Bookstruck

खोट्यावर खोटं

माधवपूरच्या जमीनदारांकडे गोविंद नावाचा काम करणारा एक मुलगा होता. त्याचा बाप जमीनदाराकडे नोकरी करत असता गोविंदच्या लहानपणीच वारला. त्याला त्याच्या आईशिवाय जवळचा नातेवाईक कोणीच नव्हता. जमीनदाराने त्याच्यावर दया करून त्याला आपल्याच घरी, नोकर म्हणून ठेवले. आता गोविंद अठरा वर्षांचा झाला होता. एकदा जमीनदाराने गोविंदला एक काम सांगितले. त्याच्या मुलीचे लग्न शेजारच्या जमीनदाराच्या मुलाशी व्हायचे ठरले होते. त्यासाठी साखरपुड्याचा मुहूर्त पौर्णिमेच्या दिवशी ठरवण्यात आला होता. परंतु तो मुहूर्त काही कारणामुळे पुढे ढकलावा लागत आहे, हा निरोप भावी व्याह्यांकडे पोचवण्याचे काम गोविंदला सांगितले होते. ते काम त्याला सांगून जमीनदार गावात काही कामासाठी गेला. गोविंद शेजारच्या गावी जायला निघणार तेवढ्यात दिवाणसाहेबांनी आणि नंतर राणी सरकारांच्या कडेलोट्यांनी काही कामे सांगितली. ती सर्व कामे करून जायला संध्याकाळ झाली. त्या दिवसातला एक तासच उरला. मुलांच्या गावी जाऊन परत यायला संध्याकाळ होऊन चांगली रात्र होणार. रस्ता तसा बेताचाच होता. काळोखातूनच यावे लागले असते. ते त्रासाचेच होणार होते. परंतु मालकांनी जरुरीचे काम सांगितले होते. ते टाळता येणे शक्य नव्हते. गोविंद काय करावे, या विचारातच असता एक म्हातारा नोकर त्याला म्हणाला - "रात्रीच्या वेळी कोठे जाणार रे? कीड-मुंगी कोठे असणार सांगता येईल का? साखरपुड्याला आणखी चार दिवस आहेत. उद्या बरं नाही हे सांगून एक दिवसाची सुट्टी मागून घे. गावातून परत येऊन मालकांनी रात्री विचारले तर निरोप पोचवला, असे सांगितले की झाले." असा सल्ला म्हाताऱ्या नोकराने दिला. तो सल्ला गोविंदला चांगला पटला. रात्री मालकांनी परत आल्याबरोबर गोविंदला निरोप पोचला का, चौकशी केली. "पोचवला मालक!" गोविंद म्हणाला. "त्यांच्या घरात कोणाला तरी सांगितलेस का? की जमीनदारसाहेबांनाच सांगितलेस?" जमीनदाराने विचारले. "जमीनदारसाहेब घरीच होते. त्यांनाच सांगून आलो, मालक!" गोविंद म्हणाला. "ते काय म्हणाले?" जमीनदाराने विचारले. "ठीक आहे, असे सांग, म्हणाले मालक." गोविंद म्हणाला. "त्यांच्या गावी जायच्या वाटेवरच्या ओढ्याला पूर आला होता, म्हणे? मग तू कसा गेलास रे?" जमीनदाराने विचारले. गोविंद थोडादेखील न कचरता म्हणाला - "मला पोहता येते ना! पोहून पलीकडे गेलो. परत येताना लाकडी पुलावरून आलो." जमीनदारसाहेबांनी हळू हळू मान डोलावित विचारले - "जमीनदारसाहेबांचे चिरंजीव त्यांच्या मामाच्या घरून काल परत येणार होते, ते आले का?" "परत आले मालक! कधी आले ते मात्र माहीत नाही. घरात दिसले खरे!" गोविंद म्हणाला. "असं, जमीनदारसाहेबांच्या मागच्या भिंतीच्या बाजूला आंब्याच्या झाडाला मोहोर आला होता का रे?" जमीनदाराने विचारले. ते मोहोर येण्याचे दिवसच होते, म्हणून गोविंदने न अडखळता उत्तर दिले - "आता आताच मोहोर थोडाथोडा येऊ लागला आहे, मालक?" गोविंदला अशा तऱ्हेने खोट्याच्या पाठीमागून खोटे सांगत जाणे अवघड जाऊ लागले. मालकांनी आता तरी सोडले तर बरे होईल, असे गोविंदला वाटले. परंतु शेजारीच एक खुर्ची पडली होती तीवर बसून जमीनदारसाहेबांनी विचारले - "त्याच्या घरची दुभती गाय दूध देत नव्हती, म्हणे, असे मी ऐकले होते, आता कशी आहे रे?" गोविंदला ताबडतोब काय उत्तर द्यावे, सुचले नाही. परंतु त्याने विचार केला एवढे मोठे जमीनदार औषधपाणी केल्याशिवाय राहतील का? म्हणून त्याने थाप मारली - "आता गाय चांगली आहे, मालक! कोणताच आजार नाही." ते उत्तर ऐकून जमीनदारसाहेब थोडेसे स्मित करून म्हणाले - "कायरे, गोविंदा तू आतापर्यंत जेवला आहेस की नाही?" त्याला त्यावेळी चांगली भूक लागली होती. परंतु त्या मोठ्या जमीनदाराकडे भोजन केले नाही म्हटले तर त्या जमीनदारसाहेबांना कमी लेखल्यासारखे होईल, असा विचार करून त्याने थाप ठोकून दिली - "त्यांच्या घरच्या लोकांनी पोटभर जेवायला घालूनच पाठवले. आता घरी जातो, मालक!" कारण त्याला, आणखी किती खोटे बोलावे लागेल, याची भीती वाटू लागली होती. जमीनदार त्याच्याकडे खोल नजरेने पाहात म्हणाले - "तू खोटे बोलायला कधीपासून शिकलास रे?" तो प्रश्न ऐकून आपण खोटे बोलल्याचे मालकाला कळल्याचे त्याच्या लक्षात आले. तो भीतीने घामाघूम झाला. पण जमीनदारसाहेब शांतपणे हसत म्हणाले - "कायरे, तू त्या गावी काही कारणाने जाऊ शकला नसशील. ती गोष्ट मला सांगितली असतीस तर मी तुला, उद्या जा म्हटले नसते का? पण त्यासाठी एवढे खोटे बोलण्याची गरज काय होती? एक खोटे लपवण्यासाठी खोट्यांवर खोटे बोलावे लागले ना? आतापर्यंत ही गोष्ट तुझ्या लक्षात आलीच असेल?" गोविंदला कापरे भरले होतेच. तो मान खाली घालून उभा होता. "आज संध्याकाळी ते जमीनदारसाहेब मला गावात भेटले होते. त्यांना मी मुहूर्त पुढे ढकलावा लागत असल्याचे सांगितले. ते घरातच होते असे तू खोटे सांगितलेस. ओढ्याला पूर आला होता म्हटले तर ते खरेच समजून तू आणखी एक थाप दिलीस. तो ओढा कोरडा पडला आहे, ही गोष्ट तुला माहीत नव्हती. होय ना?" जमीनदारसाहेबांनी विचारले. "माहीत नव्हते, मालक! त्या बाजूला फार दिवसांपूर्वी गेलो होतो." गोविंद घाबऱ्या आवाजात म्हणाला. ते उत्तर ऐकून जमीनदार मोठ्याने हसून म्हणाला - "जमीनदारसाहेबांचा मुलगा अजून मामाकडून परतला नाही. नंतर जमीनदारसाहेबांच्या परसात आंब्याचे झाड नसून कडुलिंबाचे झाड आहे. त्याचप्रमाणे दुभत्या गाईला आजार वगैरे गोष्टी." गोविंदने खाली घातलेली मान वर उचलली नाही. जमीनदार खुर्चीवरून उठत म्हणाले - "गोविंदा, आता यापुढे तू कधी खोटे बोलू नकोस. खोटे हे विस्तवासारखे समज. आज नाही तर कधीतरी बाहेर पडतेच!" गोविंद हात जोडून म्हणाला - "माफ करा, मालक! घरातली कामे बरीच राहिली होती, मालक! आपण रागवाल की का गेला नाही, म्हणून खोटे बोललो. यापुढे कधी खोटे बोलणार नाही." "बरं, तर जा आत आणि मालकीणबाईंना भेट. त्या तुला वाढतील जेवायला." जमीनदाराने त्याला निरोप दिला.