Bookstruck

धोक्यात जीव

उद्धट नावाच्या देशात घोड्यांच्या चोऱ्या फार होत. म्हणून त्या देशाच्या राजाने घोड्याची चोरी करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याचा कायदा केला. त्या गावच्या एका गृहस्थाकडे रात्री एक ज्योतिषी देशाटन करीत आला. त्याच दिवशी त्या माणसाच्या घरी एक घोडी व्यायची वेळ झाली होती. म्हणून घोडीचा मालक व त्याचा मुलगा पाळीपाळीने जागत होते. घोडी मध्यरात्रीच्या सुमारास विणार असे ज्योतिषाला कळले. म्हणून तो घराबाहेर आला आणि आकाशात नक्षत्रे पाहू लागला. थोड्या वेळाने तबेल्यात येऊन घरमालकाला म्हणाला— “ही घोडी अर्ध्या एका तासाने व्यायली तर?” “हे कसे काय शक्य होईल हो?” घोडीचा मालक म्हणाला. “ही घोडी आतांच व्यायली तर दोघांच्या जिवाला धोका आहे.” ज्योतिषी म्हणाला. परंतु त्याच कुमुहूर्तावर घोडी व्यायली. “आता काय करायचे? यातून काही सुटका?” त्या गृहस्थाने विचारले. “आहे! मी एक तांब्याचा तुकडा मंत्रवून देतो. तो तुकडा घोड्याच्या कपाळावरचे कातडे काढून आत ठेवून कातडे शिवून टाका.” ज्योतिषी म्हणाला. त्या गृहस्थाने ज्योतिषाने दिलेला तांब्याचा तुकडा शिंगराच्या कपाळातले कातडे काढून शिवून टाकला. शिंगरू वाचले व वाढत गेले. मोठेपणी ती एक सुंदर घोडी झाली. एक दिवशी रात्री कोणीतरी ती घोडी चोरून नेली. घोडी कोणी चोरून नेली हे कळले नाही. म्हणून तो गृहस्थ आपल्या मुलाला म्हणाला— “मी घोडीच्या शोधार्थ निघतो.” मुलगा म्हणाला— “बाबा! तुम्ही एकटे नका जाऊ, मीदेखील बरोबर येतो!” “अरे, दोघे कशाला? घोडीला शोधीत कोठे कोठे फिरावे लागेल आणि किती दिवस लागतील, कोण जाणे!” बाप म्हणाला. पण मुलाने ऐकले नाही. दोघे घोडीचा शोध काढीत एका जागी पावसामुळे ओले चिंब भिजून गेले. थंडीमुळे कापत ते एका गावात पोहोचले तेव्हा त्यांना लांबून एक मनुष्य घोड्यावर बसून एका घोड्याला ओढीत नेत असलेला दिसला. मुलगा आपल्या बापाला म्हणाला— “बाबा! ती पहा, आपली घोडी! मी आपल्या घोडीला बरोबर ओळखतो, बाबा!” बाप-लेक आपल्या घोडीविषयी बोलत होते, त्याच वेळी तो घोडेस्वार एका जागी थांबला. “चला आपण तिकडेच जाऊन जवळून पाहू या.” बाप मुलाला म्हणाला. दोघे लोहाराच्या दुकानाजवळ उभे राहिले. “अरे असे बाहेर कां उभे? आत या, भट्टाजवळ उभे रहा. तुम्ही भिजला आहात. भट्टाजवळ उभे राहिलात तर अंगावरचे कपडे वाळून जातील आणि अंगात उबपण येईल.” लोहार म्हणाला. बाप-लेक भट्टाजवळ गेले आणि जवळून त्यांनी आपली घोडी पाहून तिला ओळखले. “होय रे, खरंच ही आपलीच घोडी आहे!” बाप म्हणाला. “बाबा! मी नव्हते का म्हटले?” मुलगा म्हणाला. घोडेस्वार दोघांचे बोलणे ऐकून म्हणाला— “काय म्हणालात?” “ही आमची घोडी आहे, कोणीतरी आमच्या तबेल्यातून चोरून नेली होती!” बाप म्हणाला. “माझ्यावर चोरीचा आळ लावता काय? पहा, फासावर लटकावे लागेल! ही घोडी आमची, आमच्या घोडीची आहे.” घोडेस्वार म्हणाला. बाप-लेकांनी त्या गावच्या न्यायाधीशाकडे फिर्याद केली. न्यायाधीशाने घोडेस्वाराला घोडीबरोबर न्यायालयात यायला सांगितले. न्यायाधीशाने दोघांची चौकशी केली. बाप-लेकांनी ती घोडी आपली असल्याचे व त्यांच्या घोडीला सहा वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले. परंतु त्यांच्या तर्फे कोणी साक्षीदार नव्हता. म्हणून न्यायाधीश त्यांना म्हणाला— “तुम्ही दोघे लबाड दिसता आहात. ही घोडी तुमची आहे याला काही प्रमाण? फुकटात दुसऱ्याची घोडी लुबाडण्याचा तुमचा घाट होतो. म्हणून तुम्हांला फाशीची शिक्षा देतो.” दुसऱ्या दिवशी न्यायाधीशाच्या आज्ञेने शिपाई दोघां बाप-लेकांना पकडून फाशी द्यायच्या जागी घेऊन गेले. फाशी देण्याची तयारी चालू होती. त्याच वेळी दोघांना घोडी जन्मली त्या वेळची गोष्ट आठवली. बाप म्हणाला— “काय रे, ती घोडी जन्मली त्या वेळी ज्योतिषाने सांगितले ते खरे होणार तर. त्या कुमुहूर्तावर जन्मलेल्या घोड्यामुळे आपल्या दोघांचा जीव धोक्यात पडला!” “ज्योतिषाने मंत्रवून ठेवलेला पत्रासुद्धा उपयोगी पडला नाही, म्हणावयाचा!” मुलगा म्हणाला. “अरे हो, तो पत्रा घोड्याच्या कपाळातच असणार!” बाप म्हणाला. फाशी द्यायची वेळ झाली. न्यायाधीश स्वतः हजर होता. कायद्याप्रमाणे त्याच्या समक्ष शिक्षेची अंमलबजावणी होणार होती. बाप साहस करून न्यायाधीशाला म्हणाला— “सरकार, एक गोष्ट सांगायला विसरलो. घोडीच्या कपाळात एक पत्र्याचा तुकडा शिवून ठेवलेला आहे. तो काढून पहावा. तो मंत्रवलेला पत्रा तिथे नसेल तर आपण द्याल ती शिक्षा मंजूर आहे!” शिपायांनी न्यायाधीशाच्या आज्ञेने घोडीच्या कपाळावर पाहिले. एका जागी शिवल्याचे चिन्ह होते. त्या जागेवरचे कातडे काढल्यावर मंत्रवलेला पत्र्याचा तुकडा मिळाला. आता न्यायाधीशाला ती घोडी कोणाची आहे याबद्दल शंका उरली नाही. त्याने दोघा बाप-लेकांना ती घोडी दिली आणि घोडीची चोरी करणाऱ्या घोडेस्वार चोराला फाशीची शिक्षा दिली.