डोळे उघडले
सासर पाऊल टाकतांच रमाला वाटलं की तिची सासू तिच्याकडून घरातली सर्व कामे कंबर मोडेपर्यंत करून घेणार. परंतु रमाची सासू स्वभावाने गरीब होती. ती रमाला तिच्या आईपेक्षा जास्त प्रेमाने वागवी. सासूच्या या मऊपणाचा गैर फायदा रमाने घेतला. तिने कामाला हात न लावण्याचे ठरविले, सर्व कामे तिची सासूच करी.
एके दिवशी तिचा थोरला भाऊ तिला भेटायला आला. त्याची बायको नुकतीच सासरी आली होती. रमाने आपल्या दादाला विचारले— "दादा! मालतीवहिनी घरातली सर्व कामे करीत असतील नाही! आईला म्हातारपणी थोडी विश्रांती मिळत असेल नाही?"
"नाही ग रमा! मालती एकही काम करीत नाही. आईवरच कामाचं सर्व ओझे आहे!" तिचा दादा म्हणाला. त्याने त्यापूर्वी रमा सासरी कशी वागते हे पाहून घेतले होते. रमा रागाने भावाला म्हणाला— "तर मग दादा, वहिनीला माहेरी दे पाठवून! म्हणजे तिचे डोळे उघडतील."
"मी तोच विचार करीत होतो. परंतु येथे येऊन तुझा संसार पाहिला व विचार बदलला. कारण मी ज्या दिवशी मालतीला माहेरी पाठवीन त्याच दिवशी आमचे मेहुणे तुला आमच्या घरी पाठवितील. मी पाहतो आहे, तुझ्यामुळे तुझ्या सासूचे काम कमी होण्याऐवजी वाढलं आहे." रमाचा भाऊ म्हणाला. रमाचे डोळे उघडले व ती घरातली सर्व कामे करू लागली.