All Marathi Stories

कीर्तिचंद्रिकेचा निर्णय

राजा विक्रम दृढनिश्चयी होता. तो पुन्हा झाडाकडे गेला. फांदीवर लटकणारे प्रेत उतरवून त्याने आपल्या खांद्यावर टाकले आणि नेहमीप्रमाणे गुपचुप स्मशानाच्या दिशेने निघाला. तेव्हा प्रेतात वास करणारा वेताळ म्हणाला- "राजा! तुझा दृढनिश्चय आणि कष्टाळू वृत्ती पाहून मला तुझं मोठं कौतुक वाटतंय! आपलं कार्य साधूनही तुला आपल्या अविवेकामुळे किंवा निरर्थक आग्रहीपणामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही अशी मला भीती वाटते. उदाहरण म्हणून कीर्तिचंद्रिका नावाच्या एका राजकुमारीची गोष्ट मी तुला सांगतो. ती ऐकताना तुझा श्रम-परिहारही होईल." नंतर वेताळ गोष्ट सांगू लागला- स्वर्णदीप्ति राज्यावर राजा विश्वक्रान्त राज्य करीत असे. तो मोठा जनप्रिय राजा होता. लोक त्याला 'अजातशत्रू' म्हणत. आसपासच्या राज्यांचे राजेही त्याचा आदर्श पुढे ठेवून आपापला राजकारभार सांभळण्याचा प्रयत्न करीत. विश्वक्रान्तला चंद्रदीप्त नावाचा एकुलता एक पुत्र होता. तारुण्यात पदार्पण करेपर्यंत एक सद्गुणसंपन्न व पराक्रमी राजकुमार म्हणून तो आसपास तो चांगला प्रसिद्ध झाला होता. ज्या ज्या राजांना उपवर कन्या होत्या; ते ते राजे चंद्रदीप्त आपला जावई व्हावा अशी स्वप्ने पाहू लागले होते. त्यांच्यापैकीच एक होता राजा सूर्यकेतु. त्याच्या राज्याचे नाव सौगन्धी. सूर्यकेतु हा विश्वक्रान्तचा चांगला मित्रही होता. आपली कन्या कीर्तिचंद्रिका चंद्रदीप्तला द्यावी असे सूर्यकेतुच्या मनात आले. अशातच कीर्तिचंद्रिकेच्या खास मैत्रिणीकडून त्याला अशी खबर मिळाली की आपल्या मुलीचे मन चंद्रदीप्तकडे आकृष्ट झाले आहे आणि तिने विवाह करायचा तर चंद्रदीप्तशीच असा निश्चय केला आहे. हे कळल्यावर तर सूर्यकेतु स्वतःच आपला मित्र विश्वक्रान्त याला जाऊन भेटला. तो म्हणाला- "प्रिय मित्रा, मी तुझ्या चंद्रदीप्तला चांगला ओळखतो. तूही माझी कन्या कीर्तिचंद्रिका हिला पाहिलेलेच आहेस. माझी अशी इच्छा आहे की तिचा आपली सून म्हणून तू स्वीकार करावास आणि आपली मैत्री नात्याने आणखीन दृढ करावीस." मित्राचे हे बोलणे ऐकून विश्वक्रान्तला खूपच आनंद झाला! त्याने ताबडतोब आपला पुत्र चंद्रदीप्त याला बोलावून घेऊन त्याच्यापुढे हा प्रस्ताव मांडला. पित्याची इच्छा ऐकल्यावर चंद्रदीप्त म्हणाला- "मला क्षमा करा बाबा, पण सागरिकाची युवराज्ञी मनोज्मालेवर प्रेम आहे माझं! तिच्याशीच विवाह करायचा निश्चय केला आहे मी!" विश्वक्रान्त थोडा वेळ विचारात पडला अन् म्हणाला- "ठीक आहे! विवाहाचा प्रश्न हा तुझ्या व्यक्तिगत जीवनाचा प्रश्न आहे. आम्ही दोघे मित्र आहोत, व्याही बनायची इच्छा आहे आमची! पण हरकत नाही, देवाची इच्छा असेल तसंच होईल! जाऊ शकतोस बेटा तू!" पण मधेच त्याला तोकत सूर्यकेतु म्हणाला- "राजकुमार, माझ्या मुलीने, वाचेने तुलाच वरले आहे. तिला नाकारू नकोस." चंद्रदीप्तने मोठ्या नम्रतेने आणि मृदु स्वरात त्याची विनंती नाकारली. यावर सूर्यकेतु विश्वक्रान्तला म्हणाला- "अरे, हा चंद्रदीप्त अजून लहान आहे, अननुभवी आहे. त्याला नीट समजावून सांगायचा प्रयत्न कर ना मित्रा!" विश्वक्रान्त यावर म्हणाला- "विवाहाच्या बाबतीत जुलूम जबरदस्ती बरी नसते!" "हरकत नाही, मनोज्मालेबरोबर माझ्याही मुलीशी विवाह करायला का सांगत नाहीस तू त्याला?" सूर्यकेतु उतावळेपणाने बोलला. वडील काही उत्तर देणार, यापूर्वीच चंद्रदीप्त त्याला म्हणाला- "क्षमा असावी काका, पण आमच्या वंशात एकपत्नीव्रत पाळलं जातं!" हे ऐकून सूर्यकेतु रागाने लाल होत ओरडला- "तू जर या लग्नाला तयार झाला नाहीस तर परिणाम फार वाईट होईल हं! नकार महाग पडेल फार!" असे बोलून आपल्या रथात बसून सूर्यकेतु आपल्या राज्यात निघून गेला. यानंतर एका आठवड्यातच सूर्यकेतुने विश्वक्रान्तच्या राज्यावर हल्ला करण्याची घोषणा केली. नाइलाजाने विश्वक्रान्तही युद्धाच्या तयारीला लागला. युद्धाला निघालेल्या आपल्या पित्याला चंद्रदीप्त म्हणाला- "बाबा! या युद्धाचं मूळ मीच आहे. तेव्हा मीच सूर्यकेतुला तोंड देईन." इकडे कीर्तिचंद्रिकेलाही आपल्या पित्याची विश्वक्रान्त विरुद्धची युद्धाची घोषणा बिलकुल आवडली नाही. खूप विचार केल्यावर तिला एक मार्ग सुचला. ती स्वतःही युद्धकलेत चांगलीच प्रवीण होती. तेव्हा आपल्या राज्याच्या वतीने स्वतःच जाऊन चंद्रदीप्तशी युद्ध करावे असा तिचा विचार ठरला. युद्धात ती स्वतः हारली तर चंद्रदीप्तने मनोज्मालेशी खुशाल विवाह करावा, अन् उलट चंद्रदीप्त हारला तर त्याला आपल्याशी लग्न करणे भाग पाडावे-पण, हा विचार केवळ विचार म्हणून चांगला आहे, प्रत्यक्षात चंद्रदीप्तला हारवणे आपल्याला शक्य होईलच कशावरून? कीर्तिचंद्रिकेच्या मनात जेव्हा ही शंका उत्पन्न झाली, तेव्हा आपल्या राजगुरुने तिला अचानक स्मरण झाले. सूर्यकेतुच्या राज्याच्या जवळच दशकारण्यात नीलांबर नावाचा एक मुनी राहत असे. तो महान तपोबलसंपन्न होता. एखादी गोष्ट न्याय्य वाटली तर लगेच तो वरदान देत असे. कीर्तिचंद्रिका ताबडतोब घोड्यावर स्वार होऊन त्याला भरधाव पळवत नीलांबर मुनीकडे गेली. आपली अडचण तिने त्याच्या समोर प्रकट केली. थोडा विचार करून मुनी म्हणाला- "बेटी, मी तुला खड्गसिद्धि नावाचा एक मन्त्र देतो. त्या मन्त्राच्या प्रभावाने तुला एका क्षणभराकरता आपली तलवार विद्युत् वेगाने चालवता येईल. कितीही महान योद्धा असला तरी त्यावेळची तो तुझ्याशी लढू शकणार नाही! तुझ्यासमोर त्यावेळची कोणी टिकूच शकणार नाही." मुनीने कीर्तिचंद्रिकेला मन्त्रोपदेश दिला. मोठ्या आनंदाने मुनीसमोर कृतज्ञता प्रकट करून ती राजधानीत परतली. तिच्याकडून सर्व वार्ता जाणून सूर्यकेतु आनंदला. तो म्हणाला- "तू पुरुषवेषात जाऊन चंद्रदीप्तशी युद्ध कर. तो हारला की त्याला राज्य परत करण्याचे प्रलोभन दाखवून विवाहासठी तयार करता येईल." यानंतर सूर्यकेतुने एका दूताकरवी विश्वक्रान्तला कळवले की- "युद्धाच्या निमित्ताने दोन्ही देशांच्या सैनिकांचे प्राण घालवणं बरं नह्वे, असं मला वाटतं. तेव्हा माझ्या राज्यातल्या एका वीराशी तुझ्या पुत्राने खड्गयुद्ध करावे, अन् त्यात जर तुझा चंद्रदीप्त हारला तर तुझं राज्य आमच्या हाती यावे, अन् या उलट, जर आमचा वीर हारला तर आमचं राज्य तुझं होईल." हा प्रस्ताव विश्वक्रान्तने मान्य केला. युद्धभूमीवर पुरुष वेषातल्या कीर्तिचंद्रिकेचे आणि चंद्रदीप्तचे युद्ध सुरु झाले. थोडा वेळ झाल्यावर चंद्रदीप्तचे वार चुकवणे कीर्तिचंद्रिकेला कठीण जाऊ लागले. आता तिने मुनीकडून प्राप्त झालेला खड्गसिद्धि मन्त्र जपला. ताबडतोब तिच्या हातातील तलवार विजेसारखी चपलगतीने चालूली. क्षणभर काय चालले हेच चंद्रदीप्तला कळेना! वास, दुसऱ्या क्षणी त्याच्या हातातील तलवार निखळून दूर जाऊन पडली! चंद्रदीप्त कैद करून घेऊन सूर्यकेतु आपल्या राज्यात गेला. दुसऱ्या दिवशी तो चंद्रदीप्तला म्हणाला- "अजूनही आपला निर्णय बदलायला तुला अवधी आहे. वेष बदलून येऊन माझ्या मुलीने युद्धात तुला हरवलं आहे. माझा जावई होण्याचे कबूल करत असल्यास तर माझ्या मुलीसह माझं राज्यही तुझं होईल. माझी अजूनही तयारी आहे." परंतु आतापर्यंत जे काही घडले त्याबद्दल नीट खोलवर विचार करून कीर्तिचंद्रिका आपल्या पित्याला म्हणाली- "बाबा, पण मीच आपला निर्णय आता बदलला आहे. स्वतः समोर राहून चंद्रदीप्त व मनोज्मालेचा विवाह करून द्यायची माझी इच्छा आहे." सूर्यकेतुने यावर स्वीकारात्मक आपली मान हलवली. मन्त्राच्या हातून त्याने विश्वक्रान्तकडे असे पत्र पाठवले की, "माझ्या मुलीने तुझ्या मुलाला मन्त्राच्या साह्याने जिंकलेले आहे, स्वतःच्या शक्तीने नव्हे. तेव्हा तुला आपला पराभव झाला असे मानण्याची गरज नाही. तुझं राज्य तुझंच राहील. तुला उगीच त्रास दिल्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो." यानंतर कीर्तिचंद्रिकेसमक्ष चंद्रदीप्त व मनोज्माला यांचा विवाह झाला. इतकी गोष्ट सांगून वेताळ म्हणाला- "राजा, कीर्तिचंद्रिकेचं चंद्रदीप्तवर खरोखरीच खूप प्रेम होते यात काही शंकाच नाही. चंद्रदीप्तने तिचा अव्हेर केल्यावर मुनीच्या मन्त्रप्रभावाने तिने त्याला युद्धात हरवून त्याचं हृदय जिंकण्याचा प्रयत्न केला. पण युद्धात जय होऊनही ती त्याचे हृदय जिंकू शकली नाही. अशा परिस्थितीत चंद्रदीप्तचा सूड उगवायचा विचार न करता तिने मनोज्मालेचा त्याच्याशी विवाह का कबून दिला? तिचं हे सर्व वागणं अविवेकपणाचं अन् अर्थहीन नाही वाटत? या प्रश्नाचं उत्तर माहित असूनही तू टाळलंस तर तुझं मस्तक भेदून जाईल!" तेव्हा राजा विक्रम उत्तरला- "कीर्तिचंद्रिका मुळातच सात्त्विक स्वभावाची होती. चंद्रदीप्तवरील आपलं प्रेम ती विसरू शकत नव्हती. युद्धामुळे होणारी हानी तिला पसंत नव्हती; त्यामुळेच तर गुरुची मदत घेऊन तिने द्वंद्वयुद्धाचा निर्णय घेतला. पण द्वंद्वयुद्धात हरल्यानंतर चंद्रदीप्त जेव्हा राज्याला मुकायला तयार झाला तेव्हा त्याचे मनोज्मालेवरचे उत्कट प्रेम तिच्या लक्षात आले. अशा परिस्थितीत स्त्रीसुलभ सहनशीलता व त्याग हे आपले गुण प्रकट करून कीर्तिचंद्रिकेने स्वतःच चंद्रदीप्त व मनोज्मालेचा विवाह लावून दिला. यात अविवेक किंवा अर्थहीनता यांचा जराही लवलेश नाही." अशा तऱ्हेने मौनभंग झाल्यामुळे वेताळ राजा विक्रमाच्या खांद्यावरून अदृश्य होऊन पुन्हा त्याच झाडाच्या फांदीवर लटकू लागला. (कल्पित)