उत्तम गाणारा
सिरपूरच्या राजाच्या मनांत एक दिवस अचानक एक विचार आला की, आपल्या दरबारात कवी व पंडितांबरोबर एक गायक सुद्धा असणे चांगले आहे. त्याने आपला विचार मंत्र्यापुढे मांडला व गाणाऱ्याची निवड करण्याकरिता एक चढाओढ ठेवण्याची आज्ञा केली.
"महाराज, आपला विचार तर फार चांगला आहे. परंतु हे सांगा कीं त्या परिक्षेचा निकाल सांगणारे परिक्षक कोण असणार?" मंत्र्याने विचारले.
"दुसरे कोण कां? मी, राणी व तुम्ही आपण तिथे परिक्षक होवू. आपण तिथे तर संगीताचे प्रेमी आहोत नां! त्याकरिता बाहेरच्या संगीत विद्वानांना बोलावून घेणे निरर्थक आहे." राजा म्हणाला.
तसे पाहिले तर राजाला संगीताची अत्यंत आवड होती परंतु संगीतशास्त्र संबंधी ज्ञान बिलकुल नव्हते. परंतु राणीला संगीत शास्त्राबद्दलची चांगली माहिती होती.
राजाच्या आज्ञेने मंत्र्याने देशभरच्या संगीतातील विद्वानांना व साधारण प्रजेतील लोकांना आमंत्रित केले. संगीत विद्वानांच्या मध्ये संगीताची प्रतिस्पर्धा चालू झाली, ती तीन दिवस चालली. सर्व गायकांनी अशा तऱ्हेने आपले गाणे गाऊन दाखविले की, आपल्याला दरबारात संगीत पदावर निवडले जावे.
संगीत विद्वानांमधील तीन व्यक्तिना प्रत्येकाने आपापल्या परीने निवडले. मुरलीनाथला राजाने, वेणुनाथला राणीने व सुसंगीतला मंत्र्याने निवडले. तिघांनी तीन जणांची निवड केली.
राजाने आपल्या निवडीचे स्पष्टीकरण करीत म्हटले, "मुरलीनाथचे संगीत अद्भूत होते, ते ऐकताच मी स्वतःला विसरून गेलो. तुम्ही ज्या दोघांची निवड केली आहे ती तेवढी काही खास नाही, त्याने तितके उत्तम गाणे गाइले नाही."
त्यावर राणी म्हणाली- "मुरलीनाथच कां! वेणुनाथानें फार छान गाणें गायले. दुसऱ्या दोघांना संगीत ज्ञानाची विशेष माहीती दिसत नाही. संगीत ज्ञान जर प्राप्त नसेल तर खऱ्या अर्थाने तो संगीत विद्वान म्हणवला जात नाही. त्यामुळे मी वेणुनाथची निवड केली."
त्यावर राजाने मंत्र्याला विचारले- "मंत्री महोदय, तुम्ही सुसंगीतची निवड केलीत ह्यापाठीमागे काय कारण?"
"महाराज, सुसंगीतला संगीत शास्त्र संबंधी ज्ञान व तसेच तो उत्तम गाणे सुद्धा गातो. खरा गाणारा तर असाच असावा लागतो की जो पंडित व अज्ञानी दोन्ही लोकांचे मनोरंजन करू शकतो. ह्याचे खरे सामर्थ्य फक्त सुसंगीत मध्येच आहे. हे फक्त माझेच मत नाही, तर सर्व पंडित व अज्ञानी लोकसुद्धा तसेच माझ्या मताशी सहमत आहेत," मंत्र्याने उत्तर दिले.
हे उत्तर ऐकताच राजा व राणी आश्चर्य करू लागले व त्यांनी एकसुरात विचारले- "काय हो, आपल्या विचारांशी संगीतातील विद्वान व साधारण संगीत प्रेमी सुद्धा सहमत आहेत कां? तुम्ही त्यांचा विचार केव्हां घेतलात?"
"ते तिघे संगीत विद्वान जेव्हां दरबारात गात होते, तेव्हां मी दरबारात गाणें ऐकणाऱ्या श्रोत्यांची प्रतिक्रिया कशी झाली त्याकडे नीट लक्ष ठेवले," मंत्री म्हणाला.
"मुरलीनाथचे गाणे ऐकतांना माझे देहभान हरपले त्यामुळे माझे इतर श्रोत्यांकडे लक्ष नव्हते," राजा म्हणाला.
"मी वेणुनाथ गात असतांना त्याला असलेल्या संगीत शास्त्र संबंधी ज्ञानाविषयी मंत्रमुग्ध झाले होते, त्याकारणांमुळे मी राजाकडे व इतर दरबारी श्रोत्यांकडे बिलकुल लक्ष दिले नाही," राणी म्हणाली.
"आपण ज्या गायकांची दरबारी गायक म्हणून निवड करणार आहोत, तो फक्त आपल्या तिघांनाच नाही तर राज्यातील सर्व प्रजेला, संगीत विद्वानांना, अज्ञानांना संतुष्ट करेल असाच हवा. मला वाटते की, राजाला पण असेच वाटत असावे," मंत्री म्हणाला.
"हो हो, माझा सुद्धा तसाच विचार आहे," राजा म्हणाला.
"तर मग, मी ह्या गोष्टींचा उल्लेख करून सांगतो की, हे तिघे गायक गात असतांना इतर दरबारी श्रोत्यांची कशी कशी प्रतिक्रिया झाली. तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐका. मुरलीनाथ गात असतांना दरबारातील सर्व पंडित सभासद एक-एक करीत बाहेर उठून गेले व इतर जनता माना हलवित शेवटपर्यंत तेथेच बसून राहिली. आता राहिली वेणुनाथची गोष्ट, तो गात असताना इतर प्रजेतील लोक ताबडतोब उठून गेले. परंतु गानपंडीत शेवटपर्यंत मोठ्या अभिरुचीने गाणे ऐकत तेथेच बसले. परंतु सुसंगीतचे गाणे चालू झाले तेव्हां इतर विद्वान पंडित व त्याचबरोबर जनता सुद्धा मंत्रमुग्ध होऊन शेवटपर्यंत तेथेच बसून राहीली होती.
ह्याच कारणाकरीता मी तिघां मध्ये सुसंगीतची दरबारी गायक म्हणून निवड केली," मंत्री म्हणाला.
मंत्र्याचा विचार योग्य वाटल्यामुळे राजा व राणीने सल्लामसलत करून त्याला सहमत देऊन त्याची दरबारी गायक म्हणून निवड केली.