खरे शिक्षण
फार प्राचीन काळची गोष्ट आहे. ज्ञानप्रिय नावाचा एक तरुण बालपणीच काशीला गेला व गुरूची सेवा करून व सर्व विद्या शिकून पारंगत झाला. म्हणून सर्व त्याच्या विद्वत्तेची आणि शास्त्रज्ञानाची स्तुती करू लागले.
परंतु ज्ञानप्रियला मात्र काहीतरी उणीव असल्यासारखे भासे. तो विचार करू लागला— "मी सर्व विद्या शिकून त्यात प्राविण्य संपादन केले. परंतु यांपैकी एकही विद्या उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडणे शक्य नाही. माझ्या शिक्षणात कोणतीतरी उणीव नक्कीच आहे. ती उणीव कोणती हे कळल्याशिवाय लग्न करून काय उपयोग?"
तो अनेक विद्वान लोकांना भेटला व त्याने संपादन केलेल्या सर्व विद्यांचे वर्णन करून त्याने त्यांना विचारले— "आता मला हे सांगा की शिक्षण पुरे व्हायला मी आणखी काय शिकले पाहिजे?" सर्वांनी एकच उत्तर दिले— "अरे वेड्या, तुझं सर्व शिक्षण संपले आहे!"
परंतु एक वृद्ध गृहस्थ म्हणाले— "मुला, तुझ्या शिक्षणात एका गोष्टीची उणीव राहिली आहे. ते शिक्षण तुला देऊ शकणारी एकच एक व्यक्ती आहे, गावचा लोहार, तो गावाच्या टोकाला राहतो. तू त्याच्या हाताखाली काही दिवस राहिलास तर तुझे शिक्षण पुरे होईल."
ज्ञानप्रियला तो वृद्ध म्हणाला त्यात तथ्य असल्यासारखे वाटले. आता आपले शिक्षण पूर्ण होणार याचाही त्याला परमानंद झाला. तो त्या लोहाराच्या शोधार्थ निघाला. त्याला लोहाराचे घर सापडले. त्याने नमस्कार करून लोहाराला विनंती केली— "काका! मी सर्व विद्या शिकून आलो आहे; तरी काहीतरी शिकायचे राहून गेल्यासारखं वाटतं आहे. म्हणून मला जगात सुखी व्हायला उपयोगी पडेल असे काहीतरी शिकवा!"
लोहाराने ज्ञानप्रियला भात्याजवळ बसून भाता चालविण्याचं काम सांगितले. ज्ञानप्रिय त्या काळोख्या जागी विस्तव शेजारी बसून भाता चालवू लागला.
एक दिवस गेला, एक आठवडा लोटला, एक महिना लोटला व एक वर्षही लोटले. ज्ञानप्रिय भाता चालवीत राहिला. परंतु लोहाराने त्याला दुसरं काही काम सांगितलं नाही. तरी ज्ञानप्रिय काहीच बोलला नाही. त्याने विचार केला की मी ज्या कामासाठी आलो आहे त्याची लोहार काकांना चांगली कल्पना आहे. तेव्हा पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची आठवण करून देणे शहाणपणाचे नाही.
परंतु एक वर्ष लोटले तरी लोहाराने दुसरे कोणतेही काम शिकविण्याची गोष्ट काढली नाही. म्हणून खिन्न मनाने त्याने विचारले— "गुरुवर्य! माझ्या शिक्षणाची..."
"तू भाता चालवीत रहा!" लोहाराने एवढेच उत्तर दिले. त्यानंतर ज्ञानप्रियने लोहाराला पुन्हा त्या गोष्टीची आठवण कधी करून दिली नाही.
अशा तऱ्हेने पाच वर्षे लोटली.
एके दिवशी ज्ञानप्रिय भट्टीजवळ बसून भाता चालवू लागणार, तितक्यात लोहाराने येऊन प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवला. ज्ञानप्रियने नम्रपणे नमस्कार करून विचारले— "गुरुवर्य! काय आज्ञा आहे?"
"बेटा, तुझं शिक्षण आता पुरे झालं आहे! आता तू घरी जा, लग्न करून घे आणि गृहस्थाश्रमात पाऊल टाक. तू सर्व विद्यांत श्रेष्ठ विद्या सहनशीलता शिकून घेतली आहेस." लोहार म्हणाला.
ज्ञानप्रियने आनंदाने गुरूचे पाय धरले व त्याचा निरोप घेऊन घरी गेला. लग्न करून त्याने संसार थाटला. त्याचा संसार सुखाचा झाला व एक थोर ज्ञानी म्हणून गावकरी त्याचा आदर करू लागले.