Bookstruck

नित्य संतोषी

भीम व राम शेजारी होते. राम नेहमी आनंदी असे. परंतु भीम मात्र नेहमी दु:खी आणि चिंताग्रस्त असे. रामची चार एकर शेतजमीन होती. भीमाला वाटले की त्यामुळेच राम सदैव खुशीत असतो. म्हणून त्याने रात्रंदिवस खूप कष्ट केले, पैसे मिळवले आणि माळरानातली पाच एकर जमीन खरेदी केली. तरीदेखील भीमपेक्षा राम अधिक समाधानी होता. भीमाच्या मनात सारखा विचार येई की रामाच्या आनंदी असण्याचे कारण काय असू शकेल? तो नेहमीच आनंदात कसा काय असू शकतो? रामचे लग्न झाले. त्याची पत्नी फार सुंदर होती, जणू चंद्राची कोरच! भीमाला वाटले की लग्न झाल्यामुळे राम जास्त खूष दिसतो आहे. म्हणून भीमाने बऱ्याच मुली पाहून, रामच्या पत्नीपेक्षा जास्त सुंदर पत्नी निवडून लग्न केले. तरीसुद्धा तो रामइतका आनंदी झाला नाही. परंतु त्याने आनंदी राहायचा खूप प्रयत्न केला. रामने दोन मजल्यांचे घर बांधले, तर भीमाने तीन मजली घर बांधले. राम रोज दहाजणांना भोजन देई, तर भीमाकडे वीसजण जेवायला असत. प्रत्येक बाबतीत भीम रामपेक्षा श्रेष्ठ ठरण्याचा प्रयत्न करी पण त्याला त्याचा आनंद मात्र मिळत नसे. रामच्या रोजच्या वागणुकीवर भीम लक्ष ठेवू लागला. राम कोणत्या वेळी काय करतो यावर लक्ष ठेवू लागला. रामच्या दुप्पट काम भीम करायला लागला, तरीदेखील भीम कष्टी होता, रामसारखा समाधानी नव्हता. म्हणून भीम सदैव उदास राही. अशा वेळेला त्या गावात एक साधू आला. त्याला मोठ्या आदराने रामने आपल्या घरी नेले व त्याचे प्रेमाने आदरातिथ्य केले. त्याचे प्रेम व वागणे पाहून साधू खूष झाला व म्हणाला, "पुत्रा, तुला काय हवे ते माग." रामने विनयपूर्वक म्हटले, "माझी पत्नी सद्गुणी आहे, माझी मुले सुस्वभावी आहेत, जे माझ्याजवळ आहे त्यांत मी संतुष्ट आहे. मी आनंदात आहे व शक्य होईल तशी लोकांना थोडीफार मदतही करतो. माझा परिवार निरोगी आहे. हेच माझे भाग्य आहे, व तेवढे मला पुरेसे आहे. आपण मला असा आशिर्वाद द्यावा की माझी परिस्थिती सदा अशीच राहावी." "तुझी तृप्ती व संतोष खरोखरच कौतुकास्पद आहे. परमेश्वर सदा तुमच्यावर कृपा करील." असं म्हणून साधूने रामला आशिर्वाद दिला. त्यानंतर साधू महाराज भीमाच्या निमंत्रणावरून त्याच्या घरी गेले. भीमाने मोठ्या थाटात साधूचे आदरातिथ्य केले. रामच्या दुपटीने त्याने आदरातिथ्य केले होते. साधूने संतुष्ट होऊन त्यालाही काय हवे ते मागण्यास सांगितले. "माझा शेजारी राम हा कोणत्याही बाबतीत माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ असू नये, एवढा आशिर्वाद मला पुरे आहे." भीमाने लगेच आपली इच्छा प्रकट केली. साधूने आश्चर्य व्यक्त करून म्हटले, "स्वत:साठी जे हवंय ते मागून घे, त्यांत इतरांबद्दल बोलणे, त्यांना खाली ओढणे हे चांगले नाही, हा तर अधर्म आहे." असं म्हणून त्याने भीमाला सूचकपणे सावध केले. त्यावर भीम म्हणाला, "रामपेक्षा वरचढ असणे यांतच माझा आनंद आहे. मला आपण हा आशिर्वाद देऊ शकत असाल तर अवश्य द्यावा, नाहीतर मी हे माझे दुर्भाग्य समजेल." साधूने क्षणभर डोळे मिटले आणि नंतर म्हटले, "तुझी इच्छा जरूर पुरी होईल. परंतु त्यासाठी रामची अनुमती पाहिजे." साधूच्या या बोलण्यावर भीम नाराज झाला आणि बोलला, "आपल्याला मला आशिर्वाद द्यायचा नसेल तर देऊ नका. पण यासाठी राम अनुमती देईल या भ्रमात आपण राहू नका." "अरे वेड्या, रामने जर अनुमती दिली ना, तर तू त्याच्यापेक्षाही अधिक संतुष्ट, वैभवशाली होशील. रामने जर संमती दिली नाही तर तुलनेने तो तुझ्यापेक्षा कमी प्रतीचा ठरेल. हे रहस्य रामला ठाऊक नाही, म्हणून दोन्ही प्रकारे तुझाच फायदा होणार आहे. रामला इथे मी बोलावलंय म्हणून लगेच निरोप पाठव." साधूने सांगितले. भीमाने रामला बोलावून घेतले. रामला आल्यानंतर जेव्हा भीमाची इच्छा समजली, तेव्हा त्याने लगेच अनुमती दिली. साधूने आश्चर्य व्यक्त करून रामला विचारले, "पुत्रा, प्रत्येकाला असं वाटत असतं की दुसऱ्यांपेक्षा आपण श्रेष्ठ असावं. भीम तुझ्यापेक्षा श्रेष्ठ असावा, त्यासाठी तू संमती दिली आहेस. तू असं कां केलंस ते मला समजेल कां? त्याच्यामागे तुझा कसला हेतू आहे?" "आपण महात्मा आहात. आपल्यापासून काय लपवायचं? आसपासचे लोक जर आपल्यापेक्षा कमी स्थितीत असले तर त्यांचे द्वेष, ईर्ष्या, तिरस्कार हे भाव जास्त उफाळून येतात आणि आपल्याला जाचक होतात. आपल्या मनाला त्याचा खूप त्रास होतो. ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ असले तर ते आपल्याबाबतीत विसरून जातात, त्यांना एकतर आपल्याबरोबर काही देणेघेणे नसते, किंवा आपल्यावर दया दाखवून ते आपल्याला मदत करायला पुढे येतात. जर आपण आपल्याबद्दलच विचार करीत बसलो, आणि आपल्या प्रगतीबद्दल आपण संतुष्ट राहिलो, तर हा संतोष कधीही कमी होणार नाही. दुसऱ्यांची प्रगती व्हावी अशी इच्छा करणारे आणि ती प्रगती आनंदाने पाहणारे नेहमीच तृप्त असतात, संतुष्ट असतात." या बोलण्यावरून रामच्या समाधानाचा रहस्य भीमाला कळले. साधूने हे सत्य त्याला समजावे म्हणूनच या भेटीचे आयोजन केले होते हेही भीमाच्या लक्षात आले. त्या दिवसापासून भीम दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये आनंद मानायला शिकला. आता त्याला खराखुरा संतोष मिळू लागला. अशा तऱ्हेने तोही नित्य संतोषी बनला.