Bookstruck

किल्ल्यातली कुत्री

ब्रह्मदत्त काशी येथे राज्य करीत असता बोधिसत्व काशीजवळच्या स्मशानात एका कुत्र्याच्या जातीत जन्म घेऊन व कुत्र्यांचा सरदार म्हणून रहात होते. एके दिवशी राजा आपल्या रथात बसून वनविहार करून सूर्यास्त समयी किल्ल्यात परतला. सारथी घोड्यांना तंबेल्यात घेऊन गेला आणि रथ राजवाड्याच्या आवारात उघड्यावर सोडून गेला. त्या दिवशी रात्री मुसळधार पाऊस झाला. रथ पाण्याने भिजून गेला. राजवाड्यातली कुत्री उतरून खाली आली व रथाला बांधलेल्या वाद्या, घोड्यांचे लगाम वगैरे कातडी सामान त्यांनी कुरतडून खाल्ले. दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर राजाच्या नोकरांनी घडलेले वृत्त राजाला जाऊन कळविले. राजाने संतापून हुकूम सोडला की दिसेल त्या कुत्र्याला धरून ठार करा. राजाज्ञेप्रमाणे राज्यातल्या सर्व कुत्र्यांचा संहार सुरू झाला. काही कुत्री राजाच्या शिपायांच्या हातून निसटून स्मशानात बोधिसत्व रहात तिथे गेली व म्हणाली— "प्रभो, महाराजांच्या रथाचे कातडी सामान काही कुत्र्यांनी कुरतडून खाऊन टाकले म्हणे. म्हणून महाराजांनी आज्ञा काढली आहे की दिसेल त्या कुत्र्याला धरून ठार करा." बोधिसत्व विचारात पडले. किल्ल्यातल्या रथाजवळ बाहेरची कुत्री पोहोचणे सुद्धा शक्य नाही. कारण किल्ल्यात रात्रंदिवस पहारा असतो. याचा अर्थ असा की रथाचे कातडी सामान किल्ल्यातल्या कुत्र्यांनीच खाल्लेले असणार! तर मग खऱ्या अपराधी कुत्र्यांना पकडून आपल्या अनुयायांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. ते कुत्र्यांना म्हणाले— "तुम्ही भिण्याचे मुळीच कारण नाही. मी महाराजांना भेटून परत येईपर्यंत तुम्ही इकडेच रहा." असे कुत्र्यांना सांगून बोधिसत्व "धर्माचा जय असो!" "राजाने न्याय द्यावा!" असे मनात म्हणत राजवाड्यात गेले. त्या वेळी महाराज राजसभेत सिंहासनावर बसून न्यायविचार करीत होते. बोधिसत्वांनी सिंहासनाखालून लपून राजसभेत प्रवेश केला व राजासमोर जाऊन उभे राहिले. राजाचे शिपाई बोधिसत्वांना धरायला धावले. परंतु राजाने त्यांना बाजूला रहायला सांगितले. बोधिसत्वांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले— "महाराज, आपण राज्यातल्या सर्व कुत्र्यांचा वध करण्याची आज्ञा केली आहे म्हणे! त्याचे कारण कळू शकेल का?" "त्यांनी माझ्या रथाचे सर्व कातडी सामान फस्त करून टाकलं आहे. म्हणून तशी आज्ञा काढावी लागली." राजा म्हणाला. "तो गुन्हा कोणत्या कुत्र्यांनी केला, आपल्याला माहीत आहे का?" बोधिसत्वांनी विचारले. राजाने माहीत नसल्याचे सांगण्यासाठी नकारार्थी मान हलविली. तेव्हा बोधिसत्व म्हणाले— "महाराज, गुन्हेगार कुत्री कोण ह्या गोष्टीची चौकशी केल्याशिवाय सर्व राज्यातल्या कुत्र्यांना ठार करणे हे न्याय्य होईल का? तुमचे शिपाई राज्यातल्या सबंध कुत्र्यांना ठार करणार आहेत की ज्यांना जीवंत सोडणार आहेत?" बोधिसत्वांनी विचारले, "राज्यातल्या सर्व कुत्र्यांना ठार करण्याची आज्ञा मी काढली आहे. परंतु किल्ल्यात आम्ही पाळलेल्या कुत्र्यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही." राजा म्हणाला. "आपल्याला गुन्हा करणारे कुत्रे कोण हे माहीत नाही, तरी किल्ल्यातल्या कुत्र्यांना वगळून इतर कुत्र्यांना ठार करण्याची आज्ञा आपण काढलीत. यामुळे आपला पक्षपात, द्वेष, अविवेक आणि भीती ह्याच अवगुणांचा पगडा आपल्यावर असल्याचे प्रगट होत आहे. राजपुरुषात ज्या लक्षणांची आवश्यकता असते त्यात यांपैकी एकही नाही." बोधिसत्वांनी धीटपणे आपली बाजू मांडली. राजा विचार करून म्हणाला— "तर मग तू आपल्या चातुर्याचा उपयोग करून आमच्या रथाचे कातडी सामान कोणी खाल्ले हे सिद्ध करून दाखव!" "तो गुन्हा किल्ल्यात राहणाऱ्या तुमच्या कुत्र्यांचाच आहे. ते मी सिद्ध करून दाखवितो." बोधिसत्व म्हणाले. "तू सिद्ध करून दाखव, मी आपली आज्ञा मागे घेईन." राजाने हमी दिली. बोधिसत्वांनी राजाला थोडे ताक व थोड्या दुर्वा आणवायला विनंती केली. राजाच्या नोकरांनी ताक व दुर्वा आणून दिल्यावर बोधिसत्वांनी दुर्वा चटणीसारख्या चांगल्या वाटून घेतल्या व त्यात ताक कालविले आणि ते किल्ल्यातल्या कुत्र्यांना प्यायला लावले. जेमतेम दोन-तीन मिनिटेच गेली असतील, किल्ल्यातली कुत्री ओकू लागली व त्यांच्या पोटातून जीर्ण न झालेले कातड्याचे तुकडे बाहेर पडू लागले. ते पाहताच राजाला आश्चर्यचित होताना पाहून बोधिसत्व म्हणाले— "महाराज, आपले नोकर कुत्र्यांना पोटभर खायला घालीत नाहीत, म्हणून उपाशी कुत्र्यांनी भुकेने जीव कासावीस झाल्यामुळे रथाचे कातडी सामान खाल्ल्याचे आपण पाहतांच आहां!" राजाला फार आनंद झाला व म्हणाला— "हे कुत्र्याच्या रूपात असलेले बोधिसत्वच असणार. आणखी दुसरे कोण असणार?" सर्व दरबाऱ्यांना सांगून राजाने आपले श्वेत छत्र बोधिसत्वांच्या डोक्यावर धरायला सांगितले व त्यांचा सत्कार केला. बोधिसत्वांनी राजाला धर्मबोध केला आणि स्मशानात त्यांचे अनुयायी रहात होते त्यांच्याकडे निघून गेले. राजाने कुत्र्यांची राखण करणाऱ्या नोकरांना बोलाविले व चौकशी केली तेव्हा कळले की ते कुत्र्यांसाठी राज्याकडून मंजूर केलेल्या रकमेतून स्वतः बरीच रक्कम उचलीत होते व त्यामुळे कुत्र्यांना पोटभर खायला मिळत नव्हते. राजाने त्या नोकरांना कामावरून कमी केले व त्यांच्या जागी कुत्र्यांची राखण करायला नवे नोकर नेमले. त्या दिवसापासून राजाने किल्ल्यातील कुत्र्यांनाच नव्हे तर राजधानीतील सर्व कुत्र्यांना पोटभर खायला घालण्याची व्यवस्था करून दिली. त्यानंतर राजा बोधिसत्वांच्या धर्मबोधाप्रमाणे वागू लागला व प्रजेच्या सुखासाठी त्याने अनेक कामे केली. बोधिसत्वांनी याप्रमाणे इहलोकांत अनेक वर्षे धर्मोपदेश केला आणि अनेकांचा उद्धार केला.