Bookstruck

गोल दगडाची कहाणी

विद्यानंदस्वामी विजयपुरात आले होते. त्या दिवशी संध्याकाळी ते प्रवचन देणार होते व नागरिकांना भेटणार होते. सुरेख रीतीने सजवलेल्या मंचाच्या डाव्या बाजूला एका खास आसनाची व्यवस्था केली होती. जमीनदार जगपती राव यांनी विद्यानंदांचा आपल्या घरी पाहुणचार तर केलाच, त्याशिवाय त्यांच्या प्रवचनासाठी आवश्यक ते धनही दिले होते. त्यांच्यासाठीच ते आसन ठेवले होते. पण जगपती राव तिथे न बसता खाली इतर श्रोत्यांबरोबर बसले. विद्यानंद स्वामी ते पाहून प्रसन्न झाले व म्हणाले, "मानवांत जे गुण असायला हवेत, त्यांत विनय हा प्रमुख आहे. विनय असला की सहनशक्ती, श्रद्धा, हे गुण आपोआप येतात. असं म्हणतात की मनुष्याला संपत्ती, पत्नी, घर व संतान जी मिळतात, ती सारी पूर्वजन्मीची पुण्याई असते. पण त्यावर भरवसा ठेवून गप्प बसणे हा काही शहाणपणा नसतो. इहलोक व परलोकांतल्या सुखासाठी निरंतर प्रयत्न हवेत. त्यापेक्षाही जास्त हवी परमेश्वरी कृपा. तेव्हांच जीवनाचे ध्येय साध्य होऊ शकते आणि सद्गती प्राप्त होते. तोपर्यंत सहनशक्ती आवश्यक असते. त्यासाठी नम्रपणा हवा. जीवनांत चढउतार असले तरी विनय हा हवाच. त्याची सवय असावी. घमेंड नसावी. उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक गोल दगडाची कहाणी सांगतो. लक्ष देऊन ऐका." आणि ते सांगू लागले. गोदावरी नदीच्या काठावरच्या सुंदर प्रदेशांत आंबे, फणस, नारळ व केळ्यांसारखी फळझाडे होती. एकदा गोदावरीला पूर आला. त्या पुराच्या पाण्यांत गाळाबरोबरच डोंगरातून घरंगळत आलेले काही दगडही होते. त्या गडगडत येणाऱ्या दगडांच्याबरोबर एक गोल दगड वाहात आला आणि काठावरच्या नारळाच्या झाडांमध्ये येऊन रुतला. तो नारळाच्या मुळांत अडकला होता, त्यामुळे तो पुढे जाऊ शकला नाही. हळूहळू पूर ओसरला. सूर्याच्या किरणांमुळे तो दगड चमकायला लागलेला पाहून नारळाच्या झाडांना आश्चर्य वाटले. एका परिपक्व नारळाने त्या दगडाला म्हटले, "ओ, कोण आहेस रे तू? कुठून आलास? इथे कां थांबलास?" त्याने गर्जतच विचारले. दगड गप्प राहिला. तेव्हा दुसऱ्या झाडावरच्या नारळाने त्याची टवाळी करीत म्हटले, "ह्याची कथा मला चांगलीच ठाऊक आहे. ह्याचा जन्म पर्वतांत होतो आणि प्रवाहाबरोबर तो खाली येत राहतो. प्रवाहाच्या वेगामध्ये मोठ्या दगडांचे लहान-लहान तुकडे होत राहतात. हा देखील त्या बारीक दगडांपैकीच एक आहे. गडगडत इथे आला, जखमा सोसल्या आणि आता त्याचा गरगरीत गोल आकार झालेला दिसतो आहे. बिचारा पुरामुळे इथे आपल्यांत आला आणि अडकला; नाहीतर आणखी जखमा सोशीत त्याचा एक लहानसा वाळूचा कण झाला असता आणि समुद्राच्या तळाशी जाऊन हा थांबला असता." "बिचारे हे गोल दगडगोटे; सहनशक्तीला देखील काहीतरी सीमा असावी! आता आमचं पहा, आम्ही आत्माभिमानाने भरलेले असतो. आभाळाला स्पर्श करीत आनंदाने आणि अभिमानाने आम्ही जगतो." आणखी एका नारळाने सांगितले. तरीदेखील तो गोल दगड गप्प होता. असाच काही काळ उलटला. नदीजवळच्या एका गावात एक शिवालय होते. तिथला पुजारी एका थाळीत नारळ, गंध, फुले, उदबत्ती देवापुढे ठेवून पूजा करीत होता. नारळाने आपले तिन्ही डोळे उघडले आणि तो देवाकडे पाहू लागला. तिथे गोल काळा दगड चमकत होता. तो उंचावर ठेवलेला होता. नारळाला झाडांमध्ये अडकलेल्या त्या गोल दगडाची आता आठवण झाली. तो नारळ त्या दगडाचा विचार करीत होता. तेवढ्यात गोल दगड नारळाला म्हणाला, "अरे मित्रा, त्यावेळची तुमची उच्च स्थिती व स्वाभिमान कुठे गेले? तूच म्हणत होतास की सहनशक्तीला देखील सीमा असावी. माझी चेष्टा करीत म्हणत होतात की मला ह्या गोष्टींची माहिती नाही, मला स्वाभिमान नाही, अपमान सोसणे हेच माझ्या भाग्यांत लिहिलेले आहे, वगैरे वगैरे! माझ्यावर दया दाखवत होतात आणि स्वतःला अमर, अटल समजत होतात. पण आता काय झाले?" तेवढ्यात पुजाऱ्याने आपल्या हातांत नारळ घेतला आणि दगडावर आपटून त्याचे दोन तुकडे केले. पश्चात्तापाने नारळ दगडाला म्हणाला, "मित्रा, मला क्षमा कर. त्या दिवशी उंच झाडावर होतो, स्वतःला उच्च समजत होतो, आणि तुला शिव्या देत होतो. आता माझी वाईट परिस्थिती आहे. मी स्वतःला समर्पित करतो आहे. आमच्यापेक्षाही उंच पर्वतावर तुझा जन्म झाला, पवित्र गोदावरीत राहिलास आणि पूजेसाठी योग्य बनलास. सहनशक्तीपेक्षा जास्त मोठा असा कोणताही गुण नाही, हे तू सिद्ध केलंस." त्यानंतर शिवाला अर्पण केलेला नारळही पवित्र झाला व प्रसादरूपाने भक्तांना तो वाटला गेला. विद्यानंद स्वामींनी पुढे म्हटलं, "नदीच्या प्रवाहात अडकलेल्या गोल दगडाप्रमाणे माणसांना देखील जीवनामध्ये उतार-चढावाचा सामना करावा लागतोच. सारे काही सहन करून जो माणूस सन्मार्गावर चालतो, तो एक दिवस उन्नत स्थिती प्राप्त करतो आणि धन्य म्हणवला जातो."