अनमोल उपदेश
एकदा एक शेतकरी शहरात जात होता. वाटेत एक व्यापारी आणि एक शिक्षक त्याला भेटले. तिघेही परस्परांशी बोलत पायी पुढे निघाले. चालत असता दुपार झाली. तिघांनाही भूक लागली होती. त्यांना एक बाग दिसली. बागेत फणसाचे झाड होते. पिकलेल्या फणसाचा गोडवा सुटला होता.
तिघांनी बागेत जाऊन माळ्याला भूक लागली असल्याचे सांगून एक पिकलेला फणस मागितला. माळ्याने एक पिकलेला फणस तोडून दिला.
शेतकरी फणस कापू लागला. 'इतर दोघांपेक्षा आपल्याला जास्त मिळाला तर बरं होईल' असे त्याच्या मनात आले. तो उघडपणे म्हणाला— "आपल्या तिघांचा निरनिराळा धंदा आहे. मी शेती करतो, व्यापारी व्यापार करतो आणि शिक्षक शिकवतो. या तिघांच्या धंद्यात ज्याचा धंदा मोठा आहे, त्याला एक भाग जास्त मिळाला पाहिजे. तुम्हाला काय वाटते?"
"व्यापारापेक्षा किंवा शिक्षणापेक्षा अन्न मनुष्याला जास्त आवश्यक व उपयोगी आहे, म्हणजे अन्न उत्पन्न करणारा जो शेतकरी तो श्रेष्ठ आहे. त्याला मोठा वाटा मिळाला पाहिजे." उपाशी व्यापारी आणि शिक्षक आपण मागितलेला वाटा देण्यास नकार देणार नाहीत, असे त्याला वाटले.
शेतकरी जे म्हणाला ते ऐकून अध्यापक म्हणाले— "तू दिलास तो तर्क मी ऐकला. त्याला उत्तर म्हणून मी एक गोष्ट सांगतो. एका गावी एक श्रीमंत मनुष्य राहत असे. त्याला तीन मुलगे होते. ते तिघेही उडाणटप्पू निघाले आणि दिवसभर गावात भटकत असत. मुलांचा तो उडाणटप्पूणा पाहून बापाला फार वाईट वाटले.
तो श्रीमंत मनुष्य दिवसेंदिवस म्हातारा होत गेला होता. आपल्या पाठीमागे मुले आपली सर्व इस्टेट उडवून टाकतील, म्हणून त्याने एक उपाय करण्याचे ठरवले. त्या श्रीमंताने आपल्या मुलांना एक एक करून बोलावले आणि त्यांना आपले मृत्युपत्र दाखवले. त्यात, पित्याच्या मृत्यूनंतर पित्याच्या इस्टेटीचे चार वाटे करावे आणि ज्या मुलाला अंगठी मिळेल त्याला आणखी एक वाटा देण्यात यावा असे लिहिले होते. श्रीमंताने प्रत्येक मुलाला ते दाखवून म्हटले— "पहा बाळ! तू आपली जबाबदारी ओळखून इमाने-इतबारे राहशील तर मी तुलाच ती अंगठी देईन."
काही काळ लोटल्यावर तो श्रीमंत मनुष्य वारला. पंचांनी एका जागी बसून मृत्युपत्र वाचले. त्या श्रीमंताच्या इस्टेटीचे चार वाटे केले आणि त्याच्या तिघा मुलांना बोलावून त्यांनी विचारले— "तुमच्यापैकी कोणाला वडिलांची अंगठी मिळाली?"
एकाने खिशातून अंगठी काढली व म्हणाला— "मला अंगठी मिळाली." दुसऱ्याने पण तशीच अंगठी काढून दाखवली. बापाने इतर मुलांना कळल्याशिवाय प्रत्येकाला अंगठी दिली होती. तिन्ही अंगठ्या सारख्याच होत्या. पंचांनी नाईलाजाने सर्व इस्टेटीचे सारखे सारखे तीन वाटे करून तिघांना दिले."
अशी गोष्ट सांगून शिक्षक म्हणाले— "आपल्या तिघांचे धंदे आपापल्या स्थानी श्रेष्ठ आहेत. यावर तर्क करण्याला जागाच नाही. तसेच आपली सर्वांची भूक पण सारखीच आहे. एक धंदा करणाऱ्याला कमी भूक व दुसरा धंदा करणाऱ्याला जास्त भूक लागत असण्याची शक्यता नाही. म्हणून आपण हा फणस सारखे वाटे करूनच घेतला पाहिजे."
शेतकऱ्याला, त्याला जो लोभ झाला त्याबद्दल फार लाज वाटली. त्याने फणसाचे तीन सारखे सारखे वाटे केले आणि तिघांनी त्या फणसावर आपली भूक भागवली.