All Marathi Stories

गुंडप्पाचा गर्वभंग

फार पूर्वी जत संस्थानाच्या दरबारात गुंडप्पा नावाचा एक पहेलवान होता. त्याचा आहार पाचसहा जणांना पुरेल एवढा होता. त्याचे पिळदार अंग पाहून त्याच्याशी थट्टामस्करी करायलासुद्धा कोणी धजत नसे. कुस्तीत त्याला कोणी जिंकल्याचे पंचक्रोशीत कोणी ऐकले नव्हते. त्याच्याशी कुस्ती खेळायची ज्याने कोणी हिंमत दाखविली त्याला महिना पंधरा दिवस अंथरूणच धरावे लागे. म्हणून गुंडप्पाला गर्व चढला होता. त्याला कोणाची भयभीती किंवा थोरा-मोठ्यांचा आदर करणे हे माहीतच नव्हते. तो कोठे खरेदीसाठी जाई तर दुकानांतला जो माल त्याला हवा असेल तो स्वतःच्या हाताने उचलून नेई. एकदा बाजारात एक बाई मोसंबी विकायला बसली होती. गुंडप्पाने तिच्या टोपलीत हात घातला आणि दहाबारा मोसंबी काढून घेऊन टोपली लाथेने उडविली. रस्ताभर मोसंबी पसरली. म्हातारी संतापून म्हणाली- "आपला प्रताप या म्हातारीवर तू दाखवितो आहेस, तुझी हिम्मत असेल तर आमच्या गावच्या दगडवर दाखवीर एकदा." "म्हातारे, तुझ्या गावाचे नाव काय ग?" गुंडप्पाने विचारले. "बाळेहल्ली!" म्हातारी म्हणाली. "दाखवितो माझा प्रताप, म्हातारे! उद्या संध्याकाळपर्यंत मी त्या दगडाचे प्रेतच आणून टाकतो या बाजारात." म्हणत गुंडप्पा निघून गेला. परंतु त्या दगडाला धरून त्याला ठार करीपर्यंत गुंडप्पाला काही सुचत नव्हते, तो लगेच घोड्याच्या गाडीत बसून बाळेहल्लीला निघाला. गाडी त्या गावी पोचेपर्यंत संध्याकाळ झाली. गाडीतून उतरल्याबरोबर त्याला ज्या ज्या गावकऱ्याने पाहिले तो कोणी भूत तर नाही अशी धास्ती घेऊन दूरून निघून गेला. गुंडप्पा मिशा पिळवटत पुढे निघाला. त्याला पाहून जे दूर पळून गेले होते त्यांच्यापैकी कोणाला त्याने हाक मारून बोलावले तर तो आणखी दूर पळून जाऊ लागला. नंतर त्याला एक म्हातारा दिसला. त्याने विचारले- "काय रे ए म्हाताऱ्या, या गावात कोणी दगडू धनगर आहे म्हणे? तो कोठे राहतो तुला माहीत आहे का?" "माहीत नसायला काय झालं, बाबा! गावाबाहेरच्या मैदानात तो मेंढरं चरायला सोडला आहे." गुंडप्पा तिथे पोचला तेव्हा त्याला तिथे एक माणूस चिंचेच्या डाळचा तोडून मेंढरांना खायला टाकीत असलेला दिसला. गुंडप्पाने त्याला तिरप्या नजरेने पहात विचारले- "तूच का रे दगडू?" त्याने त्याच्याकडे एकदाच पाहिले व गुंडप्पा असावा हे ओळखून स्वतःची ओळख इतक्या सहजी न देण्याचे ठरवून दगडू म्हणाला- "नाही हो, भाऊ! तुम्ही दरबारातले पहेलवान साहेब नाही का? माझ्या दादाजवळ आपले काय काम आहे?" "ह्याला आपल्या शक्तीची फार घमेंड आहे, म्हणे. एकदोन हात त्याच्याशी झाले तर पहावे, म्हटलं!" गुंडप्पा म्हणाला आणि दगड फांदी ओढीत होता ती धरून एकाच ओळीत ती फाडकन आवाज करीत खाली कोसळली. दगडू आश्चर्य करीत पहात म्हणाला- "तुमच्या बरोबर त्याची काय तुलना? तुमच्या पायाच्या नखाची तरी तो बरोबरी करू शकेल का?" "पहिल्याने तो आहे कोठे, सांग!" थोड्याशा कडक स्वरात गुंडप्पा म्हणाला. "शेजारच्या गावी गेला आहे. रात्री परतेल. तुम्हाला तोपर्यंत माझ्याकडे राहावे लागेल! मी ही मेंढरं परसांत पोचवून येतो." दगडू म्हणाला. दगडू गुंडप्पाला आपल्या घरी घेऊन गेला व मोठ्याने हाक मारून म्हणाला- "आपल्याकडे आज एक पाहुणा आला आहे, बरं का!" "चल रे, तुझी कणेहरी माझ्या कोठल्या कोपऱ्यात जाणार?" गुंडप्पा म्हणाला. "हे पहा हो, ही मेंढरे आपली नाहीत, आतांच एखादं कापायला म्हणून गैर न मानून या गरिबाचं आतिथ्य स्वीकारण्याची कृपा करा." दगडू म्हणाला. आणखी एका तासाभराने दोघे जेवायला बसले. दगडूच्या आईने दोन मोठ्या पत्रावळीवर दोघांना जेवायला वाढले. गुंडप्पाने पहिलाच घास तोंडात घातला आणि म्हणाला- "हे काय हे, हा भात आहे, की खडे उकडले आहेत?" "दात नसलेल्या म्हाताऱ्यांसाठी मऊ भात शिजवावा लागतो. दगडगोटे खाऊन पचविणाऱ्या आपल्या सारख्या तरुणांना कशासाठी?" या शब्दात दगडूने म्हटल्यावर गुंडप्पा थोडा लाजल्यासारखा झाला. मऊ मऊ मांस खाणाऱ्या गुंडप्पाला अर्धवट शिजलेला फडफडीत भात घशाखाली उतरत नाहिसा झाला. म्हणून प्रत्येक घासाबरोबर पाणी पिऊन त्याला भात कसा तरी संपवावा लागला. खाल्ला नाही तर मान खाली होईल, असे वाटले त्याला. गुंडप्पाची ती केविलवाणी दशा दगडूला चांगली कळत होती. म्हणून तो मनातल मनात हसत होता आणि आईला मोठ्याने हाक मारून म्हणाला- "आई, तेल आण ग, थोडं!" "वाचलो, बाबा!" गुंडप्पा मनात म्हणाला. परंतु दगडूची आई घेऊन आली ते तेल नव्हते, तीळ होते. "अहो, पाहतां काय, तेल घ्या!" असे म्हणत दगडूने आपल्या उजव्या हातावर मूठभर तीळ घेतले व मुठीत दाबून त्याचे तेल भातावर पिळले. ते तसं काढता येते हे गुंडप्पाला माहीतच नव्हते परंतु त्याला वाटलं दगडू करू शकला तर आपल्याला ते तर आणखी जास्त सहजी करता येईल, त्याने सुद्धा मूठभर तीळ घेतले व पिळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु त्याचे हात मात्र दुखू लागले आणि तेलाचा एकही थेंब गळला नाही. "तेल आलं नाही का हो?" असे म्हणत दगडूने आपल्या डाव्या हाताने गुंडप्पाचा हात तिळासह जोराने दाबला. त्या सरशी गुंडप्पाच्या हातातून तेलाबरोबर गरम गरम रक्तसुद्धा थोडे गळले. गुंडप्पाला जीव जातो की काय, वाटले. परंतु हात दुखतो आहे, म्हटले तर कमीपणा होतो. म्हणून स्वतःला कसंतरी सावरून रडक्या आवाजाऐजी सामान्य आवाजात म्हणाला- "पुरे!" दगडूने गुंडप्पाचा हात सोडला व जेवू लागला. "आलोच हं!" असं सांगून गुंडप्पा काळोखात कोठे गेला तो परतलाच नाही.