All Marathi Stories
अर्धा आणा
एका गावात रतन नावाचा एक गरीब माणूस राहत होता. त्याची अदम्य इच्छा होती की, आपण खूप कमाई करून एक शेतकरी बनावं; इतर शेतकऱ्यांप्रमाणेच आपलं सामान घेऊन बाजारात नेऊन विकावं. पण बिचाऱ्याची इच्छा पूर्ण होत नव्हती. ती केवळ एक स्वप्नच बनून राहिली होती. खूप मेहनत करत असे तो, पण ती कमाई रोजचं पोट भरायलाच फक्त पुरेशी होत असे.
रतननं ठरवलंच की, काहीही करून बाजारात जाऊन माल विकून येईलच. त्याच्याजवळ पोतभर लोकर होती. मनात आलं तर ती एवढीशी लोकर तो गावातच विकू शकला असता. बाजारात नेऊनही त्याला यापेक्षा जास्त पैसेही नस्ते मिळाले. उलट लोकर बाजारात नेली असती तर लोकांनी त्याची टरच उडवली असती.
त्यामुळे रतन एक दिवस जंगलात गेला आणि त्यानं एका पोत्यात वाळकी पानं भरून आणली. त्या पानांवर त्यानं लोकर पसरली. आणि गाठोडं बांधून तो बाजाराकडे चालू लागला.
मगन नावाचा असाच एक माणूसही त्या दिवशी बाजारात आला. त्याच्याजवळही एक पोतं होतं. त्याच्या पोत्यात एक तृतीयांश कसलीशी कच्ची फळं होती. त्यांच्यावर त्यानं न सोललेली सुपारी पसरली.
रतनला बाजारात प्रवेश करायचं धाडस होत नव्हतं, त्यामुळे तो थोड्या अंतरावर आपलं पोतं घेऊन बसला. मगनही तिथेच येऊन बसला. दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या; एकमेकांना 'तू काय आणलं आहेस' असंही विचारलं. आपल्या पोत्यातून लोकर काढून दाखवत रतन म्हणाला, "उत्तम माल आहे!" मगननंही आपल्या पोत्यातून सुपारी काढत म्हटलं, "पाहिलंस, लिंबासारख्या मोठमोठ्या सुपाया आहेत."
"बाजार खूप जोरात चाललाय ना? आपल्याशी कोणी ना बोलायला तयार होणार, ना कोणी आपला माल घ्यायला तयार होणार, त्यापेक्षा आपण एकमेकांशी आपापल्या वस्तू बदलून घेतल्या, तर कसं होईल?" मगननं विचारलं.
"लोकरीच्या बदल्यात सुपारी?" रतननं आश्चर्य दाखवलं. मगनही ही अदलाबदल व्हावी अशी इच्छा असल्याने म्हणाला, "पण सुपारी काही तुझ्या लोकरीपेक्षा कमी मोलाची नव्हे, खूप चांगला माल आहे. ठीक आहे, तू मान्य केलंस तर अर्धा आणा मी निराळा देईन तुला." मगन म्हणाला.
रतननं ते मान्य केलं. दोघांनी पोती बदलून घेतली. "अच्छा, निघतो मी!" म्हणून मगन पुढे जाऊ लागला.
पण रतन 'कबल केल्याप्रमाणे अर्धा आणा दे नं!' असं बोलत त्याच्या मागे लागला. "हो हो, द्यायचे आहेत तुझे पैसे. पण आता माझ्याजवळ फुटकी कवडीही नाहीये. भिऊ नकोस. पैसे नक्की देईन मी. माझा पत्ता सांगतो तुला." असे म्हणून पत्ता सांगून मगन निघून गेला.
काही दिवसांनी अर्धा आणा वसूल करायला रतन मगनच्या गावी गेला. मगन गावच्या सावकाराकडे काम करत असे. रतनला पाहिल्याबरोबर त्यानं आरोप केला, "तू फसवलंस मला. बुडवलंस!" रतनही म्हणाला, "तू तरी काय कमी आहेस? तुम्ही फसवलंच की!" मगन म्हणाला, "मग हिशोब झाला बरोबर." "नाही नाही, असं नाही होणार! तू मला अर्धा आणा द्यायलाच हवास. तू कबूल केलंत होतंस. आधी चुकव आपले पैसे." रतनने आग्रह धरला.
"आत्ताही काही नाहीय माझ्याजवळ. पण आपला दोघांचाही लाभ होईल असा उपाय सांगतो बघ मी तुला. माझ्या सावकाराच्या घरामागे एक खोल खड्डा आहे. मी स्वतः सावकाराला एकदा त्यात उतरताना पाहिलंय. नक्कीच त्यानं सोनं किंवा काळा पैसा लपवला असला पाहिजे तिथे. आज मध्यरात्री आपण खड्ड्यात उतरू अन् मिळेल ते वाटून घेऊ. कबूल?" मगननं विचारलं. रतनने ताबडतोब होकार दिला.
त्या रात्री मगन एक पोतं आणि मोठा दोर घेऊन आला. दोघं सावकाराच्या आवारात पोचले. रतननं दोर घट्ट पकडला. मगन पोतं घेऊन दोराच्या सहाय्यानं खड्ड्यात उतरला. खूप शोधलं तरी मातीशिवाय काहीच आढळलं नाही तिथे.
"रतन तर चांगला पोचलेला माणूस आहे. इथे काही नाही म्हटलं तर दोर टाकून टाकत कदाचित पळून जाईल. तेंव्हा सावधगिरी बाळगायला हवी. मला वर जाता येईल असा काही उपाय करायला हवा." स्वतःशी मगननं असा विचार केला अन् पोतं दोराला बांधून तो ओरडला - हे पोतं वर खेचून घे, अन् मग पोतं सोडून मला काढण्यासाठी पुन्हा दोर खाली सोड." रतननं मोठ्या उत्साहानं पोतं वर खेचून घेतलं.
"हा मगन काही मोठा विश्वसनीय माणूस नाहीये. त्याला का यात हिस्सा देऊ? राहू दे नं त्याला खड्ड्यात पडून! त्यातच कल्याण आहे माझं!" असा विचार करून तो पोतं आपल्या पाठीवर लादून तो भराभरा आपल्या गावाकडे निघाला. पण तो पोत्यात खुद्द मगन बसला असल्याचं त्याला काय माहीत?
थोडं दूर गेल्यावर पोत्याच्या ओझ्यामुळे त्यानं ते खाली ठेवलं. त्याबरोबर ते उघडून मगन बाहेर आला. "बदमाश! पुन्हा फसवलंस मला!" रतन त्याला पाहून ओरडला.
"मग तू काय कमी आहेस? जी सज्जनता दाखवत होतास, ती कुठे गेली आता? मला हिस्सा न देता आपण सर्व हडपावं असाच विचार होता न तुझा? मग बरोबर हिशोब झाला, गप्प बस आता." मगन म्हणाला.
"मी का गप्प राहीन? माझा अर्धा आणा तर द्यावाच लागेल तुला! तू शपथ घेतली होतीस." "मी देणार नाही असं थोडंच म्हटलं? माझ्याजवळ असेल तेंव्हा देईनच." मगन म्हणाला, नंतर दोघं आपापल्या गावाला रवाना झाले.
काही महिन्यांनी मगनचं लग्न झालं. बायको बरोबर थोडं धनही घेऊन आली. त्यानं नोकरी सोडून दिली व शेत खरेदी करून तो स्वतः शेती करू लागला. थोडंफार धन कमवून गावाबाहेर त्यानं छोटसं घरही बांधलं.
रतन तर इकडे नेहमीप्रमाणे मेहनत करून पोट भरत होता. अचानक एक दिवस त्याला मगनकडून अर्धा आणा येणे असल्याचे आठवण झाली. तो वसुलीसाठी मगनच्या गावी गेला.
मगन आपल्या घराजवळच बसला होता. रतन आपल्या घराकडे येत असल्याचे त्याला दिसलं. लगेच घरात शिरून तो बायकोला म्हणाला, "अग, कर्जवसुलीसाठी रतन येतो आहे. मी इथे मेल्या माणसासारखा पडून राहतो अन् तू माझ्या जवळ रडून रडत बस. संध्याकाळपर्यंत अशीच रडत राहिलास तर याच्यापासून कायमची सुटका होईल आपली." बायकोनं मगननं सांगितल्याप्रमाणे सर्व केलं. रतननं घरात येऊन जाऊन प्रकार पाहिला.
"मगन कसं तुमचं कर्ज फेडू शकेल आता? सारी ऋणबंधने सोडून ते निघून गेले. तुमच्याबद्दल ते कधीकधी माझ्याजवळ बोलत असत. दोघं खूप चांगले मित्र होता ना तुम्ही? तुमची स्वतः जमीन घेऊन शेती करायची इच्छा होती ना? स्वतःचा माल घेऊन बाजारात जायचं होतं तुम्हाला! सुद्धा आमची स्थिती बरी असल्याने तुमचा अर्धा आणा व्याजासकट द्यायची त्यांची इच्छा होती." असं म्हणत ती रडत राहिली.
"कशाचं काय घडलं हे! मदन माझा कायमचा दोस्त आहे. त्याची अंत्यक्रिया करूनच जाईन मी! आम्ही मिळून काय काय करायचं सोडलंत?" रतन दुःखाने म्हणाला. नंतर बाहेर जाऊन स्मशानात नेण्यासाठी काही शववाहून (शववाहक) घेऊन आला.
मगनची बायको म्हणाली, "माझे नातेवाईक येईपर्यंत मी प्रेत नेऊ देणार नाही."
सूर्यस्त झाला, तरी रतन तेथून जाईना. आसपासची माणसंही गोळा होऊन म्हणाली, "प्रेत उचललं जाईपर्यंत आमच्या घरात तरी चुली कशा पेटणार? प्रेत आपण एकाच्या ओसाड देवळात नेऊन ठेवू."
त्याप्रमाणे मगनला उचलून देवळात ठेवण्यात आलं.
मध्यरात्र झाली. मंदिराबाहर लोकांच्या पावलांची चाहूल आली. रतन लगेच गर्भगारात लपून बसला. थोड्या वेळात चोर देवळात आले. चोरट्यांच्या सरदाराने गाठोडं खाली ठेवलं; त्यातून किमती दागिने, पैसे इ. काढून आणि त्याचे चार वाटे केले. त्यात एक सुराही होता. चोरट्यांच्या सरदाराने विचारलं, "हा कोण घेणार?" तिथेही म्हणाले की तो कोणाच्याच कामाचा नाही.
"नाही, हा चांगला तीक्ष्ण आहे. पहा तुमच्या समोर मी या प्रेताचे दोन तुकडे करतो" असे म्हणून सरदार मगनजवळ आला. आता मगन ताबडतोब उठून ओरडू लागला, "अरे भुतांनो, तुम्ही सर्व कुठे धडपडायला गेलात रे? चोरांना भिऊन पळायलात काय?" आता रतनही बाहेर आला. चोर भुतं पाहून पळून गेले.
"पाहिलंस? भाग्य फळफळलं आपलं! चल आता हे सारं वाटून घेऊ आपण." असं म्हणून लुटीचा माल त्यांनी वाटून घेतला.
"झालं ते छानच झालं. पण तू अजून माझा अर्धा आणा दिलाच नाहीस!" रतननं विचारलं अन पुन्हा दोघं भांडू लागले.
एवढ्यात दूर पळालेले चोर एका ठिकाणी थांबले. सरदार आपल्या साथीदारांना म्हणाला, "फार भ्याडपणा दाखवला आपण. मोठ्या योद्ध्यालाही टक्कर देणारे आपण असे भिऊन शेपूट आत घालून सारा माल सोडून पळून आलो. ज्याच्यात हिम्मत असेल, त्यानं तिथे जाऊन काय चाललंय ते हळूच पहावं."
बाकीच्या तिघांनी नकार दिल्यामुळे खुद्द त्या सरदारालाच जावं लागलं. मोठं धैर्य एकवटून तो देवळाजवळ आला अन् आत काय चाललंय ते ऐकू लागला. आत मदन रतन जोरजोरात ओरडत होते. रतन 'माझा अर्धा आणा देतोस की नाही?' असं ओरडत होता अन् 'तुझं धन तुला व्याजासहित मिळालंय' असं सांगत होता.
त्यांचं बोलणं ऐकून चोरचा सरदार घामाघूम झाला. बाकी साथीदारांजवळ जाऊन तो म्हणाला, "तिथं किती भुतं आहेत याची आपण कल्पनाही करू शकत. आपला लुटीचा माल त्यांनी वाटून घेतला. एकेकाला फक्त अर्धा-अर्धा आणाच मिळाल्या. काहींना तोही न मिळाल्याने ती आपसात भांडत आहेत. आजचा दिवस शुभच म्हणायचा की आपले प्राण तरी वाचले! चला जाऊया इथून!" चोर तिथून दूर पळून गेले.
शेवटी रतन आणि मगन यांच्यात समझोता झाला. आपल्या अर्ध्या आण्याच्या बदल्यात रतननं सुरा घेतला. गावी आल्यावर रतननं त्या धनातून एक शेत घेतलं लग्न करून आता तो शेतकरी बनला. बाजारात माल घेऊन जाण्याची त्याची इच्छा आता पुरी झाली.