Bookstruck

खरे मोठेपण

श्रवणानंद नावाचे एक श्रीमंत गृहस्थ होते. त्यांना वाडवडिलांजित मोठी इस्टेट मिळाली होती. तिचा पूर्ण उपभोग करून घेत व वाचनात सर्व काळ घालवीत ते आपल्या खेडे गावातच राहत असत. एके दिवशी त्यांच्या घरी त्यांचे तिघे नातेवाईक आले. त्यांच्यापैकी एक जण व्यापारी होता, तर दुसरा गवई आणि तिसरा एक सरकारी पदाधिकारी. श्रवणानंदांनी तिघांचा उत्तम प्रकारे आतिथ्य सत्कार केला आणि त्यांच्या व्यवसायासंबंधी खोल चौकशी केली. तेव्हा तिघांनी श्रवणानंदांना विचारले— "तुम्हाला लोकव्यवहाराची चांगली माहिती दिसते आहे. तेव्हा आम्हां तिघांत खरोखरी मोठा कोण, हे सांगू शकाल का?" "मला विचाराल तर हा धंदा मोठा किंवा तो हे सांगणेच बरोबर नाही. माझ्या मते जे लोक आयुष्यभर प्रसन्न चित्ताने व समाधानी वृत्तीने राहतात तेच थोर होत. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात तेच तर मुख्य असते." "असं नका सांगू! कित्येकांच्या मनात व्यापार करण्याची इच्छा असते, परंतु प्रत्येकाला व्यापारी होणे शक्य आहे का?" व्यापाऱ्याने विचारले. गवयाने व सरकारी अधिकाऱ्याने आपापल्या कामातील वैशिष्ट्य सविस्तर वर्णन करून श्रवणानंदांना सांगितले. सर्वांचे बोलणे ऐकून घेऊन श्रवणानंद म्हणाले— "तर मग तुमच्यापैकी एकात ही मोठेपणा नाही असेच मला म्हणावे लागेल. मी स्वतः तुमच्यापैकी प्रत्येकाच्या व्यवसायात प्राविण्य दाखवू शकेन." श्रवणानंदांच्या नातेवाईकांना ते एक आव्हानच वाटले. ते म्हणाले की जर श्रवणानंदांनी आपले म्हणणे सिद्ध करून दाखविले तर प्रत्येक व्यक्ती त्यांना एकेक हजार रुपये बक्षीस देईल. श्रवणानंदांनी ते मान्य केले आणि आपल्या नातेवाईंबरोबर राजधानीच्या गावी गेले. ते सर्वात प्रथम व्यापाऱ्याच्या घरी उतरले. त्या व्यापाऱ्याची राजधानीत कित्येक दुकाने होती. त्यात एक भाजीचे दुकानसुद्धा होते. श्रवणानंदांनी त्या दुकानातून एक टोपलीभर चांगल्या जातीची वांगी विकत घेतली आणि बाजूला विकायला जाऊन बसले. त्यांनी वांग्याचा भाव जरा जास्तच चढवून सांगितला. काही लोकांनी त्यांना विचारले— "तुम्ही इतर दुकानदारांपेक्षा जास्त भाव सांगता आहात." श्रवणानंद त्यांना उत्तर देत— "जसा माल तसा भाव! इतर दुकानदारांसारखाच माल असता तर मी किंमत जास्त कां सांगितली असती? हा माल सर्वांच्या लायक नाही. धनगुप्त सावकार नेहमी माझ्याकडूनच वांगी घेतात." स्वतःला सुखवस्तू मानणारे लोकच श्रवणानंदांनी सांगितले त्या भावाने वांगी विकत घेणे आपल्या इभ्रतीलायक मानीत. म्हणून श्रवणानंदांकडे सर्व माल विकला गेला. त्यांना खूप फायदा झाला. दुसऱ्या दिवशी श्रवणानंद सामान्य लोकांच्या बाजारपेठेत गेले. तिथे त्यांनी नफ्याचे प्रमाण कमी ठेवून दुसऱ्या दुकानदारापेक्षा स्वस्थ भावाने मालाची विक्री केली. विक्री खूप झाली म्हणून नफासुद्धा फार झाला. "तुमचे व्यापारी कौशल्य खरोखरच एक हजार रुपयांचे आहे!" या शब्दात श्रवणानंदांची वाखाणणी करून त्या नातेवाईक व्यापाऱ्याने श्रवणानंदांना एक हजार रुपये दिले. त्यानंतर श्रवणानंदांनी गवयाच्या घरीच आपला मुक्काम हलविला. तेथे दररोज गवयाजवळच संगीत शिकू लागले आणि कोठे तरी जाऊन येऊ लागले. एके दिवशी ते बरोबर एक हरण घेऊन आले. ते गवयाला म्हणाले— "हे पहा हो, आपल्या दोघांमध्ये गायनाची चढाओढ होईल तेव्हा श्रेष्ठ गाणारा कोण हे हे हरण सांगेल." दोघांमध्ये संगीताची चढाओढ होणार ही गोष्ट आसपासच्या लोकांना कळली. चहूकडून पुष्कळ लोक ती चढाओढ पाहायला जमले. सर्वात आधी गवयाने गाणे म्हटले. सर्वांनी त्याच्या गाण्याची वाखाणणी केली. त्यानंतर श्रवणानंदांनी एक विरहगीत म्हणायला सुरुवात केली. ते गीत एका तरुणाने आपल्या प्रेमिका राणीच्या विरह दुःखाने म्हटलेले होते. ते गीत फार चांगले किंवा वाईट होते असे नाही. परंतु श्रवणानंदांनी गाणे म्हणायला सुरुवात करतांच ते हरण जवळ येऊन उभे राहिले व ते गाणे संपे पर्यंत तेथेच उभे राहिले. गाणे थांबल्यावर ते तेथून निघून गेले. श्रोता व तो गवई सर्वच चकित झाले. सर्वांनी श्रवणानंदांची प्रशंसा केली. गायन ऐकून एक जनावर सुद्धा भुलून जावे म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? गवयाने श्रवणानंदांना एक हजार रुपये दिले व विचारले— "तुम्ही हरणाला आपल्या गायनाने कसे हो आकृष्ट केलेत?" "त्यात विशेष असे काहीच नाही. मी गाणं म्हटलं ते हरणालासुद्धा समजेल असे म्हटलं. मीच त्याला तसं शिकवून तयार केले होते. मी त्याचे नाव राणी म्हणून ठेवले आहे. ते आपले नाव ऐकतांच जवळून उभे राहिले." श्रवणानंद म्हणाले. त्यानंतर श्रवणानंद सरकारी अधिकाऱ्याच्या घरी गेले आणि म्हणाले— "मी आपल्याला राजाकडून एक चांगलेसे इनाम देववून दाखवितो." ते ऐकून सरकारी नोकराला थोडासा रागच आला. श्रवणानंदांनी एक रत्न भेट म्हणून मंत्र्याला नेऊन दिले. प्रधानाने प्रसन्न होऊन विचारले— "आपल्याला माझ्याकडून कोणत्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे?" "राजा के दर्शनाला जायला आपण थोडा वेळ देविवण्याची कृपा करावी." श्रवणानंद म्हणाले. प्रधानाने श्रवणानंदांना दुसऱ्या दिवशी दरबारात यायला सांगितले. श्रवणानंद मंत्र्याचा निरोप घेऊन एका कवीकडे गेले. त्याला एक सोन्याचे नाणे देऊन राजाची स्तुती करून एक कविता लिहून द्यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी दरबारात श्रवणानंदांनी तीच कविता म्हणून दाखविली. राजाने प्रसन्न होऊन विचारले— "ही कविता कोणी लिहिली?" श्रवणानंद म्हणाले— "महाराज, ही कविता लिहिणारा कवी कोण, हे मला माहीत नाही. परंतु एवढे खरे की माझे एक नातेवाईक ही कविता म्हणून नंतरच सर्व कामे दररोज सुरू करतात. ही कविता ऐकूनच आपले दर्शन घेण्याची इच्छा माझ्या मनात उद्भवली. आता माझी इच्छा पूर्ण झाली." राजाला कळले की श्रवणानंदांचा तो नातेवाईक त्यांच्याच दरबारात काम करतो तेव्हा राजाने त्या सरकारी नोकराचा पगार वाढविण्याची आज्ञा केली. त्यानंतर तिघे नातेवाईक श्रवणानंदांना म्हणाले— "तुमच्या अंगी इतके सर्व गुण असतां तुम्ही एखाद्या खेडेगावात कां पडून राहतां? राजधानीत येऊन रहा. तुमच्या गुणांची पारख राजधानीतच होईल." श्रवणानंद हसून म्हणाले— "मला हे जे यश मिळाले ते क्षणिक आहे. तुमच्यासारखं आपल्या धंद्यात किंवा व्यवसायात मग्न राहून यश मिळविणे सोपे नाही. मी तुमच्याहून मोठा होणे शक्य नाही. परंतु ज्ञानप्राप्तीच्या शोधात राहून आपले आयुष्य सुखाने घालविण्याची इच्छा माझ्या मनात आहे आणि ते इतरत्र कोठेही नाही, आपल्याच गावात." श्रवणानंदांची नम्रता पाहून सर्व चकित झाले.