धान्दरटपणामुळे
सोमशास्त्री भिक्षुक होता. पौरोहित्य हा त्याचा धंदा. बारीक-सारीक गोष्टींनी तो घाबरून जाई आणि धान्दरटपणा करी. सवयच झाली होती त्याला तशी.
शेजारच्या गावी लग्न होते. सोमशास्त्रीलाच पुरोहित म्हणून बोलावले होते. त्याला खूप आनन्द झाला. पोचायला उशीर होऊ नये म्हणून घाबरून कोंबडा आरवण्यापूर्वीच निघता निघता तो बायकोला म्हणाला, "मी निघालोय. अजून अन्धार आहे बाहेर. दरवाजा नीट बन्द करून घे. नाहीतर चोर येऊन घर लुटतील. सावध राहा."
झोपेतून उठून सोमशास्त्रीच्या बायकोने दरवाजा बन्द केला अन् ती पुन्हा झोपली.
घराजवळच संधी शोधत बसलेल्या चोरांनी सर्व काही पाहून घेतले. रात्रभर त्यांना कुठे डल्ला मारायचे जमले नव्हते. सोमशास्त्री निघून गेलाय, त्याची बायको घरात एकटीच असून बाहेर उजाडायला अजून एक प्रहर लागेल, असे पाहून त्यांनी विचार केला की या घरात चोरी करण्यासारखे मौल्यवान काही नसले तरी भिक्षुकीचा तांदूळ तरी भरपूर असेल.
चोर घरात घुसले. कुठेही दिवा जळत नव्हता. सर्वत्र अन्धारच अन्धार पसरला होता. हे आपले भाग्यच समजून ते कामाला लागले.
इतक्यात धान्दरट सोमशास्त्री गडबडीने घरी परत आला अन् दरवाजा खडखडावत बायकोला हाका मारू लागला. तिने उठून दरवाजा उघडला.
"अगं उपरणं विसरलो" म्हणत, ते आपल्या खांद्यावर टाकून सोमशास्त्री आला तसाच घाईघाईने परत गेला.
पुन्हा दरवाजा बन्द करून बायको झोपून गेली. चोरांना जेंव्हा ती गाढ झोपल्याची खात्री वाटली, तेंव्हा ते तांदुळाचे पीप शोधू लागले. ते जेंव्हा नजरेस पडले तेंव्हा त्यांनी जवळच एक चादर पसरली. तांदूळ चादरीत ओतून घेऊन पसार व्हायचा त्यांचा विचार होता.
इतक्यात सोमशास्त्रीने पुन्हा परत येऊन बायकोला उठवले. तिने दार उघडून त्याला विचारले, "आता काय विसरलात?"
"झोळी विसरलो गं! आण लवकर." शास्त्री म्हणाला. झोळी तांदुळाच्या पिपाजवळच्या खुंटीला लावलेली होती.
ती जेंव्हा झोळी घ्यायला तिथे गेली तेंव्हा चोर कोपऱ्यात दुबकून बसले. खाली पसरलेली चादर पायाला लागताच वाकून तिने ती उचलली अन् झोळी देऊन झाल्यावर चादर लपेटून पुन्हा ती झोपून गेली.
ती झोपल्याची खात्री करून घेऊन चोर पिपातला तांदूळ काढून जमिनीवर ओतत राहिले. अंधारात त्यांना वाटले की, आपण चादरीवरच तांदूळ काढत आहोत. पीप जवळजवळ रिकामे झाले, तेंव्हा तो उचलण्यासाठी अंधारात चाचपत चादरीची टोके शोधू लागले. पण कोणतेच टोक हाती न लागल्याने त्यांच्या लक्षात आले की, तांदूळ तर आपण जमिनीवरच ओतत आहोत!
'आता काय करावे?' अशा विचारात चोर असताना पुन्हा तिसऱ्यांदा दरवाजा खडखडला!
दार उघडून बायको म्हणाला, "सकाळ तर झालीच. आता मीही आपल्या कामांना लागते कशी!"
हे ऐकून चोर घाबरून गेले अन् येताना आपण पाडलेल्या भगदाडातून पुन्हा बाहेर पळून गेले. या गडबडीत धान्दरटपणाने स्वतःजवळील पैशांची थैली मात्र ते घरातच विसरले.
यावेळी मात्र सोमशास्त्री कोणतीही वस्तू न विसरता सर्व काही घेऊन वेळेवर लग्नघरी पोचला. त्याच्या घाबरटपणाचा आणि धान्दरटपणाचा त्याला न कळत फायदाच झाला होता.