Bookstruck

चोरांची मेजवानी

भीमशंकर नावाचा माणूस शेजारगांवी नात्यातल्या घरी लग्नाला गेला व लग्न आटोपून संध्याकाळच्या सुमारास परत निघाला. त्याला एक जंगल पार करून जावे लागले. जाते वेळी अचानक मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसात न भिजण्याच्या इच्छेने त्याने आजुबाजुला काही आडोसा आहे कां पाहिले. त्याला जवळच एक पडकी झोपडी दिसली. तो धावतच त्या झोपडीत शिरला व अगदी एका कोपऱ्यातील आडोश्याला जाऊन बसला. तितक्यात पंचवीस चोरांची टोळी आपल्या सरदारासह तेथे आली. सर्व घोड्यांवरून खाली उतरून झोपडीत शिरले. त्यांनी आपल्या सोबत आणलेले साहित्य काढून ठेवले व ते आतल्या खोलीत जाऊ लागले. तेव्हां त्यांचा सरदार इतर चोरांना आज्ञा करीत म्हणाला—"आज हि वादळी हवा व पाऊस थांबण्याचे लक्षण दिसत नाही. तेव्हां तुम्ही सर्वांनी फक्कड पैकी जेवण तयार करा." चोरांच्या सरदारांनी आज्ञा करायचा अवकाश ताबडतोब चोरांनी चूल मांडली व बरोबर तीन तासाच्या आत मस्त स्वयंपाक बनवला. भीमशंकरला तो घमघमाट वास येऊन तोंडाला पाणी सुटले. भीमशंकर तसा धाडसी व शूर होता तल्लख बुद्धीचा होता. तो हळूच खोली बाहेर आला व चोरांचा डोळा चुकवत त्यांच्याच गाठोड्यांतील काही कपडे घालून त्यांच्या सारखाच एक चोर बनला. थोड्या वेळाने चोरांना जेवणाकरीता पत्रावळी मांडण्यात आल्या. तेथे एक मिणमिणता दिवा लावण्यात आला. त्या अंधुक उजेडात स्पष्टसे दिसत नव्हते. चोरांचा सरदार पत्रावळी निरखीत म्हणू लागला—"अरे, आपण तर सर्वजण मिळून सव्वीसजण आहोत त्यांतील स्वयंपाक करायला चार जण गेली. बाकी उरली बावीस मग इथे तेवीस पत्रावळी कशा आल्या ? हे कसे काय झाले बुवा ? म्हणजे ह्याचा अर्थ आपल्या टोळीत कोणी परका माणूस शिरलेला दिसतो." ते बोलणे ऐकून सर्व चोर आश्चर्यचकित झाले व एकमेकांचे चेहरे निरखू लागले. त्याचा सरदार म्हणाला—"परक्या व्यक्तीला पकडणे अगदी सोपे आहे. ह्याकरीता एक उपाय आहे. असे म्हणत त्याने आपल्या प्रमुखाला जवळ बोलावले व इतर चोरांना उद्देशून म्हटले—"ऐका आम्ही दोघे ह्या बाजूच्या खोलीत जातो. तुम्ही एकेक जण त्या खोलीत यां. मी ह्या जळत्या चिरूटांनी एकेकाला डागत जाईन. जो ते डागणे सहन करू शकणार नाही तोच माणूस नविन आहे. मग मी त्याला समोरच्या झाडाला टांगून ठेवीन." त्यानंतर सरदार व प्रमुख बाजूच्या खोलीत गेले. नंतर एकएक चोर त्यांच्या खोलीत गेले. प्रत्येक वेळी "आई ! ओय्" असा एकच आवाज ऐकू आला. ते ऐकून भीमशंकरने मनोमन जाणले की सरदार कोणालाही चिरूटाने डागीत नसावा परंतु त्याची आपल्याला शोधण्याची कल्पना असावी त्यामुळे तोही इतरांसारखाच खोलात गेला. तेव्हां चोरांच्या सरदारांचा प्रमुख आई! ओय् करीत जरासा किंचाळला व भीमशंकरला बाजूला बसवले शेवटी एकएक करीत सर्व चोर संपले. तेव्हां चोरांचा सरदार सर्वांना उद्देशून म्हणाला—"आपल्यात घुसलेली व्यक्ति मोठी चतूर दिसते आहे. त्याच्यावर माझ्या युक्तिचा उपयोग झाला नाही. परंतु मी नक्कीच त्याला पकडेन. मी परत त्या खोलीत जातो. तुम्ही परत एकेकांनी आत या. आज रात्रीचा जो आपला सांकेतिक शब्द आहे तो तुम्ही मला सांगत चला." चोर सरदाराच्या खोलीत जाऊ लागले. परंतु भीमशंकरला तर त्यांचा सांकेतिक शब्द माहीत नव्हता. त्यामुळे तो अत्यंत घाबरून गेला. तेवढ्यात त्याला स्वयंपाक घरात जे दोघेजण होते त्यांचे कुजबुजणे ऐकू आले. त्यातील एकजण दुसऱ्याला खिजवीत म्हणत होता—"अरे मूर्खा, एक नंबरचा विसरभोळू आहेस !" भीमशंकर गुपचुप त्या दोघांच्या जवळ जाऊन म्हणाला—"तू तर पहिल्या पासूनच विसराळू आहेस. मग तूच तर तो शब्द विसरला नाहीस नां ?" ते ऐकताच त्याला अतिशय राग आला व म्हणाला—" 'लम्बा लुम्बा' असे दहादा सांगू कां ? काय रे मी साधे शब्द सुद्धा लक्षात ठेवणार नाही होय ?" भीमशंकरचा आनंद गगनात मावेना. जेव्हां त्याची सरदाराच्या खोलीत जाण्याची पाळी आली. तेव्हां तो आत जात एकदम जोरात किंचाळला. "लम्बा लुम्बा." जेव्हां सर्वजणांनीच तो संकेत सरदाराला ऐकवला. तेव्हां सरदार आश्चर्यचकित झाला सर्व चोरांना उद्देशून म्हणाला—"अरे वा, जो आगंतुक आहे. तो मोठा चतुर आहे मी तर अशा माणसाचा सन्मान करावा म्हणतो. जर कां तो माझ्या समोर आपणहून येईल तर त्याला मी बक्षिस देईन त्याला शिक्षा न करता मुक्त करीन. ह्या गोष्टीची मी शपथ घेतो." दुसऱ्याक्षणी भीमशंकर सरदाराच्या समोर येऊन उभा राहीला व सत्य हकिकत सांगत म्हणाला—"मी तर खरा भुकेला होतो. वर आपल्या येथील मस्त स्वयंपाकाच्या घमघमाटाने मला असे धाडस करण्याचे उत्तेजन मिळाले." सरदार जोरजोरात हसू लागला व म्हणाला—"आता स्वयंपाकाचा वासचं घेऊ नकोस तर त्याचा स्वाद सुद्धा घेऊन पहा ! ये, आमच्या सर्वांच्या बरोबर जेव." चोरांच्या सरदाराने भीमशंकरला पोटभर जेवण दिले. तो जेव्हां परत जाऊ लागला. तेव्हां सरदाराने त्याला दहा सोन्याची नाणी बक्षीस पण दिली.