Bookstruck

खारीचे पट्टे

एका गावी विद्यानाथ नावाचा एक थोर विद्वान एक गुरुकुल चालवीत असे. त्या गुरुकुलाची ख्याती ऐकून दूरदूरच्या प्रांतातून विद्यार्थी विद्याभ्यासासाठी तेथे येत असत. विद्यानाथाचा मुलगा बृहस्पती बापासारखाच थोर विद्वान निघाला. नावाला साजेल असेच त्याने पांडित्य संपादन केले. आपल्या मागे आपल्या मुलालाच गुरुकुलाचा भार सोपविण्याचे ठरवून विद्यानाथ मुलाला म्हणाले— "बाळा बृहस्पती, तुझा विद्याभ्यास संपला. आता तू लोकव्यवहार व लोकज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. जगाची रीत, लोकव्यवहार इत्यादी गोष्टींचे ज्ञान व अनुभव झाल्याशिवाय केवळ पुस्तकी विद्या कामाची नाही. त्याशिवाय तू आपल्या विद्यार्थ्यांना देखील शिकविण्यात पूर्ण यशस्वी होऊ शकणार नाहीस. म्हणून तू काही दिवस देशाटनाला जाऊन ये." पित्याची आज्ञा मानून बृहस्पती देशाटनाला निघाला. गावोगाव पायी फिरत लोक आपले जीवित कसे घालवितात हे प्रत्यक्ष पहात, पुस्तकांत त्याने कधी न वाचलेल्या गोष्टींची माहिती करून घेतली. एका गावात पिळदार शरीरयष्टी असलेले तरुण पहिलवान एका अशक्त दुबळ्या माणसाची पादपूजा करून "महाबली की जय!" म्हणून त्याचा सत्कार करीत होते. त्याला त्या मागचे गूढ कळले नाही, म्हणून त्याने चौकशी करून पाहिली तेव्हा त्याला कळलेली ती गोष्ट अशी: फार पूर्वी त्या गावात कोणी महाबली नावाचा माणूस राहत असे. त्याने, त्या गावावर आलेल्या अनेक संकटांतून गावकऱ्यांना वाचविले होते. रानटी श्वापदे गावात फार शिरत. महाबली एकट्याने त्यांना ठार करी. असाच एकदा दुर्मुख नावाचा एक राक्षस त्या गावातच नव्हे तर पंचक्रोशीतील लोकांना त्रास देऊ लागला. महाबलीने महाकालीची पूजा केली आणि दुर्मुखाशी घोर युद्ध करून त्याला ठार केले. म्हणून महाबली त्या गावच्या गावकऱ्यांच्या व जवळपासच्या इतर गावांतील लोकांच्या आदरास पात्र ठरला. सर्व त्याला एक आदर्श वीर देवपुरुष मानून त्याची पादपूजा करू लागले. त्याने दुर्मुखाचा ज्या दिवशी वध केला त्या दिवसाला एक पर्वदिन म्हणून गावकरी साजरा करू लागले. त्या दिवशी गावकरी महाबलीची पादपूजा करीत. महाबलीने इहलोकाची यात्रा संपवून परलोकी प्रस्थान केले, त्याला अनेक शतके होऊन गेली. परंतु त्या दिवशी महाबलीच्या वंशजांची पादपूजा चालू राहिली. पूर्वजांच्या थोर गुणांवरून त्यांच्या वंशजांची आराधना होत असलेली बृहस्पतीने अनेक ठिकाणी पाहिली. तर याविरुद्ध एक घटना देखील त्याने पाहिली. तो त्या गावच्या एका श्रीमंताच्या घरी उतरला होता. विद्यानाथाचा मुलगा म्हणून देशभर, जिथे जिथे तो गेला, तिथे त्याचा खूप आदरसत्कार होत असे. कारण विद्यानाथाची ख्याती देशभर पसरलेली होती. अर्थातच त्या श्रीमंताने बृहस्पतीचा आतिथ्यसत्कार फार चांगला केला. म्हणाला— "पंडितवर्य! आज आमच्या गावात एका दरबारी कवीची निवड व्हायची आहे. आपल्यासारख्या विद्वानांसमोर ही निवड होणार आहे, हे आमचे केवढे मोठे भाग्य! तरी आपण त्यावेळी उपस्थित राहण्याची कृपा करावी." दरबारी कवीच्या पदासाठी सहा उमेदवार होते. त्यांपैकी फक्त दोघेच आशुकविता करणारे होते. त्यातल्या एकाने स्वतः रचलेली तीन काव्ये बरोबर आणली होती. त्या कवींकडे पाहून श्रीमंत म्हणाले— "तू अंबर आहेस, होय ना?" त्याने होकारार्थी मान हलविली. "अंबर असशील तर तू निदान पाच महाकाव्ये रचली पाहिजे होतीस, दरबारी कवीचे पद मिळवायला!" असे सांगून श्रीमंताने दुसऱ्याला दरबारी कवी म्हणून नेमणूक केली. बृहस्पती दरबारी कवीची ही विचित्र निवड पाहून चकित झाला व त्याने विचारले— "काय हो! त्याचे नाव अंबर आहे का? त्याच्यात कोणती उणीव होती?" तेव्हा त्याला कळले की अंबर हे माणसाचे नाव नव्हते, जातीचे नाव होते. आपण आकाशातून सरळ खाली उतरलो असे सांगून त्या जातीच्या लोकांनी ते नाव स्वतःच्या जातीला लावून घेतले. विद्याभ्यासाचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, इतरांनी शारीरिक श्रम करावे असे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यांनी राजाची संमती मिळविली आणि आपल्या जातीला इतर सर्वांनी पूज्य मानावे असे सांगितले; काही जातींच्या लोकांना त्यांनी अस्पृश्य म्हणून जाहीर केले; प्रजेची नाना तऱ्हेने पिळवणूक केली. काही काळ लोटल्यावर राज्यात पुष्कळ बदल झाले. प्रजेचेच राज्य सुरू झाले. तेव्हापासून अंबर जातीवर अनेक बंधने आली. आतांच्या अंबरांमध्ये तो अहंकार मुळीच राहिला नाही. परंतु त्यांना पूर्वजांनी केलेल्या चुकांचे फळ भोगावे लागत आहे. बृहस्पतीने एक वर्षभर देशाटन केले असेल. तो घरी परत आला तोपर्यंत त्याला लोकज्ञान पुष्कळच झालेले होते. तोच त्याच्या वडिलांनी चालू केलेल्या गुरुकुलाचा कुलपती झाला. एकदा तो आपल्या शिष्यांना खारीच्या भक्तीची कथा सांगत असताना खारीने सेतुबंधनाच्या वेळी जे अल्पस्वल्प सहाय्य केले त्याची वाखाणणी करून रामाने तिच्या अंगावर प्रेमाने हात फिरविला तेव्हा रामाच्या बोटांच्या खुणा तिच्या पाठीवर उमटल्या. त्या आजपर्यंत तिच्या वंशजांच्या अंगावर कायम असल्याचे सांगितले. तेव्हा त्याच्या शिष्याने एक शंका काढली. म्हणाला— "गुरुवर्य! प्राण्यांच्या देहाची रचना व रंगरूप वगैरे ज्या गोष्टी जन्मजात असतात त्याच वंशपरंपरागत चालू राहतात. परंतु कृत्रिम गोष्टी कशा परंपरागत होऊ शकतील? आमच्या वडिलांना लहानपणी खांद्याला मोठी जखम झाली आणि तिचा व्रण खांद्यावर आजपर्यंत आहे. परंतु तो आम्हा भावंडांपैकी एकालाही आला नाही!" बृहस्पती ते ऐकून म्हणाला— "मी सांगितले त्यातला मतितार्थ तो नाही. खारीच्या पाठीवरच्या खुणा वर स्पष्ट दिसतात, परंतु मानवांच्या जातींत न दिसणाऱ्या खुणा कायम होऊन जातात." असे सांगून त्याने प्रत्यक्ष पाहिलेली महाबलीची पादपूजा आणि अंबराची गोष्ट सांगितली.