्याला वाटत होती. पण कुणीच दिसले नाही. रात्र झाली तेव्हा त्याने एका उंच झाडाखाली थकलेले हातपाय पसरले आणि त्याला लगेच झोप लागली.
त्या झाडावर एक भूत राहात होते. त्याला सेवारामचे घोरणे ऐकू आले. चांगले भोजन मिळणार या आशेने भूत खाली आले. या माणसाला प्रथम घाबरवायचे आणि नंतर पकडायचे, असा भुताने विचार केला. त्याने मोठ्याने आवाज काढले, पण सेवाराम गाढ झोपलेला होता. भुताने सेवारामचे खांदे पकडून त्याला गदागदा हलवले. जेव्हा सेवाराम हळूहळू डोळे उघडू लागला, तेव्हा भुताने वेडीवाकडी भेसूर मुद्रा केली. "आता मी तुला आनंदाने खाऊन टाकणार आहे!" असे किंचाळत भुताने सेवारामच्या गळ्या जवळ आपले हात नेले.
सेवाराम इतका थकला होता की त्याला मरणाची फिकीर नव्हती. पण अचानक त्याला आपल्या बायकोची याद आली. जर तो मेला, तर तिचा सांभाळ कोण करील? त्याला तिची काळजी वाटली. त्याला एक युक्ती सुचली. "मूर्खपणा करू नकोस!" सेवारामने भुतासमोर हात हलवून म्हटले. पण भूत काही जागचे हलले नाही. "मी एक भूत पकडून ठेवले आहे, ते तुला पाहायचे आहे का?" सेवारामने आपली धोपटी उघडली व त्यातून हातांत धरायचा आरसा त्याने बाहेर काढला व भुतासमोर धरला. "हे बघ, माझ्या या पिशवीत आणखी एक भूत झोपलेले आहे!"
आरशातला आपलाच भेसूर चेहरा पाहून भूत दचकले. एक चीत्कार काढून ते म्हणाले, "आssअूss! मला तुझ्या पिशवीत या भयंकर प्राण्याबरोबर नको ठेवूस!" न्हाव्याच्या हातात अजून आरसा होताच. तो दरडावून म्हणाला, "मी नाही ठेवणार, पण त्यासाठी तू पहाट होण्यापूर्वी मला काही मौल्यवान रत्ने आणून दिली पाहिजेस."
क्षणार्धातच भूत दिसेनासे झाले. थोड्या वेळाने भूत एक गाठोडे घेऊन परत आले. त्याने ते गाठोडे सेवारामसमोर ठेवले आणि उघडून त्यातील चमचमणारी रत्ने दाखवली. सेवारामने ती रत्ने घेऊन गावातल्या एका सावकाराकडे गहाण ठेवून पैसे घेतले. सावकाराने रत्ने पारखून त्याला वाजवी किंमत दिली.
दुसऱ्या दिवशी सेवाराम पुन्हा त्याच झाडाजवळ गेला. आता भुताने आपल्या एका मित्राला (दुसऱ्या भुताला) मदतीला बोलावले होते. त्या दोघांनी सेवारामची धोपटी चोरण्याचे ठरवले. मध्यरात्र झाली तशी दोन्ही भुते सावकाश खाली उतरली. सेवारामने झोपेचे सोंग केले होते. त्याने पटकन आपली धोपटी उघडली आणि त्यातून आरसा आणि कात्री बाहेर काढली. एका हातात आरसा आणि दुसऱ्या हातात कात्री धरून त्याने कात्रीने 'कचाकच' आवाज करायला सुरुवात केली. आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहून आणि कात्रीचा आवाज ऐकून दोन्ही भुते घाबरली.
सेवाराम ओरडून म्हणाला, "माझे बोलणे पुरे होईपर्यंत हलू नका! आज तुमच्यापैकी एक जण मला सोन्याच्या मोहरा आणून देईल. जर तुम्ही आला नाहीत, तर लक्षात ठेवा - माझ्या पिशवीत असलेल्या इतर भुतांप्रमाणे तुमचीही अवस्था होईल!" भुते भीतीने पळून गेली आणि थोड्या वेळाने सोन्याची नाणी घेऊन परत आली. सेवारामने ती नाणी घेतली आणि तो आपल्या गावाकडे जायला निघाला.
दोन दिवसांत काय काय घडले ते सेवारामने शिवानीला सांगितले. शिवानी थक्क होऊन त्याच्याकडे बघतच राहिली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा ती त्याला म्हणाली, "साऱ्या जगांत तुम्ही सर्वात हुशार आणि चतुर पुरुष आहात."
"मी याच शब्दांची वाट पाहत होतो," आता श्रीमंत झालेल्या सेवाराम न्हाव्याने उत्तर दिले.