All Marathi Stories

नाचणारा अस्थिपंजर

विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा त्या झाडाकडे गेला, प्रेत काढून खांद्यावर टाकले आणि स्मशानाकडे निघाला. चार पावले टाकली नाहीत तोच प्रेतातील वेताळ बोलू लागला. म्हणाला— “राजा, अद्भुत शक्ति सामर्थ्यासाठीच जर तू इतके कष्ट करीत असशील तर ते सर्व फुकट समज. कारण असल्या शक्तीच ऐन वेळी धोका देतात. आता हेच पहा ना.” असे सांगून त्याने गोष्ट सांगण्यास आरंभ केला. कान्यकुब्ज देशात दोघे मित्र राहत असत. एकाचे नाव कृतवर्मा व दुसऱ्याचे श्रुतवर्मा. दोघे मित्र होते खरे, पण त्या दोघांच्या स्वभावात फार फरक होता. एक कष्टाळू तर दुसरा आळशी. एक सदाचारी तर दुसरा दुराचारी. कृतवर्मा धन जोडणारा तर श्रुतवर्मा धन उडविणारा. कृतवर्मा सतत परिश्रम करून धन मिळवीत असे. परंतु स्वदेशी पुरेसा पैसा न मिळाल्यामुळे तो परदेशी जाण्यास निघाला. त्याच्या पाठोपाठ त्याचा मित्र श्रुतवर्माही निघाला. परदेशात कृतवर्मा रात्रंदिवस मेहनत करून पैसा मिळवू लागला आणि श्रुतवर्मा दारूत आणि जुगारात पैसा घालवू लागला. कृतवर्मा मित्र म्हणून जरूरी तेवढा पैसा श्रुतवर्माला देत असे. त्याला नीट वागण्यासाठी परोपरीने सांगत असे. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तीन वर्षे गेली. कृतवर्माने खूप पैसे मिळविले आणि स्वदेशी जाण्यास निघाला. श्रुतवर्मा त्याला म्हणाला— “मलाही परदेशात आता राहण्याची इच्छा नाही. मलाही तुझ्याबरोबर घरी परत जावेसे वाटते आहे. अशा वेळी माझ्याजवळ प्रवासाला पुरेसा पैसा अडकाही पण नाही.” येताना दोघे बरोबर आले होते. म्हणून परत जाताना कृतवर्माने श्रुतवर्माला बरोबर घेऊन जाण्याचा विचार केला. दोघे बरोबरच घरी जाण्यास निघाले. कृतवर्माने जेवढे पैसे मिळविले होते ते सर्व त्याने आपल्या बरोबर घेतले. ते दोघे मित्र जेव्हा आपल्या गावाच्या जवळ पोहोचले तेव्हा श्रुतवर्माने कृतघ्नपणाने कृतवर्माला असावध पाहून ठार केले. त्याचे प्रेत रस्त्याच्या कडेला झुडपात फेकून दिले. त्याच्या जवळची सर्व संपत्ती घेऊन आपल्या गावी गेला. त्याने बरीच संपत्ती कमावलेली पाहून घरातील लोकांना फार आनंद झाला. श्रुतवर्माला एकटाच आलेला पाहून गावकऱ्यांनी कृतवर्माचीही चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला— “काय सांगू तुम्हांला? परदेशात गेल्याबरोबर तो अगदी बदलून गेला. वाईट संगतीत राहू लागला. अर्थातच कमावलेला सर्व पैसा घालवून बसला आणि शेवटी पोट भरायची सुद्धा भ्रांत पडली.” कृतवर्माच्या पैशावर श्रुतवर्माचे काही दिवस मजेत गेले. पण दारू व जुगार यांच्या तडाख्यांत ते पैसे किती दिवस पुरणार? थोड्याच दिवसांत उतरती कळा लागली व तो पुन्हा कंगाल झाला. त्याला गांवांत राहणे अशक्य झाले. म्हणून पुन्हा परदेशी निघाला. वेशीच्या बाहेर पडताच त्याने ज्या ठिकाणी कृतवर्मास ठार केले होते त्या जागी येऊन पोहोचला. तो पुढे जाऊ लागला तेव्हा त्याला कोणी तरी बोलावीत आहे असा भास झाला. त्याने मागे वळून पाहिले. पण त्याला कोणी दिसले नाही. खरोखरच भास झाला असे समजून तो पुढे चालू लागला. पण पुन्हा 'श्रुत', 'श्रुत' असा आवाज त्याच्या कानी पडला. या खेपेस त्याच्या लक्षात आले की आवाज रस्त्याच्या बाजूस असलेल्या झुडपातून येत आहे. तो झुडपाजवळ गेला. त्याला तिथे एक हाडांचा सांगाडा दिसला. तो आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. त्याला कृतवर्माची आठवण झाली. इतक्यात सांगाडा बोलू लागला. म्हणाला— “अरे श्रुत, इतक्यातच मला विसरलास? माझ्या पैशावरच नाही का इतके दिवस तू चैन केलीस? तुला माझी एकदा तरी आठवण झाली का? मी मात्र तुला भेटण्याच्या इच्छेनेच आज पर्यंत येथे बसून राहिलो आहे. आज तुझ्या भेटीने मला फार आनंद होत आहे. काय मला ओळखले नाहीस? अरे मी कृतवर्मा! आपण ह्याच वाटेने गेलो होतो आणि परत पण ह्याच वाटेने आलो होतो.” सांगड्यातून निघालेले ते बोल ऐकून व कृतवर्माचे नाव ऐकून श्रुतवर्मा घाबरून गेला. तेथून पळून जाण्याच्या विचाराने तो वळला देखील. परंतु त्या सांगाड्याच्या हाताने त्याचे धोतर घट्ट धरून ठेविले. त्याचे पायही जमिनीला खिळून राहिल्यासारखे त्याला वाटले. विकट हास्य करून कोठे चाललास म्हणून सांगाड्याने विचारले. श्रुतवर्मा म्हणाला— “माझ्याजवळ असलेला सर्व पैसा संपून गेला. म्हणून कामधंदा करून पैसा मिळविण्याच्या हेतूने मी घराबाहेर पडलो आहे. का उगाच मला त्रास देतोस. जाऊ दे मला.” “हूं! म्हणजे तू पैशाच्या काळजीत आहेस. ठीक आहे. मला एका पेटीत घालून घेऊन चल. मी नाच करून तुला पैसे मिळवून देतो. असा बघतोस काय? तुझा विश्वास नाही बसत? हे बघ मी नाच करतो.” असे म्हणत त्या सांगाड्याने सुंदरसे नृत्य केले. “तू वाटेल ते गाणे म्हण, मी तालावर नाचतो. माझा नाच दाखवून तू पैसा मिळव.” पैसा मिळविण्याचे हे उत्तम साधन आहे असे समजून त्याने तो सांगाडा घेतला व पुढे निघाला. अस्थिपंजराला नाचवीत तो गावोगांव हिंडून पैसे मिळवू लागला. त्याच्या त्या सांगाड्याची ख्याती राजाच्या कानावर गेली. राजाने त्याला बोलावले व अस्थिपंजराचा नाच करविण्याची आज्ञा दिली. श्रुतवर्माला फार आनंद झाला. त्याला वाटले, राजा त्या सांगाड्याच्या नाचावर खूष होऊन मला पुष्कळ पैसे देईल. म्हणून तो मोठ्या आनंदाने गाणी गाऊ लागला. पण तो सांगाडा जागचा हाललासुद्धा नाही. श्रुतवर्मा तऱ्हेतऱ्हेचे सूर काढून त्याला नाचवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी राजाला राग आला. तो म्हणाला— “हा असाच भोळ्या बिचाऱ्या गावकऱ्यांना फंसवीत असला पाहिजे. याचे हात-पाय कापून याला लंगडा-लुळा करून कोल्हा लांडग्यांसमोर टाका याला.” राजाची आज्ञा ती. राजाचे सैनिक त्याला पकडून घेऊन गेले आणि त्याचे हात पाय कापून त्याला रानात सोडून आले. इतकी गोष्ट सांगून वेताळ थांबला व म्हणाला— “राजा, मेल्यानंतर सुद्धा ज्या मित्राने श्रुतवर्माची एवढी मदत केली तो राजासमोर का नाही नाचला? की राजाला पाहताच तो सांगाडा घाबरून गेला? अशी एकाएकी त्यांतील ती शक्ति नाहीशी होण्याचे कारण काय असावे? तू माहिती असूनही उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायांशी पडतील.” विक्रम म्हणाला— “सांगाडा जो नाचला ते कांही उपकार बुद्धीने नव्हे. धन मिळवून देऊन मित्राला सुख द्यावे, हा मुळीच त्याचा हेतू नव्हता. केवळ सूड घेण्याच्या बुद्धीनेच तो नाचत होता. त्याला आपल्या खुनाचा सूड उगवायचा होता. आणि त्यासाठीच तो राजाच्यासमोर नाचला नाही. आपण नाचलो नाही म्हणजे राजाला राग येईल, तो श्रुतवर्माला खोटा व फसव्या ठरवील आणि शेवटी त्याला मृत्यू दंड देईल. ही गोष्ट त्याला पक्की माहीत होती. आणि त्याच्या कल्पनेप्रमाणे खरोखरच त्याचा हेतू साध्य झाला.” अशा प्रकारे राजाचे मौन भंग झाले आणि वेताळ त्याच्या खांद्यावरून नाहीसा होऊन झाडाला जाऊन लोंबकळू लागला.