All Marathi Stories
गाढवावरचे ओझे
एका गावी भिकू नावाचा धोबी होता. त्याला मुलेबाळे पुष्कळ होती. कुटुंबाचा भार सहन करणे अशक्य झाल्यामुळे तो एके दिवशी घरातून पळून गेला. त्यानंतर भिकूचा तेरा वर्षांचा सर्वांत मोठा मुलगा कुटुंबाचा सर्व भार आपल्या शिरावर घेऊन काम करू लागला.
पाच वर्षांनंतर भिकू घरी परतला, तेव्हा मोठा मुलगा कुटुंबाचा सर्व भार सांभाळीत असलेला पाहून त्याला आनंद झाला. बाप आपल्या वरचा थोडा भार उचलून आपली जबाबदारी कमी करील, असे मुलाला वाटले.
परंतु भिकूने परत आल्यावर मुलाला कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. तो खाऊन पिऊन स्वस्थ गप्पा मारीत बसे. काही दिवसांनी मुलाने बापाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायच्या हेतूने गाढवाच्या पाठीवर कपड्यांची मोठमोठी गाठोडी त्याला वाहून नेणे कठीण जाईल एवढी ठेवली व स्वतः वर चढून बसला.
ते पाहून भिकू ओरडला— "अरे, अरे! गाढवाचा जीव जाईल की रे! त्याच्या पाठीवर टाकलेले ओझे त्याला वाहून नेणे अशक्य आणि वर, चढून बसला आहेस का?"
"तेच मी तुम्हांला विचारावे म्हणतो आहे, बाबा! पहात असलेले ओझे पुरेसे नाही असे समजून का तुम्ही माझ्या छातीवर येऊन बसलां आहां?" मुलगा म्हणाला. ते ऐकून भिकूची बुद्धी ठिकाणावर आली.