उतावळेपणा आणि सावकाशी
गंधार आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक करी. परंतु त्याचा शेजारी रमानाथ याच्या कामात मात्र काही ना काही चूक होईच; त्यामुळे तो बिचारा नेहमी निराश असे.
एकदा एक साधू त्या गावात आला. लोकांना काही चमत्कार दाखवून त्याने बऱ्यापैकी नाव मिळवले. कित्येक गावकऱ्यांनी साधूला काही उपहार देऊन त्याच्याकडून आपल्या अडचणी सोडवून घेतल्या.
गंधार म्हणाला, "हा साधू आपल्या गावकऱ्यांला फसवत आहे. हा जर खराखुरा साधू असेल, तर त्याला या उपहारांची काय गरज?"
यावर त्याचे मित्र विचारू लागले, "साधू फसवतो आहे, असं तू सिद्ध करून दाखवू शकशील?"
गंधार उत्तरला, "हो! दाखवीन की!"
पण त्याच दिवशी रात्री रमानाथ साधूकडे गेला. गावाच्या शेवटच्या कोपऱ्याशी असलेल्या एका टेकडीच्या गुहेत साधू राहत असे. रमानाथ तिथे पोहोचला, तेव्हा साधू झोपलेला होता. त्याच्या असे लक्षात आले की, या साधूची दाढी तर नकली आहे! त्याने ती दाढी ओढली, तर ती पटकन् त्याच्या हातात आली. साधू यामुळे जागा होता होता रमानाथ पळून गेला.
दुसऱ्या दिवशी साधू गावकऱ्यांशी काही बोलत असताना रमानाथ तिथे जाऊन ओरडू लागला, "अरे, या साधूवर कोणी विश्वास नका ठेवू. याची दाढी नकली आहे, काल रात्री मी ती उपटून आणली."
"नीट बघ निरखून साधुमहाराजांकडे. यांची दाढी अन् मिशासुद्धा शाबूत आहेत!" गावकरी रमानाथला म्हणाले. रमानाथने साधूकडे नीट पाहिले, तर खरोखरच त्याच्या दाढीmisha जागच्या जागी होत्या!
तो साधू म्हणाला, "काल रात्री मी ओळखलं की तुझ्या दाढीmisha नकली आहेत. तू झोपेत असतानाच मी एकदम तुझी दाढी ओढली. मी नीट ठेवलीय ती! तू पुन्हा नवी खोटी दाढी लावून आलायस." अन् त्याने आपला हात पुढे केला.
पण साधूने त्याला पटकन मागे ढकलून म्हटले, "अरे जारे! अज्ञानी आहेस तू; म्हणून तुझी ही चूक मी माफ करीन. पण परमेश्वर तुला मुळीच क्षमा करणार नाही. तुझ्या हातून काही चूक घडू नये, म्हणून मागं ढकललं. काही वाईट विचारानं प्रेरित होऊन कोणी माझ्या दाढीला हात घातला, तर परमेश्वर त्याला शाप देईल; सर्वनाश होईल त्याचा! तू ज्या दाढीबद्दल बोलतो आहेस, ती दाखव बरं काढून तुझ्या पिशवीतून!"
रमानाथने पिशवीत हात घातला, तर काहीच हाती लागले नाही त्याच्या! तो एकदम ओरडला, "धोका! दगा! या ढोंग्यानं जादूटोणा करून नाहीशी केली ती!"
त्याच्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास बसेना. रमानाथ बिचारा मान खाली घालून तेथून निघून गेला. वाटेत त्याला गंधार भेटला. रमानाथचा उदास चेहरा पाहून त्याने विचारले, "अरे झालं तरी काय? उदास का तू असा?" रमानाथने घडलेली सारी हकीकत त्याला सविस्तर सांगितली.
"हं! साधू धोकेबाज आहे, यात तर काही शंकाच नाही! तो जादूगार असल्यामुळे वाचला. पण आता माझ्या तावडीतून सुटणं अशक्य होईल त्याला!" गंधार बोलला.
रमानाथने कुतूहलाने विचारले, "तू काय करणार आहेस आता?"
"मला त्याच्याबद्दल बरंच काही समजलेलं आहे. त्याचं खरं नाव आहे पद्माकर अन् तो इन्द्रपूरचा आहे. तो कधी साधू बनतो, तर कधी आणखी काही. त्याला आत्ता इन्द्रपूरला नेलं, तर सगळं खरं उघडकीस येईल. तिथं त्याची बायको अन् तीन मुलं आहेत. लोकांना फसवून कमाई करतो हा; अन् त्यातून त्याच्या कुटुंबाचा तिथं आरामात उदरनिर्वाह चालतो."
रमानाथने मोठ्या आश्चर्याने विचारले, "तुला कसं कळलं हे सगळं?"
गंधार उत्तरला, "कोणत्याही कामात उतावळेपणा करू नये बघ! शांतपणे नीट विचार करून सावकाशीनं नीट सगळं समजून घ्यावं; म्हणजे मग एखादी अडचण सोडवायला त्रास होत नाही."
उत्साहाने रमानाथ म्हणाला, "तर मग चल असाच! आत्ताच भोपळा फोडू त्याचा?"
पण गंधार थंडपणे म्हणाला, "रमानाय, उतावळेपणाने असं काही करणं बरं नव्हे. गावकरी त्याला खूप पिटून काढतील अन् तो आपला कट्टर शत्रू बनेल. आपला सूड उगवायचा प्रयत्न करील पुढे तो. त्याचं काय? तो आपलं गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी जाईल अन् तिथंही हाच धंदा करील. कुणालाच त्यानं फसवू नये अन् त्याबरोबर त्याला सुधारून चांगला माणूस बनवायचा आपल्याला प्रयत्न करायला हवा. त्याचं स्वभावपरिवर्तन घडवायला हवं! तेव्हाच आपलं ध्येय साध्य होईल."
दुसऱ्या दिवशी गंधारने साधूची एकान्तात भेट घेतली अन् त्याच्याबद्दल स्वतःला कळलेली सारी हकीकत सांगितली. साधू आता मात्र चांगलाच घाबरला! गंधार म्हणाला, "हे पहा, भिऊ नकोस असा! मी तुझ्या बाबतीत कुणालाच काही सांगणार नाही. तू या गावकऱ्यांकडून ज्या भेटी वसूल केल्या आहेत, त्या सगळ्या त्यांना परत करून म्हण की, मी फक्त तुमची परीक्षा घेतली, मला काय करायचंय या सगळ्यांचं?' अन् मग इन्द्रपूरला परत जा. यापुढे सन्मार्गानं चालून आपलं जीवन सुखानं जग."
साधूने गंधारचे म्हणणे मान्य केले. गावकऱ्यांच्या भेटी त्याने परत केल्या. त्यांनी साधूला मोठ्या आदराने निरोप दिला अन् तो आपल्या गावी परत गेला.
हे सर्व पाहून रमानाथला फार वाईट वाटले. त्याने तर खरे तेच सांगितले होते, पण उसका काय उपयोग झाला? त्याचे बोलणे कोणी ऐकून न घेता उलट त्याची चेष्टाच केली. गंधारने खरी गोष्ट लपवून गावाचे हित साधले; साधूचे स्वभावपरिवर्तन घडवण्यात तो सफल झाला. त्याच्या या कर्तृत्वामागे होती त्याची समजून-उमजून काम करण्याची शैली. आता रमानाथनेही हीच पद्धत अवलंबायचे ठरवले. ती योग्य असल्याचे शाबीत करायची संधीही लवकरच त्याच्याकडे चालून आली.
रमानाथची आई गौरी ही दररोज नदीवर जाऊन घडाभर प्यायचे पाणी आणत असे. त्या दिवशी पाणी आणताना तिचा पाय घसरला अन् सारे पाणी सांडून गेले. शेजारच्या गंगारामला सांगून त्याच्याकडून घडाभर पाणी आणायचं काम तिने रमानाथला सांगितले. रमानाथ त्यासाठी गंगारामकडे जायला निघाला; इतक्यात समोरून रिकामे घडे घेऊन येत असलेला गंगाराम त्याला दिसला. तो खूप खुशीत दिसत होता. रमानाथ त्याच्याशी काही बोलण्यापूर्वीच तो तेथून पुढे निघून गेला.
रमानाथ त्याच्या मागेमागे जाऊ लागला. थोडे पुढे गेल्यावर गंगाराम एका झोपडीत घुसला. रमानाथला आत जायचे होते, पण तोवर दरवाजा बन्द झालेला होता. मग तो फटीतून आत पाहू लागला.
काय आश्चर्य! जे घडे रमानाथला रिकामे वाटले होते, ते रिकामे नव्हते! ते अर्धे अर्धे तेलाने भरलेले होते. गंगारामने एका डब्यातला कसलासा द्रव पदार्थ ओतून ते घडे पूर्ण भरले. अन् पुन्हा ते उचलून तो बाहेर आला. रमानाथ पुन्हा लपून छपून त्याच्या मागे चालू लागला. त्याला असे दिसले की तो पूर्णचन्द्र सावकाराच्या घरात घुसत आहे. आता रमानाथला कळून चुकले की सावकार गंगाराम करवी तेलात भेसळ करायचे काम करतो आहे.
रमानाथ लगेच गंधारला भेटायला गेला अन् पाहिलेले सर्व त्याने गंधारला सांगितले. तो पुढे म्हणाला, "आत्ता मी सावध राहीन. नीट बुद्धीचा उपयोग करून तेलात काय मिसळलं जात आहे, त्याचा शोध घेईन. त्याची खरेदी कुठे केली जाते, ते पाहीन. सर्व माहिती व्यवस्थित गोळा झाली की सावकाराचं कारस्थान उघड करीन."
हे ऐकताच गंधार तेथून पळत सुटला. गावच्या लोकांना एकत्र आणून त्याने सावकार करत असलेल्या भेसळ-तेलाची वार्ता त्यांना सांगितली. सावकाराने आपणावरचा आरोप नाकारला, पण गंधार जेव्हा झोपडीतून भेसळ केल्या जाणाऱ्या पदार्थाचा डबाच बाहेर घेऊन आला, तेव्हा खरी गोष्ट काय व ती का घडली हे सावकारालाही कळेना! त्याने सर्वांसमक्ष गंगारामला जाब विचारला.
आता गोष्ट सरळ स्पष्ट झाली की सावकाराच्या बायकोला सणासुदीसाठी चांगली साडी हवी होती. सावकाराने तिला नकार दिल्यामुळे तिने गंगारामला लालूच दाखवून तेलात भेसळ करून साडीसाठी परस्पर पैसे जमवायचे ठरवले. पण दुर्दैवाने तेलविक्री सुरू होण्यापूर्वीच ते कारस्थान उघडे पडले.
गावकऱ्यांनी गंधारच्या अक्कलहुशारीची तारीफ केली अन् सावकाराला टोमणे मारले.
रमानाथ आता पुन्हा एकदा नाराज झाला. गंधारच्या घरी जाऊन त्याने त्याला कटू स्वरात विचारले, "तू तर म्हणत होतास की शांतपणे, सावकाशीनं कामं करावीत. पण मला कळलेली माहिती तूच माझ्या आधी जाऊन सर्वांना सांगितलीस. अन् लोकांकडून स्तुती करून घेतलीस. शोभतं का तुला हे?"
"यात स्तुती करून घेण्याचा अन् शोभण्याचा काय प्रश्न? गंगारामचं रहस्य तू उघडून दाखवलं, हे मी लोकांना सांगितलंच ना?" गंधार म्हणाला.
"पण सर्व गावकऱ्यांना एकत्र करून तूच त्यांना सावध केलंस ना? यात तारीफ तुझीच झाली, नाव तुझंच झालं! मी ते केलं असतं तर माझी प्रशंसा नसती झाली?" रमानाथने आपले दुःख प्रकट केले.
गंधार हळूच म्हणाला, "मग तूच का नाही गावकऱ्यांना सावध केलंस?"
"शहाणाच आहेस की? तूच तर म्हणत होतास नं, की मी शांत राहावं, नीट समजून-उमजून सावकाशीनं काम करावं?" रमानाथने जाब विचारला.
आता गंधार हसत म्हणाला, "होय, ही गोष्ट खरीच; पण ही शांत रहायची वेळ नव्हती. भेसळ तेल वापरून किती लोकांचे प्राण धोक्यात आले असते कोणास ठाऊक? या दुर्घटनेपासून लोकांना वाचवणं, हे कर्तव्य नव्हे का माझं? म्हणूनच तुझ्याकडून गोष्ट कळल्याबरोबर धावलो मी, अन् धोका टळला. बरोबर आहे की नाही बोल!"
रमानाथ म्हणाला, "पण साधूच्या विषयात तर तू मला संयमपूर्वक वागण्याचा सल्ला दिला होतास."
"होय, तेव्हा आपल्याला शांत अन् संयमानं राहाणं आवश्यक होतं. साधूला शिक्षा करणं आवश्यक नव्हतं. पण आत्ताची गोष्ट वेगळी आहे. ताबडतोब सगळं उघड करणं जरूरीचं होतं. सावकाराच्या कारस्थानाचा भोपळा ताबडतोब फोडणंच जरूरीचं आहे, असं वाटलं मला!"
रमानाथने आता दीन स्वरात विचारलं की, "केव्हा शांत राहाणं आवश्यक आहे, अन् केव्हा धावपळ करणं गरजेचं आहे, हे कसं ओळखायचं?"
"म्हणजे विवेक कसा बाळकायचा हेच विचारायचंय नं तुला? तू स्वतःच्या बाबतीत विचार करायचं सोडून इतरांच्या बाबत विचार करायला लाग. जे काम करशील, त्यात इतरांचं हित होतंय की नाही याचा विचार कर. स्वतःचा विचार करणं हा स्वार्थ होतो. पवित्र मनानं जो दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो, त्याला विवेक आपोआपच येतो. कोणत्याही गोष्टीचं विवेक्षण तो आपोआप करू लागतो."
रमानाथला आता कुठे स्वतःची चूक समजून चुकली. शरमेने त्याने मान खाली घातली. यानंतर प्रत्येक काम तो गंधारचा सल्ला नजरेसमोर ठेवून करू लागला अन् त्यात सफल होऊ लागला.